14
अहीयाने यराबामाविरुध्द दिलेला संदेश
याच सुमारास यराबामाचा पुत्र अबीया आजारी पडला. तेव्हा यराबाम आपल्या पत्नीला म्हणाला, “तू शिलो येथे जाऊन तिथल्या अहीया या संदेष्ट्याला भेट. मी इस्राएलचा राजा होणार हे भाकित त्यानेच केले होते. तसेच वेष पालटून जा म्हणजे लोक तुला माझी पत्नी म्हणून ओळखणार नाहीत. यराबामाने त्याच्या पत्नीला संदेष्ट्याकडे दहा भाकरी, काही पुऱ्या आणि मधाचा बुधला घेऊन पाठवले. मग आपल्या मुलाबद्दल विचार. अहीया तुला काय ते सांगेल.” मग यराबामाने सांगितल्यावरून त्याची पत्नी शिलोला अहीया, या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्यास अंधत्वही आले होते. पण परमेश्वराने त्यास सूचना केली, “यराबामाची पत्नी आपल्या मुलाबद्दल विचारायला तुझ्याकडे येत आहे. तिचा पुत्र फार आजारी आहे. मग अहीयाने तिला काय सांगायचे तेही परमेश्वराने त्यास सांगितले. यराबामाची पत्नी अहीयाच्या घरी आली. लोकांस कळू नये म्हणून तिने वेष पालटला होता.” अहीयाला दारात तिची चाहूल लागली तेव्हा तो म्हणाला, “यराबामाची पत्नी ना तू? आत ये आपण कोण ते लोकांनी ओळखू नये म्हणून का धडपड करतेस? मला एक वाईट गोष्ट तुझ्या कानावर घालायची आहे. परत जाशील तेव्हा इस्राएलाचा परमेश्वर देव काय म्हणतो ते यराबामाला सांग. परमेश्वर म्हणतो, ‘अरे यराबाम, इस्राएलाच्या सर्व प्रजेतून मी तुझी निवड केली. तुझ्या हाती त्यांची सत्ता सोपवली. यापूर्वी इस्राएलावर दाविदाच्या घराण्याचे राज्य होते. पण त्यांच्या हातून ते काढून घेऊन मी तुला राजा केले. पण माझा सेवक दावीद याच्यासारखा तू निघाला नाहीस, तो नेहमी माझ्या आज्ञेप्रमाणे वागत असे. मन:पूर्वक मलाच अनुसरत असे. तो योग्य असलेल्या गोष्टी तो करीत असे. पण तुझ्या हस्ते अनेक पातके घडली आहेत. तुझ्या आधीच्या कोणत्याही सत्ताधीशापेक्षा ती अधिक गंभीर आहेत. माझा मार्ग तू केव्हाच सोडून दिला आहेस. तू इतर देवदेवतांच्या मूर्ती केल्यास याचा मला खूप राग आला आहे. 10 तेव्हा यराबाम, तुझ्या घरात मी आता संकट निर्माण करीन. तुझ्या घरातील सर्व पुरुषांचा मी वध करीन. मग तो इस्राएलात बंदीत असो की मोकळा जसे आगीत शेण काहीही शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे मी तुझ्या घराण्याचा समूळ नाश करीन. 11 यराबामाच्या घरातल्या ज्याला नगरात मरण येईल त्यास कुत्री खातील आणि शेतात, रानावनात मरणारा पक्ष्यांचे भक्ष्य होईल. परमेश्वर हे बोलला आहे. 12 अहीया संदेष्टा यराबामाच्या पत्नीशी बोलत राहीला. त्याने तिला सांगितले, आता तू घरी परत जा. तू नगरात शिरल्याबरोबर तुझा पुत्र मरणार आहे. 13 सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याला रीतसर मुठमाती मिळेल असा, यराबामाच्या घराण्यातला हाच राहील. कारण फक्त त्याच्याठायीच इस्राएलचा देव परमेश्वर याला काहीसा चांगूलपणा दिसून आला आहे. 14 परमेश्वर इस्राएलावर नवीन राजा नेमील. तो यराबामाच्या कुळाचा सर्वनाश करील. हे सगळे लवकरच घडेल. 15 मग परमेश्वर इस्राएलाला चांगला तडाखा देईल. इस्राएल लोक त्याने भयभीत होतील. पाण्यातल्या गवतासारखे कापतील. इस्राएलाच्या पूर्वजांना परमेश्वराने ही चांगली भूमी दिली. तिच्यातून या लोकांस उपटून परमेश्वर त्यांना युफ्रटिस नदीपलीकडे विखरुन टाकील. परमेश्वर आता त्यांच्यावर भयंकर संतापलेला आहे, म्हणून तो असे करील. अशेरा मूर्ती त्यांनी उभारली याचा त्यास संताप आला. 