14
एके दिवशी असे झाले की, शौलाचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुणाला म्हणाला, “चल आपण पलिष्ट्यांचे ठाणे जे पलीकडे आहे त्याकडे जाऊ.” परंतु त्याने आपल्या बापाला हे सांगितले नाही. शौल गिब्याच्या शेवटल्या भागी मिग्रोनांत डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता त्याच्याजवळचे लोक सुमारे सहाशे होते; एलीचा मुलगा फिनहास याचा मुलगा ईखाबोद याचा भाऊ अहीटूब याचा मुलगा अहीया शिलोत एफोद घातलेला परमेश्वराचा याजक हाही होता. तेव्हा योनाथान गेला हे लोकांस माहित नव्हते. योनाथान ज्या घाटांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यावर जाण्यास पाहत होता त्याच्या एका बाजूला खडकाळ शिखर व दुसऱ्या बाजूला खडकाळ शिखर होते; त्यातल्या एकाचे नांव बोसेस व दुसऱ्याचे नांव सेने असे होते. एक शिखर उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरे दक्षिणेकडे गिब्यासमोर उभे होते. योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण त्या बेसुंत्यांच्या ठाण्यावर जाऊ. कदाचित परमेश्वर आमच्यासाठी कार्य करील; कारण बहुतांनी किंवा थोडक्यांनी सोडायला परमेश्वरास काही अडचण नाही.” त्याचा शस्त्रवाहक त्यास म्हणाला, “जे तुझ्या मनात आहे ते सगळे कर. तू पुढे जा, पाहा तुझ्या आज्ञा पालन करण्यास मी तुझ्याबरोबर आहे.” तेव्हा योनाथान म्हणाला, “पाहा आपण त्या मनुष्याकडे जाऊन त्यास प्रगट होऊ. जर ते आम्हास म्हणतील, ‘आम्ही तुम्हाकडे येऊ तोपर्यंत थांबा,’ तर आम्ही आपल्या ठिकाणी उभे राहू वर त्याच्याकडे जाणार नाही; 10 परंतु जर ते म्हणतील की, ‘वर आम्हाकडे या,’ तर आम्ही वर जाऊ; कारण परमेश्वराने त्यांना आमच्या हाती दिले आहे. हेच आम्हांला चिन्ह होईल.” 11 मग त्या दोघांनी आपणांला पलिष्ट्यांच्या ठाण्यातील मनुष्यांना प्रगट केले. पलिष्ट्यांनी म्हटले, “पाहा ज्या गुहांमध्ये इब्री लपले होते त्यातून ते निघून येत आहेत.” 12 ठाण्याच्या मनुष्यांनी योनाथान व त्याचा शस्त्रवाहक यांना उत्तर देऊन म्हटले, “वर आम्हाकडे या म्हणजे आम्ही तुम्हास काही गोष्टी दाखवू.” तेव्हा योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “माझ्यामागे वर ये; कारण परमेश्वराने त्यांना इस्राएलाच्या हाती दिले आहे.” 13 मग योनाथान आपल्या हातांनी व आपल्या पायांनी चढून गेला आणि त्याचा शस्त्रवाहक त्याच्या मागोमाग चढून गेला. तेव्हा योनाथानासमोर पलिष्टी पडले व त्याच्यामागून त्याचा शस्त्रवाहक त्यांना मारीत गेला. 14 जो पहिला वध योनाथानाने केला त्यामध्ये एक बिघा भूमीवर सुमारे वीस माणसे पडली. 15 छावणीत शेतात व सर्व लोकांमध्ये कंप झाला, ते ठाणे व छापे मारणारेही कापले व भूमी कापली. तेथे तर फार घबराट पसरली होती. 16 तेव्हा बन्यामिनातील गिब्यांतल्या शौलाच्या पहारेकऱ्यांनी पाहिले की पलिष्टी सैन्याचा जमाव पांगत आहे आणि ते इकडे तिकडे पळत आहेत. 17 मग शौल आपल्याबरोबरच्या लोकांस म्हणाला, “आमच्यामधून कोण गेला आहे? मोजून पाहा.” मग त्यांनी मोजून पाहिले तर योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तेथे नव्हते. 