यहोशवा
लेखक
यहोशवाचे पुस्तक स्पष्टपणे त्याच्या लेखकाचे नाव सांगत नाही. नूनाचा पुत्र यहोशवा, कदाचित मोशेचा उत्तराधिकारी, इस्त्राएलचा पुढारी म्हणून असण्याची शक्यता जास्त आहे. यहोशवाच्या मृत्यूनंतर या पुस्तकाच्या नंतरचे भाग किमान एका अन्य व्यक्तीने लिहिले होते. यहोशवाच्या मृत्यूनंतर अनेक विभाग संपादित/संकलित केले गेले असावेत याची देखील शक्यता आहे. या पुस्तकात यहोशवाच्या नेतृत्वाखाली मोशेच्या मृत्यूनंतर प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत विजय प्राप्त होतो.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 1405 - 1385.
या भागाची संभाव्य शक्यता कनानमधून उगम पावते जिथे यहोशवाने भूमीवर विजय मिळवला होता.
प्राप्तकर्ता
यहोशवा हे पुस्तक इस्राएलमधील लोकांना आणि पवित्र शास्त्रामधील भावी वाचकांना लिहिले होते.
हेतू
यहोशवाचे पुस्तक, देवाने प्रतिज्ञावत दिलेली जमीन जिंकण्यासाठी लागलेल्या सैन्य मोहिमेचा आढावा प्रदान करते. मिसरापासून निर्गमपर्यंत आणि नंतर चाळीस वर्षे अरण्याच्या भटकंतीनंतर, नवनिर्मित राष्ट्र आता प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत प्रवेश करण्यास, रहिवासींवर विजय मिळविण्यास व प्रांतावर कब्जा करण्यास सज्ज झाले आहे. यहोशवाच्या पुस्तकात हे दाखवून दिले आहे की या कराराच्या आधारावर निवडलेले लोक त्याच्या प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत स्थापन झाले. येथे देशभक्तीबरोबर त्यांच्याशी केलेल्या कराराबद्दल परमेश्वराच्या निष्ठेची नोंद सापडली आहे आणि या देशाला प्रथम सीनायमध्ये दिले गेले होते. भविष्यातील पिढ्यांमधील निष्ठा, एकता आणि उच्च मनोबल यासाठी देवाच्या लोकांना प्रेरित करण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी हे शास्त्रवचन आहे.
विषय
विजय
रूपरेषा
1. प्रतिज्ञावत दिलेल्या जमीनीत प्रवेश — 1:1-5:12
2. जमीन काबीज करणे — 5:13-12:24
3. जमीनीची वाटणी करणे — 13:1-21:45
4. अन्यजातीय ऐक्य आणि परमेश्वराप्रती निष्ठा — 22:1-24:33
1
कनान देश जिंकण्याची पूर्वतयारी
परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मरणानंतर असे झाले की, नूनाचा पुत्र यहोशवा, मोशेचा मुख्य मदतनीस याच्याशी परमेश्वर बोलला, “माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता ऊठ, तू आणि हे सर्व लोक असे तुम्ही यार्देन, ओलांडून जो देश मी इस्राएल लोकांस, देत आहे त्यामध्ये जा. मी मोशेला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल, ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला दिले आहे.
रान व हा लबानोन यापासून महानद, फरात नदीपर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश, व मावळतीकडे भूमध्य सागराचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही, जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन, मी तुला सोडून जाणार नाही. व तुला टाकणार नाही.
बलवान हो, धैर्य धर, कारण जो देश ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू बलवान हो व धैर्य धर, आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ, ते सोडून उजवीडावीकडे वळू नको, म्हणजे तू जाशील तिकडे यशस्वी होशील.
नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून निघून जाऊ नये म्हणून रात्रंदिवस त्याचे मनन कर, त्या जे काही लिहिले आहे ते सर्व तू पाळ. मग तुझी भरभराट होईल आणि तू यशस्वी होशील. मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”
10 मग यहोशवाने लोकांच्या पुढाऱ्यांना अशी आज्ञा केली की, 11 “छावणीतून फिरून लोकांस अशी आज्ञा द्या की, स्वतःसाठी अन्नसामग्री तयार करा. कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला ताब्यात देणार आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तीन दिवसाच्या आत तुम्हाला ही यार्देन ओलांडायची आहे.”
12 मग यहोशवाने रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना म्हटले, 13 “परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने तुम्हाला जी आज्ञा दिली होती तिची आठवण करा, तो तुम्हाला म्हणाला होता की, तुम्हाला विसावा मिळावा म्हणून तुमचा देव परमेश्वर हा देश तुम्हाला देत आहे.
14 या यार्देनेच्या पूर्वेकडील जो देश मोशेने तुम्हाला दिला आहे त्यामध्येच तुमच्या स्त्रिया, पुत्र-मुलेबाळे आणि गुरेढोरे ह्यांनी रहावे, पण तुम्ही सर्व योद्ध्यांनी सशस्त्र होऊन आपल्या बांधवांपुढे नदीपलीकडे जावे आणि त्यांना मदत करावी. 15 परमेश्वर तुमच्याप्रमाणेच तुमच्या बांधवांना विसावा देईल आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने त्यांना दिलेल्या देशाचा ते ही ताबा घेतील, मग परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने यार्देनेच्या पूर्वेस, उगवतीकडे जो देश तुम्हाला दिला आहे, त्या तुमच्या वतनाच्या देशात परत येऊन त्याचा ताबा तुम्ही घ्यावा.”
16 तेव्हा त्यांनी यहोशवाला उत्तर दिले, “जे काही करण्याची तू आम्हांला आज्ञा केली आहेस ते सर्व आम्ही करू आणि तू आम्हांला पाठवशील तिकडे आम्ही जाऊ. 17 जसे आम्ही सर्व बाबतींत मोशेचे सांगणे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू, मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो. 18 जो कोणी तुझ्या आज्ञेविरूद्ध बंड करेल व तुझे शब्द पाळणार नाही त्यास देहान्त शिक्षा द्यावी. तू मात्र खंबीर हो व धैर्य धर.”