यिर्मया
लेखक
यिर्मया, त्याचा लेखक बारुखसोबत. यिर्मया, ज्याने याजक व संदेष्टा या दोघांचीही सेवा केली होती, तो हिल्कीया नावाच्या याजकाचा मुलगा होता. (2 राजे 22:8 चा मुख्य याजक नाही.) तो अनाथोथच्या लहानशा गावातून आला (यिर्मया 1:1). त्याला बारुख नावाच्या एका लेखकाने सेवाकार्यात सहकार्य केले ज्याला यिर्मयाने आज्ञा दिली आणि ज्याने संदेष्ट्याच्या संदेशांमधून संकलित केलेल्या लिखाणांचे प्रतिलिपी व संरक्षण केले होते (यिर्मया 36:4, 32; 45:1). यिर्मयाला आश्रू ढाळणारा संदेष्टा (यिर्मया 9:1; 13:17; 14:17), आक्रमक बाबेलकरांनी दिलेल्या न्यायदंडाच्या भविष्यवाण्यामुळे संघर्षपूर्ण जीवन जगणारा म्हणून ओळखण्यात आलेले आहे.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 626 - 570.
हे कदाचित बाबेलच्या बंदिवासादरम्यान कधीतरी पूर्ण झाले होते, तरी काहींचे म्हणणे आहे की पुस्तकांचे संपादन नंतरही चालू राहिले आहे.
प्राप्तकर्ता
यहूदा आणि यरूशलेमचे लोक आणि पवित्र शास्त्राचे इतर वाचक.
हेतू
यिर्मयाचे पुस्तक हे ख्रिस्ताचे पृथ्वीवरती येण्याआधी आपल्या लोकांना ते निर्माण करण्याच्या हेतूने नवीन कराराची झलक देते. या नव्या करारामुळे देवाच्या लोकांचे पुनर्वसन होणार आहे, कारण तो त्याच्या नियमांना दगडी पाट्यांऐवजी, देहस्वभावाच्या हृदयावर लिहिणार होता. यिर्मयाचे पुस्तक यहूदाला अंतिम भविष्यवाण्यांची नोंद करते, जर राष्ट्राने पश्चात्ताप केला नाही तर भविष्यातील विनाशाची चेतावणी देते. राष्ट्राला देवाकडे परत जाण्याकरिता यिर्मयास पाचारण. त्याच वेळी यिर्मयाने पश्चात्ताप न करणाऱ्या मूर्तीपूजा आणि अनैतिकतेमुळे यहूदाचा नाश करण्याची अपरिहार्यता ओळखली.
विषय
न्याय
रूपरेषा
1. देवाद्वारे यिर्मयाचे पाचारण — 1:1-19
2. यहूदाला चेतावणी — 2:1-35:19
3. यिर्मयाचे दुःख — 36:1-38:28
4. यरूशलेमचे पतन आणि त्याचे परिणाम — 39:1-45:5
5. राष्ट्राविषयी भविष्यवाण्या — 46:1-51:64
6. ऐतिहासिक परिशिष्ट — 52:1-34
1
यिर्मयाला पाचारण व त्याचे कार्य
बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने: म्हणजे यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षात परमेश्वराचे वचन यीर्मयाकडे आले. तसेच यहूदाचा राजा योशीया ह्याचा मुलगा यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या दिवसात, आणि यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या समाप्तीपर्यंत, पाचव्या महिन्यात, जेव्हा यरूशलेमधील लोकांस पाडाव करून नेले तोपर्यंत ते त्याच्याकडे आले. परमेश्वराचे वचन माझ्याजवळ आले,
“मी तुला आईच्या उदरात घडवण्यापूर्वीच, मी तुला निवडले आहे,
आणि तू गर्भातून निघण्याआधीच मी तुला पवित्र केले आहे. मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा असे केले आहे.” मी म्हणालो, “अहा! परमेश्वर देवा, मी कसे बोलावे हे मला माहीत नाही, कारण मी फार लहान आहे.”
पण परमेश्वर मला म्हणाला,
“मी लहान बालक आहे असे म्हणू नकोस. मी तुला पाठवीन तेथे सगळीकडे तुला गेलेच पाहिजे,
आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील.
त्यांना तू घाबरु नकोस, कारण तुला सोडवायला मी तुझ्या सोबत आहे. असे परमेश्वर म्हणतो.”
मग परमेश्वराने हात लांब करून माझ्या तोंडाला स्पर्श करून म्हणाला, “आता, मी माझी वचने तुझ्या मुखात घातली आहेत.
10 खाली ओढण्यासाठी, फाडून टाकण्यासाठी, नष्ट करून टाकण्यासाठी, आणि उलथून टाकण्यासाठी, उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठी,
आजपासून मी राष्ट्रे आणि राज्ये तुझ्या ताब्यात देत आहे.”
11 परमेश्वराचे वचन मजकडे आले, “यिर्मया, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला बदामाच्या झाडाची एक शाखा दिसते.” 12 परमेश्वर मला म्हणाला, “तुला उत्तम दिसत आहे. कारण मी माझे वचन साधण्यास लक्ष ठेवत आहे.” 13 मग दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला एक उकळती कढई दिसत आहे, जिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.” 14 परमेश्वर मला म्हणाला, “देशातील राहणाऱ्या सर्वांवर उत्तरेकडून आपत्तीचा वर्षाव होईल, 15 कारण परमेश्वर म्हणतो, मी उत्तरेकडील राज्यातील सर्व कुळांना बोलावीन आणि ते येतील, ते प्रत्येक आपापले राजासन यरूशलेमेच्या वेशींच्या प्रवेशाजवळ आणि सभोवती त्याच्या सर्व कोटांच्या समोर व यहूदाच्या सर्व नगरांच्या समोर स्थापन करतील. 16 आणि मी त्यांच्याविरुद्ध माझा निर्णय घोषित करीन, कारण त्यांनी मला सोडून इतर देवतांपुढे धूप जाळला, आणि आपल्या हातांच्या कामांची पूजा केली, या त्यांच्या दुष्टाईबद्दल मी त्यांच्याविरुद्ध शिक्षा सांगेन. 17 यास्तव, तू स्वत:ला तयार कर, उभा राहा आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते त्यांना सांग, त्यांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर मी तुला त्यांच्यासमोर भयभीत करेन. 18 पाहा, आज मी तुला मजबूत शहर व लोखंडी खांबाप्रमाणे आणि कांस्याच्या भिंतीप्रमाणे केले आहे, ह्यासाठी की तू या भूमीवरच्या सर्वांविरूद्ध यहूदाच्या राजांविरुध्द, त्याच्या अधीकाऱ्यांविरुध्द, तेथील याजकांविरूद्ध आणि लोकांविरूद्ध समर्थपणे उभे रहावे. 19 ते सर्व लोक तुझ्याविरूद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करणार नाहीत, कारण तुला सोडवायला मी तुझ्याबरोबर आहे, परमेश्वर असे म्हणतो.”