6
मर्दखयाचा मानसन्मान करणे हामानाला भाग पडते
त्या रात्री राजाची झोप उडाली. तेव्हा त्याने एका सेवकाला इतिहासाचा ग्रंथ आणण्याची आज्ञा केली आणि मग राजापुढे मोठ्याने वाचण्यात आला. राजा अहश्वेरोशाला राजद्वारावर पहारा करणाऱ्या बिग्थान आणि तेरेश या दोन सेवकांनी राजाचा वध करण्याचा कट रचला होता त्याच्याविषयी मर्दखयाने सांगितले होते अशी नोंद होती. त्यावर राजाने विचारले, “मर्दखयाचा त्याबद्दल सन्मान व गौरव कसा केला गेला?” तेव्हा सेवक राजाला म्हणाले, “त्याच्यासाठी काहीच केले गेले नाही.”
राजा म्हणाला “चौकात कोण आहे?” हामान तर आपण जो खांब मर्दखयाला फाशी देण्यासाठी तयार केला होता ते राजाला सांगण्यास राजाच्या घराच्या बाहेरच्या अंगणात आला होता. राजाचे सेवक त्यास म्हणाले, “हामान अंगणात उभा आहे” तेव्हा राजा म्हणाला, “त्याला आत घेऊन या.” हामान आत आला तेव्हा राजाने त्यास विचारले, ज्याचा राजाने सन्मान करावा असे राजाच्या मर्जीस आल्यास त्या मनुष्यासाठी काय करावे? हामानाने मनातल्या मनात विचार केला, “माझ्यापेक्षा कोणाचा अधिक मान करावा म्हणून राजाच्या मर्जीस येणार?”
तेव्हा हामान राजाला म्हणाला, “राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्यासाठी हे करावे, राजाने स्वतः परिधान केलेले राजवस्रे आणावे. राजा ज्या घोड्यावर बसतो तो घोडाही आणावा. राजाच्या मस्तकी ठेवतात तो राजमुकुट आणावा. मग राजाच्या एखाद्या महत्वाच्या अधिकाऱ्याच्या हाती राजवस्रे आणि घोडा या गोष्टी सोपवाव्यात. राजाला ज्याचा सन्मान करायचा आहे त्याच्या अंगावर या अधिकाऱ्याने ती वस्रे घालावीत आणि त्यास घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यावर फिरवावे. या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीला पुढे घेऊन नेताना घोषित करावे की राजाला ज्याचा सन्मान करायचा असतो त्याच्यासाठी असे केले जाते.”
10 मग राजा हामानाला म्हणाला, तू बोलला त्याप्रमाणे “लवकर वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखय यहूदी राजद्वाराजवळच बसलेला आहे त्याचे तसेच कर. जे सर्व तू बोलला आहेस त्यातले काही एक राहू देऊ नकोस.” 11 मग हामानाने वस्त्र आणि घोडा घेऊन मर्दखयाला ते वस्त्र घालून त्यास घोड्यावर बसवून नगरातील रस्त्यातून फिरवले. त्याच्यापुढे चालून त्याने घोषणा दिली, “राजाला ज्याचा सन्मान करण्यास आवडते त्या मनुष्यासाठी असे केले जाते.”
12 एवढे झाल्यावर मर्दखय राजद्वाराशी परतला. पण हामान आपले तोंड झाकून शोक करीत घाईने घरी गेला. 13 आपली पत्नी जेरेश आणि आपले सगळे मित्र यांना त्याने जे जे झाले ते सगळे सांगितले, हामानाची पत्नी आणि त्यास सल्ला देणारे बुद्धीमान मित्र त्यास म्हणाले “मर्दखय यहूदी असेल तर त्याच्यावर तुमचे वर्चस्व होणे शक्य नाही. पण त्याच्यापुढे तुमचा अध:पात खचीतच होणार.” 14 हे सगळे त्याच्याशी बोलत असतानाच राजाचे खोजे आले. एस्तेरने तयार केलेल्या मेजवानीला हामानास आणायला त्यांनी घाई केली.