योएल
लेखक
योएलाचे पुस्तक सांगते की याचा लेखक संदेष्टा योएल होता (योएल 1:1). आम्ही पुस्तकात असलेल्या विशिष्ट वैयक्तिक तपशीलांपेक्षा संदेष्टा योएलबद्दल फारच थोडेसे जाणतो. त्याने स्वतःला पथूयेलाचा पुत्र म्हणून ओळखले आणि त्याने यहूदाच्या लोकांना उपदेश केला आणि यरूशलेममध्ये अतिशय आस्था व्यक्त केली. योएलनेही याजक व मंदिर यांच्याविषयी अनेक विधाने केली, जे यहूदामध्ये उपासनेच्या केंद्रांशी परिचित असल्याचे सूचित करते (योएल 1:13-14; 2:14, 17).
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 835 - 600.
योएल कदाचित जुन्या कराराच्या इतिहासाच्या पारसी काळात राहिला. त्या काळात, पारसी लोकांनी काही यहूद्यांना यरूशलेमेला परत येण्याची परवानगी दिली आणि शेवटी मंदिर पुन्हा बांधले गेले. योएल मंदिराशी परिचित होता, म्हणून त्याने त्याची दिनांक पुनर्संचयित झाल्यानंतर निश्चित केली पाहिजे.
प्राप्तकर्ता
इस्त्राएल लोक आणि नंतर सर्व पवित्र शास्त्राचे वाचक.
हेतू
देव क्षमाशील आहे, जे पश्चात्ताप करतात त्यांना क्षमा करतो. पुस्तक दोन मुख्य घटनेद्वारे प्रकाशित केले आहे. एक म्हणजे टोळाचे आक्रमण आणि दुसरे आत्म्याचा विस्तार. यातील सुरवातीच्या पूर्णतेचा उल्लेख पेत्राने प्रेषितांची कृत्येच्या दुसऱ्या अध्यायात पेन्टेकॉस्ट येथे केला होता.
विषय
परमेश्वराचा दिवस
रूपरेषा
1. इस्त्राएल लोकांवर टोळ्यांचा हल्ला — 1:1-20
2. देवाची शिक्षा — 2:1-17
3. इस्त्राएलची पुन:स्थापना — 2:18-32
4. राष्ट्रांवर देवाचा न्याय व यहूदाची सुटका — 3:1-21
1
देशाची टोळांकडून नासाडी
1 पथूएलाचा मुलगा योएल, ह्याच्याकडे परमेश्वराचे वचन आले ते हे.
2 अहो वडिलांनो, हे ऐका,
आणि देशात राहणाऱ्या तुम्ही सर्वांनी कान द्या.
तुमच्या पूर्वजांच्या दिवसात
किंवा तुमच्या दिवसात पूर्वी कधी असे हे घडले काय?
3 ह्याविषयी आपल्या मुलाबाळांना सांगा,
आणि तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळांना सांगावे,
व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस सांगावे.
4 कुरतडणाऱ्या टोळापासून जे राहिले ते झुंडीने येणाऱ्या टोळांनी खाल्ले;
झुंडीने येणाऱ्या टोळापासून जे राहिले ते चाटून खाणाऱ्या टोळांनी खाल्ले;
आणि चाटून खाणाऱ्या टोळापासून, जे राहिले ते अधाशी टोळांनी खाल्ले.
5 दारू पिणाऱ्यांनो, तुम्ही जागे व्हा व रडा!
तुम्ही सर्व दारू पिणाऱ्यांनो, आक्रोश करा,
कारण गोड दारू तुमच्यापासून काढून घेतली आहे.
6 कारण एक राष्ट्र माझ्या देशावर आले आहे,
ते बळकट व अगणित आहेत.
त्यांचे दात सिंहाचे आहेत,
आणि त्यांना सिंहिणीचे दात आहेत*प्रक. 9:7-10 पाहा .
7 त्यांनी माझा द्राक्षमळा घाबरून सोडवण्याची जागा केली आहे
आणि माझ्या अंजिराचे झाड सोलून उघडे केले आहे.
त्यांने साल सोलून दूर फेकली आहे.
फांद्या उघड्या करून पांढऱ्या केल्या आहेत.
8 जशी कुमारी गोणताट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते, तसा शोक करा.
9 परमेश्वराच्या मंदिरातून अन्नार्पणे व पेयार्पणे नाहीसे झाले आहेत.
परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करत आहेत.
10 शेतांचा नाश झाला आहे.
आणि भूमी रडते†सुकून गेली आहे.
कारण धान्याचा नाश झाला आहे,
नवा द्राक्षरस सुकून गेला आहे
आणि तेल नासले आहे.
11 तुम्ही शेतकऱ्यांनो, गहू व जवाबद्दल लज्जित व्हा,
आणि द्राक्षमळेवाल्यांनो,
गहू व जवसासाठी आक्रोश करा,
कारण शेतातील पीक नष्ट झाले आहे.
12 द्राक्षवेली शुष्क झाल्या आहेत, आणि अंजिराचे झाड सुकून गेले आहे,
डाळिंबाचे झाड, खजुराचे झाड आणि सफरचंदाचे झाड
अशी शेतातील सर्व झाडेसुद्धा शुष्क झाली आहेत.
मानवजातीच्या वंशातून आनंद नष्ट झाला आहे.
13 याजकांनो, गोणताट घाला आणि शोक करा!
वेदीची सेवा करणाऱ्यांनो, आक्रोश करा.
माझ्या परमेश्वराच्या सेवकांनो, या, तुम्ही पूर्ण रात्र गोणताट घालून राहा.
कारण तुमच्या देवाच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व पेयार्पणे अडकवून ठेवलेली आहेत.
14 पवित्र उपास नेमा,
आणि पवित्र सभेसाठी लोकांस एकत्र बोलवा.
तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलांस व देशात राहणाऱ्या लोकांस एकत्र गोळा करा.
आणि परमेश्वरास आरोळी मारा.
15 त्या भयानक दिवसाकरता हायहाय!
कारण परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे.
सर्वसमर्थ देवापासून जसा नाश तसा तो येईल.
16 आमच्या डोळ्यादेखत आमचे अन्न काढून घेतले,
आणि देवाच्या मंदिरातील आनंद व उल्लास नष्ट झाले नाहीत काय?
17 बियाणे त्यांच्या ढेकळाखाली कुजून गेले आहे,
धान्याची कोठारे ओसाड झाली आहेत,
कोठ्या खाली पाडल्या गेल्या आहेत,
कारण धान्य सुकून गेले आहे.
18 प्राणी कसे कण्हत आहेत!
गुरांचे कळप घाबरले आहेत. त्यांना खाण्यास कुरणे नाहीत.
मेंढ्यांचे कळपसुद्धा पीडले आहेत.
19 हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो.
कारण आग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत.
आणि शेतातील सर्व झाडे ज्वालांनी भस्म केली आहेत.
20 रानातील वनपशूंनासुध्दा तुझी उत्कंठा लागली आहे,
कारण पाण्याचे ओहोळ कोरडे झाले आहेत
आणि आग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत.