19
सैनिकांकडून येशूंची अवहेलना
मत्त. 27:27-31; मार्क 15:16-20
नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. तेव्हा शिपायांनी एक काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला आणि त्यास एक जांभळा झगा घातला. आणि ते त्याच्यापुढे येऊन म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” मग त्यांनी त्यास चापटा मारल्या. म्हणून पिलाताने पुन्हा बाहेर येऊन, म्हटले, “पाहा, मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही, हे तुम्हास समजावे म्हणून मी त्यास तुमच्याकडे बाहेर आणतो.” तेव्हा येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!” मुख्य याजक लोक व त्यांचे कामदार त्यास बघून ओरडून म्हणाले, याला “वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यास नेऊन, वधस्तंभावर खिळा; कारण मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही.” यहूदी लोकांनी त्यास उत्तर दिले, “आम्हास नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मरण पावला पाहिजे; कारण याने स्वतःला देवाचा पुत्र केले.” पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला; आणि तो पुन्हा जाऊन व येशूला म्हणाला, “तू कोठला आहेस?” पण येशूने त्यास उत्तर दिले नाही. 10 पिलाताने त्यास म्हटले, “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे आणि तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे हे तुला माहीत नाही काय?” 11 येशूने उत्तर दिले, “आपणाला तो अधिकार वरून दिलेला नसता तर माझ्यावर मुळीच चालला नसता, म्हणून ज्याने मला आपल्या हाती दिले त्याचे पाप अधिक आहे.” 12 यावरुन पिलाताने त्यास सोडायचा प्रयत्न केला, पण यहूदी ओरडून म्हणाले, “आपण जर याला सोडिले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला नाकारतो.” 13 म्हणून पिलाताने हे बोलणे ऐकल्यावर येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बाथा म्हणतात. 14 तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस होता, तेव्हा सुमारे दुपारचे बारा वाजले होते आणि तो यहूद्यांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!” 15 यावरुन ते ओरडले, “ह्याला संपवून टाका, त्यास वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हास कैसराशिवाय राजा नाही.” 16 मग, त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्यांच्या हाती दिले.
येशूला वधस्तंभावर खिळणे
मत्त. 27:32-56; मार्क 15:21-41; लूक 23:26-49
17 तेव्हा त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत ‘कवटीचे’ स्थान म्हटलेल्या जागी गेला. या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. 18 तेथे त्यांनी त्यास व त्याच्याबरोबर दुसर्‍या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभांवर खिळले. 19 आणि पिलाताने एक फलक लिहून तो वधस्तंभावर लावला; ‘यहूद्यांचा राजा नासोरी येशू’ असे लिहिले होते. 20 येशूला वधस्तंभावर खिळले होते ते ठिकाण नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी तो फलक वाचला. तो इब्री, रोमी व ग्रीक भाषांत लिहिला होता. 21 तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक लोक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका तर याने म्हणले ‘मी यहूद्यांचा राजा आहे’ असे लिह.” 22 पिलाताने उत्तर दिले, “मी लिहिले ते लिहिले.”
23 मग शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यावर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले; आणि झगाही घेतला. या झग्याला शिवण नव्हती; तो वरपासून सरळ विणलेला होता. 24 म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “आपण हा फाडू नये; पण तो कोणाला मिळेल हे ठरवण्याकरता चिठ्ठ्या टाकून पाहावे.” हे यासाठी झाले की, ‘त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या झग्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकिल्या,’ असा हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा; म्हणून शिपायांनी या गोष्टी केल्या.
25 पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी व क्लोपाची पत्नी मरीया आणि मग्दालीया नगराची मरीया या उभ्या होत्या. 26 येशूने जेव्हा आपल्या आईला व तो ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्यास जवळ उभे राहिलेले पाहून तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला, “आई, पाहा, हा तुझा मुलगा.” 27 मग तो त्या शिष्याला म्हणाला, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्या शिष्याने तिला तेव्हापासून आपल्याकडे घेतले.
28 मग, आता सर्व पूर्ण झाले आहे, हे जाणून येशूने, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, “मला तहान लागली आहे” असे म्हटले. 29 तेथे, एक आंब भरून ठेवलेले भांडे होते, म्हणून त्यांनी आंबेने भरलेला एक बोळा एका एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. 30 येशूने आंब घेतल्यानंतर म्हटले, “पूर्ण झाले आहे.” आणि आपले मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
31 तो तयारीचा दिवस होता आणि शब्बाथ दिवशी वधस्तंभावर शरीरे राहू नयेत, कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता म्हणून यहूद्यांनी पिलाताला विनंती केली की, त्यांचे पाय तोडून त्यांना काढून घेऊन जावे. 32 तेव्हा शिपाई आल्यावर त्यांनी त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या पहिल्याचे व दुसर्‍याचे पाय तोडले. 33 परंतु ते येशूजवळ आल्यावर, तो मरून गेला आहे असे पाहून, त्यांनी त्याचे पाय तोडले नाहीत. 34 तरी शिपायांपैकी एकाने भाल्याने त्याच्या कुशीत भोसकले; आणि, लगेच, रक्त व पाणी बाहेर आले. 35 आणि ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्यास ठाऊक आहे यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा. 36 कारण, “त्याचे एकही हाड मोडणार नाही,” हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून या गोष्टी झाल्या. 37 आणि दुसरा एक शास्त्रलेख पुन्हा म्हणतो, “ज्याला त्यांनी वधिले ते त्याच्याकडे पाहतील.”
38 यानंतर, जो अरिमथाईकर योसेफ याने आपल्याला येशूचे शरीर नेता यावे अशी पिलाताला विनंती केली. तो येशूचा शिष्य असून पण यहूद्यांच्या भीतीमुळे गुप्त शिष्य होता, पिलाताने त्यास परवानगी दिल्यावरून त्याने जाऊन येशूचे शरीर नेले. 39 आणि, त्याच्याकडे पहिल्याने रात्रीचा आलेला निकदेमही गंधरस व अगरू यांचे सुमारे शंभर मापे मिश्रण घेऊन आला. 40 मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहूद्यांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे त्यांनी ते सुगंधी मसाल्यांसहित तागाच्या वस्त्रात गुंडाळले. 41 त्यास ज्याठिकाणी वधस्तंभावर खिळले होते तेथे एक बाग होती; आणि त्या बागेत एक नवी कबर होती; त्यामध्ये कोणाला कधीही ठेवलेले नव्हते. 42 तो यहूद्यांचा तयारीचा दिवस असल्यामुळे व ती कबर जवळ असल्यामुळे, त्यांनी येशूला तेथे ठेवले.