19
सीनाय पर्वताजवळ इस्त्राएल लोक येतात
1 मिसरामधून प्रवासास निघाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात इस्राएल लोक सीनायच्या रानात येऊन पोहोचले. 2 ते लोक रफीदिम सोडून सीनायच्या रानात आले होते; इस्राएल लोकांनी पर्वतासमोर आपला तळ दिला. 3 तेव्हा मोशे पर्वत चढून देवाकडे गेला. परमेश्वराने त्यास पर्वतावरून हाक मारून सांगितले की, “तू याकोबाच्या वंशजांना हे सांग, इस्राएल लोकांस हे सांग. 4 मिसऱ्यांचे मी काय केले आणि तुम्हास गरुडाच्या पंखावर उचलून घेऊन माझ्याजवळ कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे. 5 म्हणून मी आता तुम्हास सांगतो की तुम्ही माझी वाणी खरोखर ऐकाल आणि माझ्या कराराचे पालन कराल, तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे. 6 तुम्ही मला, याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. तू इस्राएल लोकांस हेच सांग.” 7 मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना एकत्र बोलावले; परमेश्वराने त्यास जी वचने सांगण्याची आज्ञा केली होती ती सर्व त्याने त्यांच्यापुढे सांगितली. 8 आणि सर्व लोक मिळून म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेले सर्व आम्ही करू.” मोशेने परमेश्वरास लोकांचे म्हणणे सांगितले. 9 आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी दाट ढगात तुझ्याजवळ येऊन तुझ्याशी बोलेन आणि माझे तुझ्याबरोबरचे बोलणे सर्व लोकांस ऐकू जाईल;” त्यांचा नेहमी तुझ्यावरही विश्वास बसेल, मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वरास सांगितले. 10 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू जाऊन आज आणि उद्या लोकांस पवित्र कर; त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावेत. 11 तिसऱ्या दिवशी त्यांनी तयार रहावे, कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल. 12 परंतु लोकांसाठी तेथे सीमारेषा आखून लोकांनी ती ओलांडू नये, त्यांना बजावून सांग; पर्वतावर कोणीही चढू नये जो कोणी पर्वताला स्पर्श करेल तो खास आपल्या जिवाला मुकेल. 13 कोणीही त्यास हात लावू नये. हात लावला तर त्यास दगडमार करावी किंवा बाणांनी विंधावे, तो पशू असो किंवा मनुष्य असो, त्यास जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घ आवाज होईल तेव्हा लोकांनी पर्वताजवळ यावे.” 14 मग मोशे पर्वतावरून खाली उतरला; तो लोकांकडे गेला व देवाच्या भेटीसाठी त्याने त्यांना पवित्र केले. लोकांनी आपले कपडे धुवून स्वच्छ केले. 15 मग मोशे लोकांस म्हणाला, “तीन दिवस तुम्ही देवाची भेट घेण्यासाठी तयार राहा. तोपर्यंत स्त्रीस्पर्श करू नका.” 16 तिसरा दिवस उजडताच मेघगर्जना झाली व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग आले आणि प्रचंड शिंगाचा फार आवाज होऊ लागला. तेव्हा छावणीत राहणारे सर्व लोक थरथर कापू लागले. 17 नंतर मोशेने लोकांस छावणीतून बाहेर काढून देवाच्या दर्शनाला बाहेर आणले आणि ते पर्वताच्या तळाजवळ उभे राहिले. 18 परमेश्वर सीनाय पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून तो पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा त्याचा धूर वर आला, आणि सर्व पर्वत थरथरू लागला.*सर्व लोक थरथर कापू लागले 19 शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्यास आपल्या वाणीने उत्तर देत गेला. 20 परमेश्वराने पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला सीनाय पर्वताच्या शिखरावर बोलावले. तेव्हा तो पर्वतावर गेला. 21 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू खाली जा आणि लोकांस बजावून सांग की त्यांनी मर्यादा ओलांडून परमेश्वर काय आहे ते पाहण्यास तिकडे येऊ नये. जर ते तसे करतील तर बरेच जण मरतील. 22 तसेच परमेश्वराजवळ येणाऱ्या याजकांनीही पवित्र व्हावे; नाहीतर परमेश्वर त्यांना शिक्षा करील.” 23 मोशेने परमेश्वरास सांगितले, “लोक सीनाय पर्वतावर येऊ शकणार नाहीत, कारण तूच स्वत: आम्हांला मर्यादा घालून दिली व सक्त ताकीद दिली व तो अधिक पवित्र करण्यास सांगितले.” 24 परमेश्वर त्यास म्हणाला, “तू खाली लोकांकडे जा व मागे येताना अहरोनाला तुझ्याबरोबर परत आण, परंतु याजक किंवा इतर लोकांस इकडे येऊ देऊ नको; ते जर माझ्याजवळ येतील तर मी त्यांना शिक्षा करीन.” 25 मग मोशेने खाली जाऊन लोकांस हे सांगितले.