17
यहोशाफाटाच्या राज्याची मजबुती
आसाच्या जागी आता यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र इस्राएलाशी तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटाने आपले बळ वाढवले. त्याने यहूदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या आसाने काबीज केलेल्या एफ्राइमाच्या नगरांमध्ये तसेच यहूदामध्ये त्याने तटबंदी असलेली ठाणी वसवली. यहोशाफाटाला परमेश्वराचा पाठिंबा होता कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्ये केली होती. तो बआल देवतेच्या भजनी लागला नाही. आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या इतर इस्राएल लोकांसारखा तो वागला नाही. परमेश्वराने यहोशाफाटाकरवी राज्य बळकट केले. यहूदाच्या लोकांनी यहोशाफाटासाठी नजराणे आणले त्यामुळे त्यास धन तसेच बहुमान मिळाला. परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटाचे मन रमले. यहूदा प्रांतातील उच्चस्थाने आणि अशेरा देवीच्या मूर्ती त्याने काढून टाकल्या. आपल्या राज्याच्या तिसऱ्या वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून यहूदी लोकांस शिकवण द्यायला पाठवले. बेन-हईल, ओबद्या, जखऱ्या, नथनेल आणि मीखाया हे ते सरदार होते. त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असाएल, शामीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया आणि तोब अदोनीया या लेवीचीही त्याने रवानगी केली. अलीशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले. हे सरदार, लेवी आणि याजक सर्व लोकांस शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहूदातील गावोगावी जाऊन ते लोकांस शिकवत गेले. 10 यहूदाच्या आसपासच्या राजसत्तांनी परमेश्वराची धास्ती घेतली, त्यामुळे त्यांनी यहोशाफाटाबरोबर युध्द केले नाही. 11 कित्येक पलिष्टयांनी यहोशाफाटासाठी चांदीच्या भेटी आणल्या. काही अरबी शेळ्यामेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे सात हजार सातशे मेंढेरे आणि सात हजार सातशे बोकड त्यास दिले. 12 यहोशाफाटाचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहूदात किल्ले आणि कोठारांची नगरे बांधली. 13 यहूदाच्या नगरात त्याची भरपूर कामे चालत असत. यरूशलेमामध्ये यहोशाफाटाने चांगली बळकट, धीट लढाऊ माणसेही ठेवली. 14 आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे यहूदातील सरदार असे अदना हा तीन लाख सैनिकांचा सेनापती होता. 15 यहोहानानाच्या हाताखाली दोन लाख ऐंशी हजार सैनिक होते. 16 जिख्रीचा पुत्र अमस्या हा त्या खालोखाल दोन लाख योध्दाचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते. 17 बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे: एल्यादाच्या अखत्यारीत दोन लाख सैनिक धनुष्यबाण आणि ढाल वापरण्यात तरबेज होते. एल्यादा हा एक अतिशय शूर योध्दा होता. 18 यहोजाबादाकडे युध्दसज्ज असे एक लाख ऐंशी हजार पुरुष होते. 19 ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. याखेरीज यहूदाच्या सर्व नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.