2
माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हास या गोष्टी लिहीत आहे, पण जर तुम्हांपैकी एखादा पाप करतो तर त्याच्यासाठी पित्याजवळ आपला कैवारी येशू ख्रिस्त जो नीतिमान तो आहे. तो केवळ आमच्याच पापासाठी नव्हे तर सगळ्या जगाच्याही पापांबद्दल प्रायश्चित्त झाला आहे.
आज्ञांकितपण हे देवसहवासाचे प्रमाण होय
जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर आम्ही त्यास खऱ्या अर्थाने ओळखले आहे. जो कोणी असे म्हणतो, “मी देवाला ओळखतो!” परंतु त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो खोटे बोलत आहे; आणि त्याच्याठायी सत्य नाही. पण जर कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, तर त्यांच्यामध्ये देवाची प्रीती पूर्णत्वास गेली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्याठायी आहोत. मी देवामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने, जसा येशू ख्रिस्त चालला तसे चालले पाहिजे.
प्रियांनो, मी तुम्हास नवी आज्ञा लिहीत नाही, परंतु जी आज्ञा तुम्हास आरंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा लिहितो; जे वचन तुम्ही ऐकले ते ती जुनी आज्ञा होय. तरीही मी एकप्रकारे नवी आज्ञा लिहीत आहे. ती ख्रिस्तात आणि तुमच्यात सत्य आहे कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या भावांचा द्वेष करतो तो अजून अंधारांतच आहे. 10 जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये अडखळण्याचे कारण नसते. 11 पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्यास कळत नाही कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत.
12 प्रिय मुलांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण ख्रिस्ताच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हास क्षमा झालेली आहे. 13 वडिलांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्यास तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण दुष्टावर तुम्ही विजय मिळवला आहे. लहान मुलांनो, मी तुम्हास लिहीले आहे, कारण तुम्ही पित्याला ओळखता. 14 वडिलांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण तुम्हास पिता माहीत आहे. वडिलांनो, मी तुम्हास लिहिले कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे त्याची तुम्हास ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले कारण तुम्ही बळकट आहात; देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.
15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही. 16 कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. 17 जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्वकाळपर्यंत जगेल.
ख्रिस्तविरोधकांच्या बाबतीत इशारे
18 मुलांनो, शेवट जवळ आला आहे व तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत; ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे. 19 आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले. 20 पण जो पवित्र त्याच्यापासून तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. 21 तुम्हास सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हास लिहीले आहे असे नाही, तुम्हास ते कळते म्हणून आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही, म्हणून लिहिले आहे.
22 येशू हा ख्रिस्त आहे असे नाकारणारा लबाड नाही काय? जो पित्याला आणि पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे. 23 जो कोणी पुत्राला नाकारतो त्यास पिता लाभत नाही पण जो पुत्राला स्वीकारतो त्यास पिता लाभला आहे. 24 तुमच्याविषयी जे म्हणावयाचे तर, जे तुम्ही आरंभापासून ऐकले ते तुम्हामध्ये राहो. जे तुम्ही आरंभापासून ऐकले ते जर तुम्हामध्ये राहिले, तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये रहाल. 25 आणि देवाने आम्हास जे देण्याचे अभिवचन दिले आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय.
26 जे तुम्हास फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हास या गोष्टी लिहीत आहे. 27 पण तुम्हाविषयी म्हणावयाचे तर, त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हास कोणी शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही तुम्हास सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हास शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यामध्ये राहा.
28 म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हास धैर्य मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही. 29 जर तुम्हास माहीत आहे की, ख्रिस्त नीतिमान आहे तर जे लोक चांगले काम करतात ते देवाचे पुत्र आहेत हे देखील तुम्हास कळेल.