Galatians
पौलाचे गलतीकरांस पत्र
नमस्कार
१-२ गलती प्रांतातील मंडळ्यांस; मनुष्यांकडून किंवा मनुष्यांच्याद्वारे नव्हे, तर येशू ख्रिस्ताच्याद्वारे आणि ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले तो देवपिता, ह्याच्याद्वारे झालेला प्रेषित पौल, याच्याकडून आणि माझ्या सोबतीचे सर्व बंधूकडून, ३ देव जो पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती असो. ४ आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे, या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांबद्दल, स्वतःला दिले. ५ देवपित्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
गलतीकरांनी पौलाचा केलेला हिरमोड
६ मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून, इतक्या लवकर, तुम्ही दुसर्‍या शुभवर्तमानाकडे वळला आहात. ७ दुसरे कोणतेही शुभवर्तमान नाही; पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताचे शुभवर्तमान विपरीत करण्याची इच्छा असणारे असे कित्येक आहेत. ८ तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगितले किंवा स्वर्गातील आलेल्या देवदूतानेही सांगितले, तरी तो शापित असो. ९ आम्ही अगोदर सांगितले आहे तसेच आता मी पुन्हा सांगतो की, कोणी तुम्हास, जे तुम्ही स्वीकारले त्याच्यापेक्षा, निराळे शुभवर्तमान कोणी तुम्हास सांगितल्यास तो शापित असो.
१० मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवीत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.
मनुष्यापासून नव्हे तर येशू ख्रिस्तापासून आपल्याला शुभवर्तमान प्राप्त झाले आहे असे पौलाचे सांगणे
११ कारण, बंधूंनो, मी तुम्हास सांगतो की, मी ज्या शुभवर्तमानाची घोषणा केली ती मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही. १२ कारण ती मला मनुष्याकडून मिळाली नाही तसेच ती मला कोणी शिकवलीही नाही; पण येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. १३ तुम्ही माझ्या, यहूदी धर्मातील, पूर्वीच्या आचरणाविषयी ऐकले आहे की, मी देवाच्या मंडळीचा अत्यंत छळ करून तिचा नाश करीत असे. १४ आणि मी माझ्या पूर्वजांच्या प्रथांविषयी पुष्कळ अधिक आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ लोंकापेक्षा यहूदी धर्मात मी पुढे गेलो होतो.
१५ पण ज्या देवाने मला आईच्या उदरापासून वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले, त्यास जेव्हा बरे वाटले की, १६ आपल्या पुत्राला माझ्याद्वारे प्रकट करावे, म्हणजे परराष्ट्रीयांमध्ये मी त्याच्या शुभवर्तमानाची घोषणा करावी तेव्हा मी हे कोणत्याही मानवाची मसलत न घेता, १७ आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर न जाता, पण मी लगेच अरबस्तान देशास निघून गेलो व तेथून दिमिष्कास पुन्हा परत आलो.
१८ पुढे, तीन वर्षांनंतर, मी केफाला भेटण्यास वर यरुशलेमास गेलो आणि पंधरा दिवस मी त्याच्याजवळ राहिलो; १९ पण प्रभूचा भाऊ याकोब ह्याच्याशिवाय मी इतर प्रेषितांपैकी दुसरा कोणीही माझ्या दृष्टीस पडला नाही. २० मी जे तुम्हास लिहित आहे, ते पाहा, देवासमोर, मी खोटे बोलत नाही. २१ त्यानंतर मी सिरीया व किलिकिया प्रांतांत आलो २२ आणि ख्रिस्तात असलेल्या, यहूदीया प्रांतातील मंडळ्यांना मी अपरिचित होतो. २३ त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की, ‘पूर्वी आमचा छळ करणारा ज्या विश्वासाचा मागे नाश करीत होता त्याची तो आता सुवार्ता सांगत आहे.’ २४ आणि ते माझ्याविषयी देवाचे गौरव करू लागले.