लेवीय
लेखक
पुस्तकाच्या शेवटच्या वचनातून लेखकाची समस्या सोडवली आहे, “या आज्ञा त्या आहेत ज्या परमेश्वराने सीनाय पर्वतावर इस्त्राएल लोकांसाठी मोशेला दिल्या” (27:34; 7:38; 25:1; 26:46). इतिहासाच्या पुस्तकात अनेक ऐतिहासिक खात्यांची नोंद आहे (8:10; 24:10-23). लेवीय हा शब्द लेवींच्या वंशातून आला आहे, जे सदस्य परमेश्वराद्वारे त्याचे याजक व आराधनेचे पुढारी म्हणून नेमलेले होते. हे पुस्तक लेव्यांच्या जबाबदाऱ्या आणि अधिक महत्त्वाच्या विषयांना संबोधित करते, सर्व याजकांना आराधनेत लोकांना मदत करण्यास सांगितले जाते आणि लोकांनी पवित्र जीवन कसे जगावे याविषयी माहिती दिली जाते.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 1446 - 1405.
लेवीयमध्ये सापडलेल्या नियमशास्त्रात देव सिनाय पर्वताजवळ किंवा जवळच्या ठिकाणी मोशेशी बोलला होता, जेथे इस्त्राएली लोकांनी काही काळ तळ ठोकला होता.
प्राप्तकर्ता
हे पुस्तक याजक, लेवी आणि इस्राएलमधील वडीलधारी मंडळी यांच्याकडून लिहिण्यात आले.
हेतू
लेवीय हे पुस्तक परमेश्वराद्वारे सुरु केले जाते जेव्हा मोशेला पवित्र निवास मंडपापासून बोलावणे येते. लेवीय पुस्तकाचे वर्णन, अशा उद्धारित लोकांचे वर्णन करते की, आता आपल्यामध्ये असलेल्या परमपवित्र देवाबरोबर योग्य संगती कशी टिकवून ठेवावी. इस्राएल राष्ट्राने फक्त मिसर देशाची संस्कृती व धर्म सोडून दिलेला आहे, आणि कनानमध्ये प्रवेश करणार आहे, जेथे इतर संस्कृती आणि धर्म राष्ट्रावर प्रभाव पाडतील. लेवीय लोकांना या संस्कृतीपासून वेगळे (पवित्र) राहण्यास आणि परमेश्वराशी विश्वासू राहण्यास मुभा प्रदान करते.
विषय
सूचना
रूपरेषा
1. अर्पणांसाठी सूचना — 1:1-7:38
2. देवाच्या याजकांसाठी सूचना — 8:1-10:20
3. देवाच्या लोकांसाठी सूचना — 11:1-15:33
4. वेदीसाठी सूचना आणि प्रायश्चित्ताचा दिवस — 16:1-34
5. व्यावहारिक पवित्रता — 17:1-22:33
6. शब्बाथ, सण आणि उत्सव — 23:1-25:55
7. देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अटी — 26:1-27:34
1
होमार्पणे
परमेश्वराने दर्शनमंडपातून मोशेला हाक मारली आणि त्यास म्हटले, इस्राएली लोकांस असे सांग की, जेव्हा तुम्ही परमेश्वरास पशूबली अर्पण करता तेव्हा त्यांनी तो गुराढोरांपैकी किंवा शेरडामेढरांपैकी अर्पावा.
जेव्हा एखाद्या मनुष्यास गुरांढोरातले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वरासमोर तो मान्य होईल. त्या मनुष्याने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून मान्य होईल.
त्यानंतर त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा. दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर अर्पण करून अहरोनाचे पुत्र, जे याजक, त्यांनी त्याचे रक्त सादर करावे आणि दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोरील वेदीवर सभोवती शिंपडावे. याजकाने त्या यज्ञपशूचे कातडे काढावे व त्याचे तुकडे करावे.
नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा व नंतर त्याच्यावर लाकडे रचावी; अहरोनाचे मुले जे याजक होते, त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर त्याचे तुकडे, डोके, व चरबी रचावी; त्याचे पाय व आतडी ही पाण्याने धुवावी, मग याजकाने त्या सर्वांचा वेदीवर होम करून तो अर्पावा, हे होमार्पण आहे; हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय.
10 जर कोणाला शेरडाचे किंवा मेंढराचे होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. 11 त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोवती शिंपाडावे.
12 मग याजकाने त्या पशूचे कापून तुकडे करावेत व त्याने ते तुकडे, डोके, व चरबी वेदीवरील विस्तवाच्या लाकडावर रचावी, 13 त्याचे पाय व आतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय.
14 जर कोणाला परमेश्वरासाठी पक्षाचे होमार्पण करावयाचे असेल तेव्हा त्याने त्याचे अर्पण होले किंवा पारव्याची पिल्ले अर्पावी. 15 याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून उपटून काढावे व वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे.
16 त्याने त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस वेदीवरील राख टाकण्याच्या जागी फेकून द्यावी. 17 त्याने तो पक्षी पंखाच्या मधोमध फाडावा, परंतू त्याचे दोन वेगळे भाग करू नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. हे परमेश्वरासाठी केलेले सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.