The First Epistle of Paul to the
Thessalonians
पौलाचे थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र
लेखक
प्रेषित पौलाने स्वतःला या पत्राचा लेखक म्हणून दोनदा संबोधले आहे (1:1; 2:18). सीला आणि तीमथ्य (3:2, 6), मंडळीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या सुवार्ता फेरी मधील पौलाचा प्रवास (प्रेषित 17:1-9), त्याने हे पत्र ते सोडून गेल्यावर काही महिन्यांच्या आत विश्वास ठेवणाऱ्यांना लिहिले. थेस्सलनीका येथील पौलाच्या सेवेने अर्थातच फक्त यहूद्यांनाच नाही तर अन्य जातीय लोकांनाही स्पर्श केले. मंडळीतील अनेक अन्य जातीय मूर्तीपूजेतून बाहेर आले होते, जे त्या काळातील यहूद्यांमध्ये विशिष्ट समस्या नव्हती (1 थेस्सल. 1:9).
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ.स. 51.
पौलाने करिंथ शहरातील थेस्सलनीका येथील मंडळीला आपले पहिले पत्र लिहिले.
प्राप्तकर्ता
जरी हे सर्वसाधारणपणे सर्वत्र ख्रिस्ती लोकांशी बोलत असले तरी, 1 थेस्स. 1:1 थेस्सलनीकाकरांना पहिल्या पत्राचे अपेक्षित वाचक म्हणून “थेस्सलनीका येथील मंडळी” च्या सदस्यांना ओळखते.
हेतू
पौलाचा हे पत्र लिहिण्याचा उद्देश होता कि नवीन रुपांतरीत लोकांना त्यांच्या परीक्षेत उत्तेजन देणे (3:3-5), धार्मिक जीवन जगण्याकरिता सूचना देणे (4:1-12) आणि ख्रिस्ताच्या परत येण्याआधी मरणाऱ्या विश्वासणाऱ्यांच्या भविष्याबद्दल आश्वासन देणे. (4:13-18), काही इतर, नैतिक आणि व्यावहारिक गोष्टी सुधारण्यासाठी हे पत्र लिहिले.
विषय
मंडळीच्या संबंधित काही गोष्टी
रूपरेषा
1. धन्यवाद देणे — 1:1-10
2. प्रेषितीय क्रियांचे संरक्षण — 2:1-3:13
3. थेस्सलनीकाकरांसाठी उपदेश — 4:1-5:22
4. समाप्तीची प्रार्थना आणि निष्ठा — 5:23-28
1
नमस्कार व उपकारस्तुती
देवपिता व प्रभू येशू ख्रिस्ता याच्यात असलेली थेस्सलनीका शहरातील मंडळी हिला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्याच्याद्वारे तुम्हास कृपा व शांती असो.
आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो. आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेली सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो. बंधूंनो, तुम्ही देवाचे प्रिय आहात, तुमची झालेली निवड आम्हास ठाऊक आहेच; कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हास कळविण्यात आली तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला; अशाने मासेदोनिया व अखया ह्यांतील सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना तुम्ही उदाहरण असे झाला आहात. मासेदोनिया व अखया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे; इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाची बातमीही सर्वत्र पसरली आहे; ह्यामुळे त्याविषयी आम्हास काही सांगायची गरज नाही. कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळला आणि जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्यास, 10 आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास, तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मरण पावलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.