23
सारेचा मृत्यू: आपल्या मृतांना पुरण्यासाठी अब्राहाम जमीन विकत घेतो
सारा एकशे सत्तावीस वर्षे जगली; ही सारेच्या आयुष्याची वर्षे होती. सारा कनान देशातील किर्याथ-आर्बा, म्हणजे, कनान देशातले हेब्रोन येथे मरण पावली. अब्राहामाने सारेसाठी शोक केला आणि तिच्यासाठी तो रडला. मग अब्राहाम उठला आणि आपल्या मृत पत्नीपासून गेला, व हेथीच्या मुलांकडे जाऊन म्हणाला, “मी तुमच्यात परदेशी आहे. कृपा करून मृताला पुरण्यासाठी मला तुमच्यामध्ये माझ्या मालकीची अशी जागा मंजूर करा, म्हणजे मी माझ्या मृताला पुरू शकेन.” हेथीच्या मुलांनी अब्राहामाला म्हटले, “माझ्या स्वामी, आमचे ऐका. तुम्ही आमच्यामध्ये देवाचे सरदार आहात. आमच्याकडे असलेल्या उत्तम थडग्यात तुमच्या मयताला पुरा. आमच्यातील कोणीही आपले थडगे तुम्हास द्यायला मना करणार नाही.” अब्राहाम उठला व त्याने हेथीच्या मुलांना आणि देशातील लोकांस नमन केले. तो त्यांना म्हणाला, “जर माझ्या मयताला पुरण्यासाठी तुम्ही सहमत आहात, तर मग माझे ऐका आणि माझ्याबरोबर सोहराचा मुलगा एफ्रोन याला माझ्यासाठी विनंती करा. त्याच्या मालकीची शेताच्या एका टोकाला असलेली मकपेलाची गुहा मला विकत द्यायला सांगा. ती त्याने पूर्ण किंमतीस मला उघडपणे माझ्या मालकीची मृतांना पुरण्याची जागा म्हणून विकत द्यावी.” 10 तेथे एफ्रोन हा हेथीच्या मुलांबरोबर बसलेला होता, आणि हेथीची मुले व त्याच्या नगराच्या वेशीत येणारे सर्व ऐकत असता, एफ्रोन हित्ती याने अब्राहामाला उत्तर दिले, तो म्हणाला, 11 “नाही, माझे स्वामी, माझे ऐका. मी ते शेत आणि त्यामध्ये असलेली गुहा तुम्हास देतो. येथे माझ्या लोकांच्या मुलांसमक्ष मी ते शेत व ती गुहा मी तुम्हास देतो. तुमच्या मृताला पुरण्यास मी ते तुम्हास देतो.” 12 मग अब्राहामाने देशातील लोकांसमोर स्वतः वाकून नमन केले. 13 देशातले लोक ऐकत असता तो एफ्रोनास म्हणाला, “परंतु जर तुझी इच्छा आहे, तर कृपा करून माझे ऐक. मी शेताची किंमत तुला देईन. माझ्याकडून त्याचे पैसे घे, आणि मग मी आपल्या मयतास तेथे पुरेन.” 14 एफ्रोनाने अब्राहामाला उत्तर दिले, तो म्हणाला, 15 “माझे स्वामी, कृपया माझे जरा ऐका. जमिनीचा हा एक तुकडा * साधारण 4.6 किलो ग्रामचारशे शेकेल रुपे किंमताचा, तो माझ्या व तुमच्यामध्ये एवढा काय आहे? तुमच्या मृताला पुरा.” 16 तेव्हा अब्राहामाने एफ्रोनाचे ऐकले आणि हेथीची मुले ऐकत असता त्याने जितके रुपे सांगितले होते तितके, म्हणजे व्यापाऱ्याकडचे चलनी चारशे शेकेल रुपे एफ्रोनाला तोलून दिले. 17 एफ्रोनाचे जे शेत मम्रे शेजारी मकपेला येथे होते, ते शेत, व त्यामध्ये असलेली गुहा व त्याच्यासभोवती सीमेतील सर्व झाडे, 18 ही हेथीच्या मुलांसमक्ष व त्याच्या नगराच्या वेशीत जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वांसमक्ष अब्राहामाने विकत घेतली. 19 त्यानंतर अब्राहामाने आपली पत्नी सारा हिला कनान देशातील मम्रे म्हणजे हेब्रोन शहराच्या शेजारी मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले. 20 ते शेत व त्यातील गुहा ही मृतांना पुरण्याची जागा म्हणून हेथीच्या मुलांकडून अब्राहामाच्या मालकीची झाली.

*23:15 साधारण 4.6 किलो ग्राम