16 आधी यराबामाच्या हातून पाप घडले. मग त्याने इस्राएल लोकांस पापाला उद्युक्त केले. तेव्हा परमेश्वर त्यांना पराभूत करील.” 17 यराबामाची पत्नी तिरसा येथे परतली. तिने घरात पाऊल टाकताक्षणीच तिचा पुत्र मेला. 18 सर्व इस्राएल लोकांस त्याच्या मृत्यूचे दु:ख झाले. त्यांनी त्याचे दफन केले. या गोष्टी परमेश्वरच्या भाकिताप्रमाणेच घडल्या. हे वर्तवण्यासाठी त्याने त्याचा सेवक अहीया या संदेष्ट्याची योजना केली होती. 19 राजा यराबामाने आणखीही बऱ्याच गोष्टी केल्या; लढाया केल्या, लोकांवर तो राज्य करत राहिला. इस्राएलाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात, त्याने जे जे केले त्याची नोंद आहे. 20 यराबाम बावीस वर्षे तो राजा म्हणून सत्तेवर होता. नंतर तो मृत्यू पावला आणि आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याचा पुत्र नादाब त्यानंतर सत्तेवर आला.
रहाबामाची कारकीर्द
2 इति. 11:5-12:16
21 शलमोनाचा पुत्र रहबाम यहूदाचा राजा झाला, तेव्हा तो एक्केचाळीस वर्षाचा होता. यरूशलेमेमध्ये त्याने सतरा वर्षे राज्य केले. परमेश्वराने स्वत:च्या सन्मानासाठी सर्व वंशातून या नगराची निवड केली होती. इस्राएलातील इतर नगरामधून त्याने हेच निवडले होते. रहबामाच्या आईचे नाव नामा, ती अम्मोनी होती. 22 यहूदाच्या लोकांच्या हातूनही अपराध घडले याप्रकारे परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते त्यांनी केले. परमेश्वराचा कोप होईल, अशा चुका त्यांच्या हातून होतच राहिल्या. त्यांच्या पूर्वजांच्या पापांपेक्षाही त्यांची पापे वाईट होती. 23 या लोकांनी उंचवटयांवर देऊळे, दगडी स्मारके आणि स्तंभ उभारले. परकीय दैवतासाठी हे सारे होते. प्रत्येक टेकडीवर आणि हिरव्यागार वृक्षाखाली त्यांनी हे केले व अशेरा मूर्ती स्थापिल्या. 24 परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही पुरुष वेश्या त्या देशात होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात यापूर्वी जे लोक राहत असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलाच्या लोकांस दिला होता. 25 रहबामाच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना मिसरचा राजा शिशक याने यरूशलेमेवर स्वारी केली. 26 त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महालातील खजिना लुटला. अरामाचा राजा हददेजर याच्या सैनिकांकडून ज्या शलमोनाने सोन्याच्या ढाली आणल्या होत्या, त्याही त्याने पळवल्या. दाविदाने त्या यरूशलेमेमध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली त्याने नेल्या. 27 मग रहबाम राजाने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या ढाली केल्या, पण या मात्र पितळी होत्या, सोन्याच्या नव्हत्या. महालाच्या दरवाजावर रखवाली करणाऱ्यांना त्याने त्या दिल्या. 28 राजा परमेश्वराच्या मंदिरात जात असे तेव्हा प्रत्येक वेळी हे शिपाई बरोबर असत. ते या ढाली वाहात आणि काम झाल्यावर त्या ढाली ते परत आपल्या ठाण्यात भिंतीवर लटकावून ठेवत. 29 यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा रहबामाच्या सर्व गोष्टींची नोंद आहे. 30 रहबाम यराबाम यांचे परस्परांत अखंड युध्द चाललेले होते. 31 रहबाम मेला आणि त्याचे त्याच्या पूर्वजांबरोबर दफन झाले. दावीद नगरात त्यास पुरले. (याची आई नामा ती अम्मोनी होती) रहबामाचा पुत्र अबीयाम नंतर राज्यावर आला.