6
तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोला काय करतो ते तू बघशील; मी माझे बाहुबल त्यास दाखवले म्हणजे मग तो माझ्या लोकांस जाऊ देईल. कारण माझ्या बाहुबलामुळे तो त्यांना आपल्या देशातून बाहेर घालवून देईल.”
मोशेला दुसऱ्यांदा झालेले पाचारण
मग देव मोशेला म्हणाला, “मी परमेश्वर आहे मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना सर्वसमर्थ देव* एल-शदाय म्हणून प्रगट झालो; परंतु मी त्यांना परमेश्वर या माझ्या नावाने त्यांना माहीत नव्हतो. ज्या कनान देशात ते उपरी होते तो परदेश त्यांना वतन देण्याविषयीचा करार मी त्यांच्याशी केला आहे. ज्या इस्राएलाला मिसऱ्यांनी दास करून ठेवले आहे त्यांचे कण्हणे ऐकून मी आपल्या कराराची आठवण केली आहे. तेव्हा इस्राएलाला सांग, मी तुमचा परमेश्वर आहे; मी तुम्हास मिसऱ्यांच्या दास्यातून सोडवीन आणि मी तुम्हास त्यांच्या अधिकारातून मुक्त करीन, आणि मी आपले सामर्थ्य दाखवून व सामर्थ्यशाली निवाड्याची कृती करून तुम्हास सोडवीन. मी तुम्हास आपले लोक करून घेईन आणि मी तुमचा देव होईन. मी तुम्हास मिसऱ्यांच्या दास्यातून काढून आणतो तो मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हास समजेल. जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबास देण्याची मी हात वर करून शपथ वाहिली होती त्यामध्ये मी तुम्हास नेईन; व तो मी तुम्हास वतन करून देईन. मी परमेश्वर आहे.” तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएल लोकांस सांगितले. परंतु त्यांच्या बिकट दास्यामुळे ते नाउमेद झाल्यामुळे ते त्याचे म्हणणे ऐकेनात. 10 मग परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, 11 “तू जाऊन मिसराचा राजा फारो याला सांग की इस्राएली लोकांस तुझ्या देशातून जाऊ दे” 12 तेव्हा मोशे परमेश्वरास म्हणाला, “इस्राएली लोकांनी माझे ऐकले नाही, तर फारो माझे कसे ऐकेल? कारण मी अजिबात चांगला वक्ता नाही कारण मी अजिबात चांगला वक्ता नाही सुंता न झालेल्या जिभेचा .” 13 परमेश्वराने मोशे व अहरोन यांना इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर नेण्याविषयी आज्ञा देऊन इस्राएल लोकांकडे आणि तसेच मिसरी राजा फारो याच्याकडे पाठवले.
मोशे आणि अहरोन ह्यांची वंशावळ
उत्प. 46:8-27
14 मोशे व अहरोन यांच्या पूर्वजांपैकी प्रमुख पुरुषांची नावे अशीः इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन. त्याची मुले हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी. हे रऊबेनाचे कुळ. 15 शिमोनाचे पुत्र यमुवेल, यामीन, ओहद, याखीन, जोहर व (कनानी स्त्री पोटी झालेला शौल); ही शिमोनाची कूळे. 16 लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षांचे होते. लेवीच्या वंशावळीप्रमाणे त्याच्या पुत्रांची नावे हेः गेर्षोन, कहाथ, व मरारी. 17 गेर्षोनाचे पुत्रः त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हेः गेर्षोनाचे दोन पुत्र लिब्नी व शिमी. 18 कहाथाचे पुत्रः अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल. कहाथाचे आयुष्य एकशे तेहतीस वर्षांचे होते. 19 मरारीचे पुत्रः महली व मूशी. लेवीची कुळे त्याच्या वंशावळीप्रमाणे ही होती. 20 अम्रामाने आपली आत्या योखबेद हिच्याशी लग्न केले, तिच्या पोटी त्यास अहरोन व मोशे हे दोन पुत्र झाले. अम्राम एकशे सदतीस वर्षे जगला. 21 इसहाराचे पुत्रः कोरह, नेफेग व जिख्री. 22 उज्जियेलाचे पुत्र: मिशाएल, एलसाफान व सिथ्री. 23 अहरोनाने अलीशेबाशी लग्न केले. (अलीशेबा अम्मीनादाबाची कन्या व नहशोनाची बहीण होती) त्यांना नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ही मुले झाली. 24 कोरहाचे पुत्रः अस्सीर, एलकाना व अबीयासाफ; ही कोरहाची कुळे. 25 अहरोनाचा पुत्र एलाजार याने पुटीयेलाच्या कन्येशी लग्न केले; तिच्या पोटी त्यास फिनहास हा पुत्र झाला. हे सर्व लोक म्हणजे इस्राएलाचा पुत्र लेवी याची वंशावळ होय. 26 इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर घेऊन जा असे परमेश्वराने ज्यांना सांगितले होते ते अहरोन व मोशे याच कुळातले. 27 इस्राएल लोकांस मिसर देशातून बाहेर जाऊ द्यावे असे मिसराचा राजा फारो याच्याशी जे बोलले तेच हे अहरोन व मोशे. 28 मग मिसर देशात परमेश्वर मोशेबरोबर बोलला. 29 परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी परमेश्वर आहे. मी तुला सांगतो ते सर्व तू मिसराचा राजा फारो याला सांग.” 30 परंतु मोशेने परमेश्वरासमोर उत्तर दिले, “मी तर चांगला वक्ता नाही. फारो राजा माझे ऐकणार नाही.”

*6:3 एल-शदाय

6:12 कारण मी अजिबात चांगला वक्ता नाही सुंता न झालेल्या जिभेचा