17
मनश्शेच्या वंशजाला हे वतन नेमून दिलेले होते. कारण मनश्शे योसेफाचा प्रथम पुत्र, याच्या वंशाचा भाग चिठ्ठ्या टाकून ठरवला तो हा, म्हणजे मनश्शेचा प्रथम पुत्र माखीर, गिलादाचा बाप हा तर मोठा शूर होता, आणि त्यास गिलाद व बाशान हा भाग मिळाला होता. मनश्शेच्या राहिलेल्या वंशजांनाही त्यांच्या कुळांप्रमाणे विभाग मिळाले ते असे, अबीयेजेर व हेलेक व अस्रियेल व शेखेम व हेफेर व शमीदा हे आपआपल्या कुळांप्रमाणे योसेफ पुत्र जो मनश्शे त्याच्या वंशातले पुरुष होते, त्यांच्या निरनिराळ्या कुळांसाठी हे विभाग ठरले; मनश्शेचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलाद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलाफहाद, याला मुलगा नव्हता, परंतु मुली होत्या; आणि त्याच्या मुलींची नावे ही आहेत: महला व नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा. आणि एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व अधिकारी यांच्यापुढे त्या येऊन त्या म्हणाल्या, “परमेश्वराने मोशेला अशी आज्ञा दिली की आम्हांला आमच्या भाऊबंदांमध्ये वतन द्यावे.” यास्तव त्याने परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्यांना त्यांच्या वडिलाच्या भाऊबंदांमध्ये वतन दिले. आणि यार्देनेच्या पश्चिमेकडे गिलाद व बाशान या प्रांतांखेरीज मनश्शेला दहा भाग मिळाले. कारण की मनश्शेच्या मुलींना त्याच्या मुलांमध्ये वतन मिळाले, आणि मनश्शेच्या इतर वंशजांना गिलाद प्रांत मिळाला. आणि मनश्शेची सीमा आशेरापासून शखेमाच्या समोरल्या मिखमथाथा नगरापर्यंत झाली, आणि ती सीमा एन-तप्पूहाच्या लोकवस्तीच्या उजव्या भागापर्यंत पोहचते. तप्पूहा प्रांत मनश्शेचा होता, परंतु मनश्शेच्या सीमेजवळचे तप्पूहा नगर एफ्राइमाच्या वंशाचे होते. आणि सीमा काना ओढ्यावरून, ओढ्याच्या दक्षिणेस गेली; ही नगरे एफ्राइमाची होती, ती मनश्शेच्या नगरांमध्ये होती; आणि मनश्शेची सीमा ओढ्याच्या उत्तरेस होती, आणि तिचा शेवट भूमध्य समुद्राजवळ होता. 10 दक्षिणभाग एफ्राइमाचा, आणि उत्तरभाग मनश्शेचा, आणि समुद्र त्याची सीमा होता, आणि उत्तरेस आशेरात व पूर्वेस इस्साखारात ते एकत्र झाले. 11 आणि इस्साखारात व आशेरात बेथ-शान व त्याची खेडी, आणि इब्लाम व त्याची खेडी, आणि दोर व त्याची खेडी यामध्ये राहणारे, आणि एन-दोर व त्यांची खेडी यामध्ये राहणारे, आणि तानख व त्यांची खेडी यांत राहणारे, आणि मगिद्दो व त्यांची खेडी यांत राहणारे, हे तीन परगणे मनश्शेचे झाले. 12 पण या नगरातील रहिवाश्यांना मनश्शेचे वंशज बाहेर घालवायला समर्थ नव्हते; या देशातच राहण्याचा कनान्यांनी तर हट्ट धरला. 13 तरी असे झाले की जेव्हा इस्राएल लोक बळकट झाले, तेव्हा त्यांनी कनान्यांना नेमलेले काम करायला लावले आणि त्यांना अगदीच घालवून दिले नाही. 14 तेव्हा योसेफाचे वंशज यहोशवाला म्हणाले की, “परमेश्वराने मला येथपर्यंत आशीर्वाद दिला आहे आम्ही संख्येने बहुत झालो आहो तर तू चिठ्ठी टाकून आम्हांला वतनाचा एकच विभाग का दिला आहेस?” 15 तेव्हा यहोशवाने त्यांना म्हटले, “जर तुम्ही संख्येने बहुत आहात व लोक आणखी एफ्राइम डोंगराळ प्रदेश तुम्हाला पुरत नाहीतर परिज्जी व रेफाई यांच्या देशांतले रान तोडून तेथे वस्ती करा.” 16 नंतर योसेफाच्या वंशजांनी म्हटले, “डोंगराळ प्रदेश आम्हांला पुरत नाही; आणि जे कनानी तळप्रांतात राहतात, त्या सर्वांना लोखंडी रथ आहेत; म्हणजे बेथ-शान व तिजकडली खेडी यांतले, आणि इज्रेल खोरे जे, त्यामध्ये आहेत.” 17 तेव्हा यहोशवाने योसेफाच्या घराण्यास, म्हणजे एफ्राइम व मनश्शे यांना असे म्हटले की, “तुम्ही संख्येने फार आहात, व तुमचे सामर्थ्यही मोठे आहे; तुम्हाला एकच वाटा नसावा; 18 तेव्हा डोंगराळ प्रदेशही तुझा होईल; तो अरण्य आहे तरी तू ते तोडशील; बाहेरील भागही तुझे होतील, कारण कनान्यांना जरी लोखंडी रथ आहेत आणि ते बळकट आहेत तरी तू त्यांना घालवशील.”