4
काइनाकडून हाबेलाची हत्या
लूक 11:51; इब्री. 11:4; 12:24
मनुष्याने त्याची पत्नी हव्वा हिच्यासोबत वैवाहिक संबंध केला. ती गर्भवती झाली आणि तिने काइनाला जन्म दिला. तेव्हा ती म्हणाली, परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे. त्यानंतर तिने काइनाचा भाऊ हाबेल याला जन्म दिला. आणि हाबेल मेंढपाळ बनला, पण काइन शेतातील कामकरी झाला.
काही काळानंतर काइनाने परमेश्वरास शेतामधील फळांतले काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून, आणि पुष्टातून अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल आणि त्याचे अर्पण स्विकारले. परंतु त्याने काइन आणि त्याचे अर्पण स्विकारले नाही. यामुळे काइनाला फार राग आला, आणि त्याचे तोंड उतरले.
परमेश्वर काइनाला म्हणाला, “तू का रागावलास? तुझा चेहरा का उतरला आहे? तू जर चांगल्या गोष्टी करशील तर, मग तुझाही स्विकार केला जाणार नाही का? परंतु तू जर योग्य ते करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे आणि त्याची तुझ्यावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे, परंतु तू त्यावर नियंत्रण केले पाहिजेस.”
काइन आपला भाऊ हाबेल याच्याशी बोलला, आणि असे झाले की ते शेतात असता, काइन आपला भाऊ हाबेल ह्याच्या विरूद्ध उठला व त्यास त्याने ठार मारले.
परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?” काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; मी माझ्या भावाचा राखणदार आहे काय?”
10 देव म्हणाला, “तू हे काय केलेस? तुझ्या भावाच्या रक्ताची वाणी जमिनीतून शिक्षेसाठी ओरड करत आहे. 11 तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त स्विकारण्यास ज्या जमिनीने आपले तोंड उघडले आहे, तिचा तुला शाप आहे. 12 जेव्हा तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती आपले सत्व यापुढे तुला देणार नाही. पृथ्वीवर तू भटकत राहशील व निर्वासित होशील.”
13 काइन परमेश्वरास म्हणाला, “माझी शिक्षा मी सहन करण्यापलीकडे, इतकी मोठी ती आहे. 14 खरोखर, तू मला या माझ्या भूमीवरून हाकलून लावले आहेस, आणि तुझ्या जवळ मला येता येणार नाही. पृथ्वीवर तू मला भटकणारा व निर्वासित केले आणि जर मी कोणाच्या हाती सापडेन तर तो मला ठार मारून टाकेल.” 15 परमेश्वर त्यास म्हणाला, “जर कोणी काइनाला ठार मारील तर त्याचा सातपट सूड घेण्यात येईल.” त्यानंतर, तो कोणाला सापडला तर त्यास कोणी जिवे मारू नये म्हणून, परमेश्वराने काइनावर एक खूण करून ठेवली.
काइनाचे वंशज
16 काइन परमेश्वरासमोरून निघून गेला आणि एदेनाच्या पूर्वेस नोद प्रदेशात जाऊन राहिला. 17 काइनाने आपल्या पत्नीस जाणिले, ती गर्भवती होऊन तिने हनोखाला जन्म दिला; काइनाने एक नगर बांधले त्याने त्या नगराला आपल्या मुलाचेच हनोख हे नाव दिले. 18 हनोखाला इराद झाला; इरादाला महूयाएल झाला महूयाएलास मथुशाएल झाला; आणि मथुशाएलास लामेख झाला. 19 लामेखाने दोन स्त्रिया केल्या. पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला.
20 आदाने याबालास जन्म दिला; तो तंबूत राहणाऱ्या व गुरेढोरे पाळणाऱ्या लोकांचा मूळपुरुष झाला. 21 आणि त्याच्या भावाचे नाव युबाल होते, तो तंतुवाद्य व वायुवाद्य वाजवणाऱ्या कलावंताचा मूळपुरुष झाला. 22 सिल्ला हिला तुबल-काइन झाला; तो तांब्याची व लोखंडाची कामे करणाऱ्या लोकांचा मूळपुरुष झाला. तुबल काइनास नामा नावाची बहीण होती.
23 लामेख आपल्या बायकांना म्हणाला,
आदा आणि सिल्ला माझी वाणी ऐका;
लामेखाच्या बायकांनो, मी ज्या गोष्टी बोलतो त्याकडे कान लावा;
एका मनुष्याने मला जखमी केले, मी त्यास ठार मारले,
एका तरुणाने मला मारले म्हणून मी त्यास ठार केले.
24 जर काइनाबद्दल सातपट तर
लामेखाबद्दल सत्याहत्तरपट सूड घेतला जाईल.
शेथाचे वंशज
25 आदामाने पुन्हा पत्नीस जाणिले आणि तिला पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव शेथ असे ठेवले. हव्वा म्हणाली, “देवाने हाबेलाच्या ठिकाणी मला दुसरे संतान दिले आहे, कारण काइनाने त्यास जिवे मारले.” 26 शेथलाही मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने धावा *आराधनाकरू लागले.

*4:26 आराधना