17
अहिथोफेलाने दिलेली मसलत हूशय हाणून पाडतो
1 त्यानंतर अहिथोफेलने अबशालोमला सांगितले, मला आता बारा हजार मनुष्यांची निवड करू दे, म्हणजे आज रात्रीच मी दावीदाचा पाठलाग करतो. 2 तो थकला भागलेला असताना भयभीत झालेला असतानाच मी त्यास पकडीन. हे पाहून त्याचे लोक पळ काढतील फक्त राजा दावीदाचा मी वध करीन. 3 बाकीच्यांना तुझ्या समक्ष हजर करीन. तो मेल्याची खात्री झाली की सगळे लोक तक्रार न करता परत येतील. 4 अबशालोम आणि इस्राएलमधील सर्व वडीलधारी मंडळी यांना हा बेत पसंत पडला. 5 पण तरीसुध्दा अबशालोम म्हणाला हूशय अर्की यालाही बोलावून घ्या. त्याचे म्हणणेही मला ऐकून घ्यायचे आहे. 6 मग हूशय अबशालोमकडे आला अबशालोम त्यास म्हणाला, अहिथोफेलची योजना अशी आहे. तुला त्यावर काय वाटते? तसे करावे की नाही ते सांग. 7 हूशय अबशालोमला म्हणाला, अहिथोफेलचा सल्ला आता या घटकेला तरी रास्त नाही. 8 तो पुढे म्हणाला, तुमचे वडील आणि त्यांच्या बाजूचे लोक चांगले बळकट आहेत हे तुम्ही जाणताच. त्यातून ते आता पिल्ले हिरावून नेलेल्या रानातल्या अस्वलासारखे चिडलेले आहेत. तुमचे वडील एक कुशल योद्धा आहेत. ते भरवस्तीत रात्रभर मुक्काम करणार नाहीत. 9 एखाद्या गुहेत किंवा निर्जन ठिकाणी ते कदाचित गेले सुध्दा असतील. त्यांनी तुमच्या लोकांवर आधी हल्ला केला तर लोक ते ऐकून म्हणतील, अबशालोमचे लोक हरत चाललेले दिसत आहेत. 10 मग तर सिंहासारख्या शूरलोकांचेही धैर्य खचेल कारण तुमचे वडील पराक्रमी आहेत आणि त्यांच्या बाजूची माणसे शूर आहेत हे सर्वच इस्राएल लोकांस ठाऊक आहे. 11 तेव्हा मी असे सुचवतो तुम्ही दानपासून बैर-शेबापर्यंत सर्व इस्राएल लोकांस एकत्र आणा म्हणजे वाळवंटाप्रमाणे विशाल सैन्य तयार होईल मग तुम्ही स्वत:युध्दात उतरा. 12 दावीद जेथे लपला असेल तेथून आम्ही त्यास धरून आणू जमिनीवर दव पडावे तसे आम्ही त्याच्यावर तुटून पडू दावीदाला त्याच्या बरोबरच्या मनुष्यांसहीत आम्ही ठार करू कुणालाही सोडणार नाही. 13 पण दावीदाने एखाद्या नगरात आश्रय घेतलेला असेल तर दोरखंड आणून आम्ही सर्व इस्राएल लोक ते नगर ओढून दरीत ढकलू, मग एक धोंडासुध्दा त्याठिकाणी शिल्लक राहणार नाही. 14 अबशालोम आणि सर्व इस्राएल लोक म्हणाले, अहिथोफेलपेक्षा हूशय अर्की याचा सल्ला चागंला आहे. आणि तो सर्व लोकांस पसंत पडला, कारण ती परमेश्वराची योजना होती. अबशालोमला अद्दल घडावी म्हणून अहिथोफेलचा चांगला सल्ला थोपवून कुचकामी ठरवण्याचा तो परमेश्वराचा बेत होता. अशा प्रकारे तो अबशालोमला अद्दल घडवणार होता. 15 हूशयने हे सर्व सादोक आणि अब्याथार या याजकांच्या कानावर घातले. अबशालोम आणि इस्राएलमधील वडील मंडळी यांना अहिथोफेलने जे सुचवले ते हूशयने या दोघांना सांगितले. तसेच आपण काय सुचवले तेही सविस्तर सांगितले. हूशय म्हणाला, 16 आता त्वरा करा ताबडतोब दावीदा कडे निरोप जाऊ द्या नदीच्या उताराजवळ राहू नका असे त्यांना सांगा. ताबडतोब यार्देन नदी ओलांडून जायला सांगा म्हणजे ते आणि त्यांच्या बरोबरची माणसे पकडली जाणार नाहीत. 17 योनाथान आणि अहीमास ही याजकांची मुले एन-रोगेल येथे थांबली त्यांना गावात शिरताना कुणी पाहू नये म्हणून एक दासी त्यांच्याकडे आली तिने त्यांना निरोप सांगितला तो त्यांनी राजा दावीदाकडे पोचवला. 