24
कराराचे रक्त
1 मग तो मोशेला म्हणाला, “तू, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलापैकी सत्तरजण असे मिळून परमेश्वराकडे पर्वतावर चढून येऊन त्यास दुरूनच नमन करा; 2 मग मोशेने एकट्यानेच परमेश्वराजवळ यावे; इतरांनी जवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर पर्वत चढून वरही येऊ नये.” 3 मोशेने लोकांस परमेश्वराचे सर्व नियम व आज्ञा सांगितल्या; मग सर्व लोक एका आवाजात म्हणाले, “परमेश्वराने जी वचने सांगितलेली त्या सर्वांप्रमाणे आम्ही करू.” 4 तेव्हा मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली, मोशेने पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व इस्राएलाच्या बारा वंशाप्रमाणे बारा स्तंभ उभे केले. 5 मग मोशेने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना परमेश्वरास होमबली व बैलाची शांत्यर्पणे अर्पण करायला पाठवले. 6 मोशेने त्या अर्पणातून अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे रक्त त्याने वेदीवर शिंपडले. 7 मग मोशेने कराराचे पुस्तक घेऊन लोकांस वाचून दाखविले आणि ते ऐकून लोक म्हणाले, “परमेश्वराने सांगितले आहे तसे आम्ही करू आणि त्याने दिलेल्या आज्ञा आम्ही पाळू.” 8 मग मोशेने रक्त घेऊन लोकांवर शिंपडले. तो म्हणाला, “परमेश्वराने तुमच्याशी या वचनाप्रमाणे करार केला आहे असे हे त्या कराराचे रक्त आहे.” 9 नंतर मोशे, अहरोन, नादाब, अबीहू व इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर चढून गेले. 10 तेथे त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले; इंद्रनीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ होते 11 इस्राएलातील वडिलधाऱ्या मनुष्यांनी देवाला पाहिले, परंतु त्याने त्यांचा नाश केला नाही. मग त्यांनी तेथे एकत्र खाणेपिणे केले.
सीनाय पर्वतावर मोशे
12 परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वतावर मला भेटावयास ये; मी दोन दगडी पाट्यांवर इस्राएल लोकांच्या शिक्षणासाठी नियम व आज्ञा लिहिलेल्या आहेत; त्या मी तुला देतो.” 13 तेव्हा मोशे व त्याचा मदतनीस यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर चढून गेला. 14 मोशे इस्राएलांच्या वडिलांना म्हणाला, “आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच थांबा, मी परत येईपर्यंत अहरोन व हूर हे तुमच्याबरोबर आहेत; कोणाचे काही प्रकरण असेल तर त्याने त्यांच्याकडे जावे.” 15 मग मोशे पर्वतावर चढून गेला आणि ढगाने पर्वत झाकून टाकला; 16 परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर उतरले; ढगाने सहा दिवस पर्वताला झाकून टाकले; सातव्या दिवशी परमेश्वराने मोशेला हाक मारली. 17 इस्राएल लोकांस पर्वताच्या शिखरावर परमेश्वराचे तेज भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे दिसत होते. 18 मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.