18 शौलाने अहीयाला म्हटले, “देवाचा कोश इकडे आण.” कारण त्या वेळी देवाचा कोश इस्राएल लोकांच्यामध्ये होता. 19 असे झाले की शौल याजकाशी बोलत असता पलिष्ट्यांच्या छावणीतला गलबला वाढत वाढत मोठा झाला. तेव्हा शौलाने याजकाला म्हटले, “आपला हात काढून घे.” 20 तेव्हा शौल व त्याच्याजवळ ते सर्व लोक जमून लढाईला गेले. आणि पाहा प्रत्येक पलिष्टी मनुष्याची तलवार आपल्या सोबत्याच्या विरूद्ध झाली म्हणून फार मोठी दाणादाण उडाली. 21 तेव्हा जे इब्री पूर्वी पलिष्ट्याच्यामध्ये राहिले होते जे चहूकडून त्याच्याबरोबर छावणीत गेले होते तेही शौल व योनाथान याच्याबरोबर जे इस्राएल होते त्याच्याशी मिळाले. 22 जी इस्राएली माणसे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशांत लपली होती ती सर्व पलिष्टी पळत आहेत हे ऐकून लढाईत त्याच्या पाठीस लागली. 23 असे परमेश्वराने त्यादिवशी इस्राएलास सोडवले आणि लढाई बेथ-आवेनाकडे गेली. 24 त्या दिवशी इस्राएली पुरुष निराश झाले कारण शौलाने लोकांस शपथ घालून सांगितले होते, संध्याकाळपर्यंत मी आपल्या शत्रूचा सूड घेईपर्यंत जो पुरुष काही खाईल त्यास शाप लागो. म्हणून लोकांतल्या कोणी काही खाल्ले नाही. 25 देशातले सर्व लोक वनांत आले आणि भूमीवर मध होता; 26 वनांत लोक आले तेव्हा पाहा मधाचा ओघ वाहत होता. परंतु कोणी आपला हात आपल्या तोंडाला लावला नाही कारण लोक शपथेला भीत होते. 27 परंतु जेव्हा त्याच्या वडिलाने लोकांस शपथ घातली तेव्हा योनाथानाने ती ऐकली नव्हती म्हणून त्याने आपल्या हाती जी काठी होती तिचे टोक पुढे करून मधाच्या मोहळात घालून आपल्या तोंडास लावले; मग त्याचे डोळे टवटवीत झाले. 28 तेव्हा लोकांतील एकाने उत्तर करून म्हटले, “तुझ्या वडिलाने लोकांस शपथ घालून निक्षून सांगितले की, जो कोणी आज काही अन्न् खाईल त्यास शाप लागो.” लोक तर थकले होते. 29 तेव्हा योनाथान म्हणाला, “माझ्या वडिलाने देशास दुखीत करून सोडला आहे. मी हा थोडा मध चाखला आणि पाहा माझे डोळे कसे टवटवीत झाले आहेत? 30 जर लोकांनी आपल्या शत्रूंच्या मिळालेल्या लुटीतून आज इच्छेप्रमाणे खाल्ले असते तर कितीतरी बरे होते! कारण आता पलिष्टांचा आधिक मोठा घात झाला नसता काय?” 31 त्या दिवशी ते मिखमाशापासून अयालोनापर्यंत पलिष्ट्यांना मारीत गेले. मग लोक फार थकलेले होते. 32 तेव्हा लोक लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे, गुरे व वासरे घेऊन भूमीवर कापून रक्तासहित खाऊ लागले. 33 तेव्हा कोणी शौलास सांगितले की, “पाहा लोक रक्तासह मांस खाऊन परमेश्वराच्या विरूद्ध पाप करत आहेत.” त्याने म्हटले, “तुम्ही अविश्वासूपणे कृत्ये करत आहात. मोठा दगड लोटून येथे माझ्याकडे आणा.” 34 शौलाने म्हटले, “लोकांमध्ये धावत जाऊन त्यांना सांगा की, प्रत्येक मनुष्याने आपला बैल व प्रत्येक मनुष्याने आपली मेंढरे माझ्याकडे आणून येथे कापावी मग खावे; रक्तासह खाऊन परमेश्वराविरूद्ध पाप करू नका.” तेव्हा सर्व लोकांनी प्रत्येक मनुष्याने आपापले बैल आपल्या हाताने त्या रात्री आणून तेथे कापले. 