23
योशीयाने केलेल्या सुधारणा
2 इति. 34:29-35:19
1 राजा योशीया याने यहूदा आणि यरूशलेम येथील सर्व वडिलधाऱ्यांना निरोप पाठवून बोलावून घेतले. 2 मग राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्याच्या मागोमाग यहूदा आणि यरूशलेम येथे राहणारे लोकही गेले. अगदी सामान्य मनुष्यापासून याजक, संदेष्टे यांच्यासारख्या महत्वाच्या व्यक्तीपर्यंत झाडून सर्वजण राजाच्या बरोबर गेले. मग राजाने परमेश्वराच्या मंदिरात सापडलेले कराराचे पुस्तक काढून त्यातील सर्व वचने सगळ्यांना ऐकू जातील अशी वाचली. 3 स्तंभाजवळ उभे राहून राजाने परमेश्वराशी करार केला. “त्याने परमेश्वराची सर्व वचने, करार, नियम पाळायचे कबूल केले.” पुस्तकात लिहिलेले सर्व मनोभावे पाळायचे त्याने आश्वासन दिले. राजाने केलेल्या या कराराला पाठिंबा दशर्विण्यासाठी सर्वजण उठून उभे राहिले. 4 मग बआलदैवत, अशेरा, नक्षत्रे यांच्या पूजेसाठी केलेली सर्व पात्रे परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढण्यात यावीत अशी आज्ञा राजाने हिल्कीया, इतर याजक आणि द्वारपाल यांना दिली. मग त्याने ती यरूशलेम बाहेरच्या किद्रोनच्या शेतात जाळली व त्यांची राख बेथेल येथे नेली. 5 यहूदाच्या राजांनी याजक म्हणून जी माणसे निवडली होती ती सामान्य माणसे होती, आहरोन कुळातली नव्हती! हे भोंदू याजक यहूदाच्या सर्व नगरामध्ये तसेच यरूशलेम सभोवतीच्या गावांतून उंचस्थानावरील पूजास्थळांपुढे सर्रास धूप जाळत होते. बआल, सूर्य, चंद्र, नक्षत्रे आणि आकाशातील इतर तारे यांच्यासाठी ते धूप जाळत. मग हिज्कीयाने या याजकांवर बंदी घातली. 6 योशीयाने परमेश्वराच्या मंदिरातून अशेराचा स्तंभ काढून तो यरूशलेमेबाहेर किद्रोन खोऱ्यात नेऊन जाळून टाकले. नंतर त्याने जळलेल्या भागाच्या तुकड्यांची राख केली. ती सामान्य लोकांच्या थडग्यांवर विखरुन टाकली. 7 परमेश्वराच्या मंदिरातील पुरुष वेश्यांची घरे योशीयाने उद्ध्वस्त केली. बायकाही या घरांचा वापर करत आणि अशेरा या देवतेच्या सन्मानार्थ लहान तंबू आच्छादने तयार करत असत. 8 योशीयाने यहूदा नगरातील सर्व याजक आणले व गिबापासून बैर-शेब्यापर्यंत ज्या उंचस्थानात धूप जाळला होता ती भ्रष्ट केली. दरवाजांची उंचस्थाने, जो नगराचा अधिकारी यहोशवा याच्या वेशींच्या प्रवेशाजवळ होती ती त्याने मोडली. 9 तरी याजक परमेश्वराची वेदी जी यरूशलेमेत होती तीच्याकडे चढून जात नव्हते, पण आपल्या भावांमध्ये बेखमीर भाकरी खात होते. पण राजाने ही उंचस्थाने मोडली आणि याजकांना यरूशलेमेला आणले. नगराधिकारी यहोशवा याच्या वेशीजवळची डावीकडील उंचस्थानेही योशीयाने उद्ध्वस्त केली. 10 हिन्नोमच्या मुलाचे खोरे याठिकाणी तोफेत हे एक ठिकाण होते. तेथे लोक मोलख या दैवताला आपल्या मुलांचा बली देत आणि वेदीवर त्यांना जाळत. योशीयाने हे स्थान पुन्हा वापरता येऊ नये असे भ्रष्ट करून टाकले. 11 पूर्वीच्या राजांनी परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एक रथ आणि काही घोडे ठेवलेले होते. नाथान-मेलेक या अधिकाऱ्याच्या खोलीजवळ ही जागा होती. हे घोडे आणि रथ सूर्थ दैवतांच्या सन्मानार्थ यहूदाच्या राजाने दिले होते. योशीयाने हे घोडे तेथून हलवले आणि रथ जाळून टाकला. 