24
1 पाच दिवसानंतर महायाजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्ल नावाचा कोणीएक वकील हे खाली आले; आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली.
2 जेव्हा पौल शासकासमोर उभा राहिला तेव्हा तिर्तुल्ल त्याच्यावर दोषारोप ठेवून म्हणाला, “फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हास फार शांतता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे या राष्ट्रात सुधारणा होत आहेत. 3 म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने, सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करतो. 4 तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे. 5 हा मनुष्य म्हणजे एक पिडा आहे असे आम्हास आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकात हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे. 6 ह्याने परमेश्वराचे भवनही विटाळण्याचा प्रयत्न केला; त्यास आम्ही धरले; व आमच्या नियमाशास्त्राप्रमाणे याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो. 7 पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातातून काढून नेले. 8 आणि याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.”
9 तेव्हा या सर्व गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून दुसऱ्या यहूद्यांनी ही दुजोरा दिला. 10 मग सुभेदाराने बोलण्यास खुणविल्यावर पौलाने उत्तर दिले, “आपण पुष्कळ वर्षापासून या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्यासंबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करतो. 11 आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरूशलेम शहरात उपासना करायला जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत. 12 आणि परमेश्वराच्या भवनात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करतांना किंवा बंडाळी माजवतांना मी त्यांना आढळलो नाही. 13 ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे शाबीत करता येत नाहीत. 14 तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी पूर्वजांच्या देवाची सेवा करतो. 15 आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. 16 ह्यामुळे देवासंबंधाने व मनुष्यांसंबंधाने माझा विवेकभाव सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो. 17 मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांस दानधर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो. 18 शुद्धीकरणाच्या विधीत मी व्रतस्थ असा परमेश्वराच्या भवनात आढळलो, माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता; पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहूदी होते. 19 त्यांचे माझ्याविरूद्ध काही असते तर त्यांनी आपणा पूढे येऊन माझ्यावर दोषारोप करायचा होता. 20 किंवा मी न्यायसभेपूढे उभा राहीलो असता माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे; 21 ह्यांच्यामध्ये उभे राहून, मरण पावलेल्यांचा पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे, हे शब्द मी मोठ्याने बोललो, हा एवढा उद्गार अपराध असला तर असेल.”
फेलिक्स खटल्याचे काम तहकूब करतो
22 फेलिक्सास त्या मार्गाची चांगली माहीती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसीयाचा सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन.” 23 आणि त्याने शताधिपतीला हुकुम केला की, ह्याला पहाऱ्यात ठेवावे; तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना याची सेवा करण्यास मनाई नसावी.
24 मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. 25 तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.” 26 आणखी आपणास पौलाकडून पैसे मिळतील अशी आशाही त्यास होती, म्हणून तो त्यास पुनःपुन्हा बोलावून घेवून त्याच्याबरोबर संभाषण करत असे.
27 पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्साच्या जागेवर पुर्क्य फेस्त हा आला; तेव्हा यहूद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.