18 पण एका मुलाने योनाथान आणि अहीमास यांना पाहिले हे अबशालोमला सांगायला तो धावत निघाला. योनाथान आणि अहीमास तेथून चटकन् निघाले. ते बहूरीम येथे एकाच्या घरी पोचले. त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती. त्यामध्ये उतरून ते लपले. 19 त्या मनुष्याच्या पत्नीने आडावर एक चादर पसरून वर धान्य ओतले. त्यामुळे तिथे धान्याची रास आहे असे दिसू लागले. तेव्हा तिथे योनाथान आणि अहीमास लपले असतील अशी शंकाही कोणाला आली नाही. 20 अबशालोमाकडील नोकर त्या घरातल्या स्त्रीकडे आले. त्यांनी योनाथान आणि अहीमासचा ठावठिकाणा विचारला. ते थोड्या वेळापूर्वीच ओहळ ओलांडून गेल्याचे तिने त्यांना सांगितले. मग अबशालोमचे ते नोकर योनाथान आणि अहीमास यांच्या शोधार्थ निघाले. पण ते कुठेच न सापडल्यामुळे हे नोकर यरूशलेमेला परत गेले. 21 इकडे अबशालोमचे नोकर निघून जातात, तो योनाथान आणि अहीमास विहिरीतून बाहेर पडले. तडक राजा दावीदाकडे जाऊन ते त्यास म्हणाले, असाल तसे निघा आणि नदी ओलांडून पलीकडे जा. अहिथोफेलने तुमच्याविरुध्द असे सांगितले आहे. 22 तेव्हा दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांसह यार्देन नदी ओलांडली सूर्य वर यायच्या आत सर्वजण पलीकडे पोहोंचले होते. 23 इस्राएल लोकांनी आपला सल्ला मानला नाही हे अहिथोफेलच्या लक्षात आले. त्याने गाढवावर खोगीर टाकले आणि आपल्या गावाकडे प्रयाण केले. घरच्यांची पुढली तरतूद केली आणि स्वत:ला फास लावून घेतला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याचे त्याच्या वडीलांच्या कबरेतच दफन केले.
महनाईम येथे दावीद
24 दावीद महनाईम येथे आला अबशालोमने सर्व इस्राएलीं समवेत यार्देन नदी ओलांडली. 25 अबशालोमने अमासा याला सेनापती केले. यवाबाची जागा अमासाने घेतली. अमासा इस्राएली *इश्माएलीइथ्राचा पुत्र. अमासाची आई अबीगईल. सरुवेची बहीण नाहाश हिची ही अबीगल कन्या. सरुवे यवाबाची आई. 26 अबशालोम आणि त्याच्या बरोबरचे इस्राएल लोकांनी गिलाद प्रांतात मुक्काम केला. 27 दावीद महनाईम येथे आला शोबी, माखीर आणि बर्जिल्लय तेथेच होते. नाहाशचा मुलगा शोबी हा अम्मोन्यांच्या राब्बा नगरातला होता. अम्मीएलचा मुलगा माखीर हा लो-दबार तर बर्जिल्ल्य गिलाद येथील रोगलीमचा होता. 28 ते म्हणाले, हे वाळवंटातील लोक थकले भागलेले आणि तहानलेले भुकेलेले असे आहेत. त्यांनी दावीद आणि इतर सर्वजणांसाठी बरेचसे खायचे प्यायचे पदार्थ आणले. तसेच बिछाने, भांडीकुंडी सुध्दा ते घेऊन आले. 29 गहू जव, कणीक, हुरडा, शेंगा, डाळी, वाटाणे, मध, लोणी, मेंढरे तसेच गाईच्या दुधाचे पनीर याही वस्तू त्यांनी आणल्या.