12 आहाजच्या इमारतीच्या गच्चीत पूर्वी यहूदाच्या राजांनी वेद्या बांधल्या होत्या. परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही चौकातही मनश्शेने वेद्या बांधल्या होत्या. योशीयाने या सर्व वेद्यांची मोडतोड करून किद्रोनच्या खोऱ्यात त्यांचे भग्नावशेष टाकून दिले. 13 यरूशलेमजवळच्या विध्वंसगिरी नावाच्या पहाडावर इस्राएलाचा राजा शलमोनने काही उच्चस्थाने पूर्वी बांधली होती. पहाडाच्या ती दक्षिणेला होती. सीदोन्यांची अमंगळ देवी अष्टारोथ, मवाब्यांची अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांची अमंगळ देवता मिलकोम यांच्यासाठीही उच्चस्थाने त्याने बांधली होती. पण ही सर्व स्थाने राजा योशीयाने भ्रष्ट केली. 14 त्याने सर्वच्या सर्व स्मृतीस्तंभ आणि अशेराचे खांब यांची पार मोडतोड केली आणि त्या ठिकाणावर मृत मनुष्यांच्या अस्थी पसरुन टाकल्या. 15 नबाटचा मुलगा यराबाम याने बांधलेली बेथेलमधली वेदी आणि उच्चस्थानेही योशीयाने उध्वस्त केली. या यराबामाने इस्राएलाला पाप करायला लावले होते. योशीयाने त्या बांधकामांची मोडतोड करून त्याची अगदी माती केली. अशेरा स्तंभही त्याने जाळून टाकला. 16 योशीयाने डोंगरावर इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्यास काही कबरी दिसल्या. तेव्हा त्याने माणसे पाठवून त्यातील हाडे आणली. ती हाडे त्याने वेदीवर जाळली आणि ते स्थान अपवित्र केले. संदेष्ट्याने जो परमेश्वराचा संदेश घोषित केला होता त्याप्रमाणेच हे झाले. यराबाम वेदीजवळ उभा असताना संदेष्ट्याने हे सांगितले होते. पुन्हा पाहिले तेव्हा योशीयाला संदेष्ट्याची कबर दिसली. 17 योशीयाने विचारले, “हे थडगे कोणाचे?” तेव्हा गावातील लोकांनी त्यास सांगितले, “हे यहूदातून आलेल्या देवाच्या मनुष्याचे थडगे. तू बेथेलच्या वेदीची जी दशा करून टाकलीस त्याबद्दल त्याने फार पूर्वीच भाकित केले होते.” 18 तेव्हा योशीया म्हणाला, “या थडग्याला धक्का लावू नका, तेथील अस्थी हलवू नका.” मग त्यांनी त्याच्या अस्थी शोमरोनाहून आलेल्या संदेष्ट्याच्या अस्थींबरोबर राहू दिल्या. 19 शोमरोनच्या नगरामधील उच्चस्थानांवरील सर्व दैवतेही योशीयाने उद्ध्वस्त केली. ही दैवते इस्राएलच्या राजांनी बांधली होती आणि त्यामुळे परमेश्वराचा कोप झाला होता. बेथेलमधील वेदीप्रमाणेच योशीयाने या दैवतांची गत करून टाकली. 20 शोमरोन मधील उच्चस्थानांच्या सर्व याजकांना योशीयाने ठार केले. त्या वेदीवरच त्याने त्यांना मारले. वेदीवर मनुष्यांची हाडे जाळली. अशाप्रकारे सर्व पूजास्थळांची मोडतोड करून मग तो यरूशलेमेला परतला.
वल्हांडण सण पाळण्यात येतो
21 राजा योशीयाने सर्व लोकांस आज्ञा केली, “करारात लिहिले आहे त्या पध्दतीने तुमच्या परमेश्वर देवासाठी वल्हांडण सण साजरा करा.” 22 इस्राएलवर न्यायाधीश राज्य करत होते तेव्हापासून लोकांनी वल्हांडण सण अशा पध्दतीने साजरा केला नव्हता. यहूदाच्या किंवा इस्राएलच्या कोणत्याही राजाने त्यानिमित्त उत्सव केला नव्हता. 23 योशीयाचे राजा म्हणून अठरावे वर्ष चालू असताना लोकांनी परमेश्वरास उद्देशून यरूशलेमेत वल्हांडण सण साजरा केला.
