5
गिलगाल येथे वल्हांडण सण पाळणे व सुंता
1 इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले हे यार्देनेपलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्रकिनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले आणि ते गलितगात्र झाले.
2 त्या वेळी परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “गारगोटीच्या सुऱ्या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.” 3 त्याप्रमाणे यहोशवाने गारगोटीच्या सुऱ्या बनवून इस्राएल लोकांची सुंता अरालोथ *अर्थ-अग्रत्वच्याहे नाव दिलेल्या टेकडीजवळ केली.
4 यहोशवाने त्यांची सुंता केली याचे कारण हे की, युद्धास लायक असे मिसर देशातून निघालेले सगळे पुरुष मिसर देशातून निघाल्यानंतर वाटेने रानात मरण पावले होते. 5 मिसर देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, पण मिसर देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती; 6 कारण इस्राएल लोक रानात चाळीस वर्षे प्रवास करीत होते; मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास लायक अशा पुरुषांनी परमेश्वराची वाणी न ऐकल्यामुळे, त्या काळात त्यांचा नाश झाला होता; परमेश्वराने त्यांना शपथ देऊन सांगितले होते की, ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहतात असा जो देश†सुपीक जमीन मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला होता, तो देश मी तुमच्या नजरेस पडू देणार नाही. 7 त्यांच्या जागी त्यांची जी मुले देवाने वाढविली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती; ते बेसुनत राहिले होते.
8 सर्व राष्ट्राची सुंता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले. 9 मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, मिसरी लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी आपल्याद्वारे दूर लोटली आहे, म्हणून आजही त्या जागेला गिलगाल ‡अर्थ-लोटून देणेम्हणतात.
10 इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला. 11 वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा हा त्यांनी खाल्ला.
12 त्यांनी देशांतले उत्पन्न खाल्ले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मान्ना बंद झाला; तो पुन्हा इस्राएल लोकांस मिळाला नाही, त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले.
यहोशवा आणि तलवार उपसून उभा राहिलेला पुरुष
13 यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा?
14 तो म्हणाला, “दोहोंपैकी कोणतेही नाही; कारण मी परमेश्वराच्या सेनेचा सेनापती आहे.” तेव्हा यहोशवाने त्यास नमन करण्यासाठी आपले मुख भूमीकडे करून म्हटले, “माझ्या स्वामीची आपल्या सेवकाला काय आज्ञा आहे?” 15 परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, “आपल्या पायातले जोडे काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशवाने तसे केले.