35 मग शौलाने परमेश्वरास अर्पणे अर्पिण्यासाठी वेदी बांधली, जी पहिली वेदी त्याने परमेश्वरास अर्पणे अर्पिण्यासाठी बांधली ती हीच होती. 36 मग शौल बोलला, “आपण रात्री पलिष्ट्यांच्यामागे खाली जाऊन उद्या उजाडेपर्यंत त्याच्यांतली लूट घेऊ आणि आपण त्यांच्यातील एकही पुरुष राहू देऊ नये.” ते म्हणाले, “जे तुला बरे वाटेल ते कर.” मग याजकाने म्हटले आपण येथे परमेश्वराजवळ येऊ. 37 मग शौलाने देवाला विचारले, “मी पलिष्ट्यांच्या मागे खाली जाऊ काय? तू त्यांना इस्राएलांच्या हाती देशील काय?” परंतु त्या दिवशीं देवाने काही उत्तर दिले नाही. 38 मग शौल म्हणाला, “अहो लोकांच्या सर्व पुढाऱ्यांनो इकडे या आणि हे पाप कशाने घडले आहे ते शोध करून पाहा. 39 कारण परमेश्वर जो इस्राएलाचे रक्षण करतो तो जिवंत आहे. म्हणून हे पाप माझा मुलगा योनाथान याने जरी केले, तरी तो खचित मरेल.” पण सर्व लोकांतील कोणीही त्यास उत्तर दिले नाही. 40 मग त्याने सर्व इस्राएलांस म्हटले, “तुम्ही एका बाजूला व्हा आणि मी व माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला होऊ.” लोक तर शौलाला म्हणाले, “तुला बरे वाटेल ते कर.” 41 मग शौल परमेश्वर इस्राएलाचा देव, यास म्हणाला, “खरे ते दाखीव.” तेव्हा योनाथान व शौल धरले गेले आणि लोक सुटले. 42 मग शौलाने म्हटले, “माझ्यामध्ये व योनाथान माझा मुलगा याच्यामध्ये पण चिठ्ठ्या टाका.” तेव्हा योनाथान धरला गेला. 43 मग शौल योनाथानाला म्हणाला, “तू काय केले आहेस ते सांग.” योनाथान त्यास म्हणाला, “मी आपल्या हातातल्या काठीच्या टोकाने थोडा मध चाखला खरा, आणि पाहा मला मरण पावले पाहिजे.” 44 तेव्हा शौल म्हणाला, “परमेश्वर तसे व त्यापेक्षा अधिकही करो; योनाथाना तुला तर खचित मरण पावले पाहिजे.” 45 मग लोक शौलाला म्हणाले, “ज्याने इस्राएलाचे हे मोठे तारण केले तो योनाथान मरावा काय? ते तर दूरच असो! परमेश्वर जिवंत आहे. याच्या डोक्याचा एक केसही भूमीवर पडणार नाही. कारण याने परमेश्वराच्याबरोबर काम केले आहे.” या प्रकारे लोकांनी योनाथानाला सोडवले म्हणून तो मेला नाही. 46 मग शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून वर गेला; पलिष्टीही आपल्या ठिकाणी गेले. 47 शौलाने तर इस्राएलावर राज्य करण्याचे हाती घेतले; त्याने चहूकडे आपल्या सर्व शत्रूशी म्हणजे मवाबी यांच्याशी व अम्मोनाच्या संतानाशी व अदोमी यांच्याशी व सोबाच्या राजांशी व पलिष्ट्यांशी लढाई केली आणि जेथे कोठे तो गेला तेथे त्याने त्यांना त्रासून सोडले. 48 त्याने पराक्रम करून अमालेकाला मार दिला आणि इस्राएलांना त्यांच्या लुटणाऱ्यांच्या हातातून सोडवले. 49 योनाथान, इश्वी व मलकीशुवा हे शौलाचे पुत्र होते, आणि त्याच्या दोघी मुलींची नांवे, प्रथम जन्मलेली, मेरब आणि धाकटीचे नांव मीखल, ही होती. 50 शौलाच्या पत्नीचे नाव अहीनवाम, ती अहीमासाची मुलगी होती. शौलाचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता. 51 शौलाचा बाप कीश; अबनेराचा बाप नेर हा अबीएलाचा मुलगा होता. 52 शौलाच्या सर्व दिवसात पलिष्ट्यांशी जबर लढाई चालू होती. शौल कोणी बलवान किंवा कोणी शूर मनुष्य पाही, तेव्हा तो त्यास आपल्याजवळ ठेवून घेई.