यहूदावर परमेश्वराचा सतत क्रोध
24 यहूदा आणि यरूशलेमामध्ये लोक पूजत असलेल्या मांत्रिक (भूतसंचारी) चेटकी, गृहदेवता आणि अनेक अमंगळ गोष्टींचा नाश योशीयाने केला. परमेश्वराच्या मंदिरात याजक हिल्कीयाला जे नियमशास्त्राचे पुस्तक सापडले त्या बरहुकूम योशीयाने हे केले. 25 योशीयासारखा राजा यापूर्वी झाला नव्हता. योशीया पूर्णपणे परमेश्वराचा उपासक बनला मोशेच्या कराराचे पालन योशीयाइतक्या काटेकोरपणे कुठल्याच राजाने केले नव्हते. आणि त्यानंतरही तसा राजा झाला नाही. 26 पण तरीही यहूदावरील परमेश्वराचा राग ओसरला नाही. मनश्शेच्या वर्तनाबद्दल अजूनही त्यास राग होता. 27 परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलांना हुसकावून लावले तसेच यहूद्यांना करीन त्यांना मी नजरेपुढून घालवीन. यरूशलेमचाही मी त्याग करीन. मीच ते नगर निवडले हे खरे पण तेथील मंदिराची मी मोडतोड करीन. माझे नाव राखणारी जागा असे याच स्थळाबद्दल मी म्हणत होतो.”
योशीयाचा मृत्यू
2 इति. 35:20-36:1
28 “यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात योशीयाच्या इतर गोष्टींची हकिकत आहे.” 29 योशीयाच्या कारकिर्दीत, मिसरचा राजा फारो-नखो याने फरात नदीजवळ अश्शूरच्या राजावर स्वारी केली. तेव्हा योशीया फारो-नखोवर चाल करून गेला. पण मगिद्दो येथे फारो-नखोने त्यास पाहिले आणि ठार केले. 30 योशीयाच्या सेवकांनी त्याचा मृतदेह रथात घालून मगिद्दोहून यरूशलेमेला आणला. त्यास त्याच्या कबरीत पुरले. मग देशातील लोकांनी त्याचा मुलगा यहोआहाज याला अभिषेक केला आणि त्यास पुढचा राजा केले.
यहोआहाजाची कारकीर्द व पदच्युती
2 इति. 36:1-4
31 यहोआहाज तेव्हा तेवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर तीन महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल लिब्नाच्या यिर्मया याची ती मुलगी. 32 यहोआहाज परमेश्वराच्या दृष्टीने गैर वागला. त्याचे वर्तन आपल्या पूर्वजांसारखेच होते. 33 फारो-नखोने हमाथ देशातील रिब्ला येथे यहोआहाजाला बेड्या घातल्या. त्यामुळे यहोआहाजाला यरूशलेमामध्ये राज्य करता येईना. फारो-नखोने यहूदाकडून एक हजार किक्कार *साधारण 34,000 किलोग्रामचांदी आणि एक किक्कार †साधारण 34 किलोग्रामसोने जबरदस्तीने वसूल केले. 34 फारो-नखोने योशीयाचा मुलगा एल्याकीम याला राजा केले एल्याकीम गादीवर आला. एल्याकीमचे नाव फारो-नखोने बदलून यहोयाकीम केले; आणि यहोआहाजाला मिसरला नेले. यहोआहाज तेथे मरण पावला. 35 यहोयाकीमाने फारोला सोनेचांदी दिले तरी फारो नखोयास देण्यासाठी सामान्य लोकांवर कर बसवला. तेव्हा प्रत्येकाला आपल्या वाटचे थोडे सोने रुपे द्यावे लागले. यहोयाकीमाने मग फारो नखोयास पैसे दिले.
यहोयाकीमाची कारकीर्द
36 यहोयाकीम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदा. ती रुमा येथील पदाया याची मुलगी. 37 यहोयाकीमचे वर्तन परमेश्वरास न पटणारे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच तो गैर वागला.