The Gospel According to
Matthew
मत्तयकृत शुभवर्तमान
लेखक
या पुस्तकाचा लेखक जकात (कर) गोळा करणारा मत्तय हा होता ज्याने येशूंचे अनुसरण करण्यासाठी त्याचे काम सोडले (9:9; 13). मार्क आणि लूक हे त्यांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख लेवी म्हणून करतात. त्याच्या नावाचा अर्थ म्हणजे परमेश्वराची देणगी. प्रारंभिक मंडळीमधील वडिलांनी एकमताने मत्तयाला त्या पुस्तकाचे लेखक म्हणून 12 प्रेषितांपैकी एक असे स्वीकारले होते. मत्तय हा येशूंच्या सेवाकार्याच्या घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार होता. इतर शुभवर्तमान अहवालाबरोबर मत्तयाचा तुलनात्मक अभ्यास हे सिद्ध करतो की ख्रिस्ता विषयाची प्रेषितांची साक्ष विभागली नव्हती.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ.स. 50 - 70.
मत्तय शुभवर्तमानाच्या यहूदी प्रकृतिचा विचार केल्यास हे कदाचित पलिष्टी किंवा सीरियामध्ये लिहिले गेले असले तरी पुष्कळ जण असा विचार करतात की ते अंत्युखियामध्ये उद्भवले असावे.
प्राप्तकर्ता
ग्रीकमध्ये त्याची सुवार्ता लिहिण्यात आल्यामुळे, मत्तय ग्रीक भाषिक यहूदी समुदायातील अशा वाचकांकडे आकर्षित होऊ शकतो. बरेच घटक यहूदी वाचकांना दर्शवितात: जुन्या कराराच्या पूर्ततेसह मत्तयची चिंता; अब्राहामापासून येशूचे वंशज शोधणे (1:1; 17), यहूदी भाषेचा त्याचा उपयोग (उदाहरणार्थ, स्वर्गाचे राज्य, जिथे स्वर्ग देवाच्या नावाचा उपयोग करण्यासाठी यहूद्यांची अनिच्छा दर्शवितो), आणि येशू हा दाविदाचा पुत्र म्हणून येशूवर त्याने दिलेला भर (1:1; 9:27; 12:23; 15:22; 20:30; 31; 21:9, 15; 22:41; 45). मत्तय यहूदी समुदायाकडे अधिक लक्ष केंद्रीत करत होता.
हेतू
ही सुवार्ता लिहिताना, मत्तयचा हेतू यहूदी वाचकांकडे आहे ज्याने मसीहा म्हणून येशूची पुष्टी केली. येथे मानवजातीसाठी देवाचे राज्य आणण्यावर लक्ष केंद्रीत केले. त्याने येशूला जुन्या करारातील भविष्यवाणी आणि अपेक्षा पूर्ण करणारा राजा म्हणून भर दिला (मत्तय 1:1; 16:16; 20:28).
विषय
येशू-यहूद्यांचा राजा.
रूपरेषा
1. येशुंचा जन्म — 1:1-2:23
2. येशुंची गालील प्रांतातील सेवाकार्ये — 3:1-18:35
3. येशुंची यहूदा प्रांतातील सेवाकार्ये — 19:1-20:34
4. यहूदामधील शेवटला दिवस — 21:1-27:66
5. अंतिम घटना — 28:1-20
1
येशू ख्रिस्ताची वंशावळ
रूथ 4:18-22; 1 इति. 2:1-5; लूक 3:23-38
अब्राहामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ. अब्राहामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहूदा व त्याचे भाऊ झाले. यहूदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास अराम झाला. अरामास अम्मीनादाब, अम्मीनादाबास नहशोन, नहशोनास सल्मोन, सल्मोनास राहाबेपासून बवाज, बवाजास रूथपासून ओबेद, ओबेदास इशाय झाला.
आणि इशायास दावीद राजा झाला. उरीयाच्या पत्नीपासून दावीदास शलमोन झाला. शलमोनास रहबाम, रहबामास अबीया, अबीयास आसा झाला. आसास यहोशाफाट, यहोशाफाटास योराम आणि योरामास उज्जीया, उज्जीयास योथाम, योथामास आहाज, आहाजास हिज्कीया, 10 हिज्कीयास मनश्शे, मनश्शेस आमोन, आमोनास योशीया, 11 आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशीयास यखन्या व त्याचे भाऊ झाले.
12 बाबेलास देशांतर झाल्यानंतर यखन्यास शल्तीएल झाला, शल्तीएलास जरूब्बाबेल झाला. 13 जरूब्बाबेलास अबीहूद, अबीहूदास एल्याकीम, एल्याकीमास अज्जुर झाला. 14 अज्जुरास सादोक, सादोकास याखीम, याखीमास एलीहूद झाला. 15 एलीहूदास एलाजार झाला. एलाजारास मत्तान, मत्तानास याकोब, 16 याकोबास योसेफ झाला; जो मरीयेचा पती होता जिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला. 17 अशाप्रकारे अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.
येशू ख्रिस्ताचा जन्म
लूक 2:1-7
18 येशू ख्रिस्ताचा जन्म याप्रकारे झाला; त्याची आई मरीया हिची योसेफाशी मागणी झालेली होती, पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. 19 मरीयेचा पती योसेफ हा नीतिमान होता, परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याने गुप्तपणे तिच्यासोबतची मागणी मोडण्याचा निर्णय घेतला. 20 तो या गोष्टींविषयी विचार करीत असता त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले; “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. 21 ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.” 22 प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण व्हावे यासाठी हे सर्व झाले, ते असे,
23 “पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल,
आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.”
24 तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले, त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. 25 तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही; आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले.