20
द्राक्षमळ्यातील कामकऱ्यांच्या दृष्टांत
“म्हणून स्वर्गाचे राज्य हे कोणा शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला. त्या मनुष्याने एक दिवसाच्या मजुरीकरिता प्रत्येकाला एक चांदीचे नाणे देण्याचे कबूल केले आणि त्याने द्राक्षाच्या मळ्यात कामास पाठवले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्यास दिसली. त्या लोकांस काहीच काम नव्हते. मग तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात कामाला जा आणि जी योग्य मजुरी आहे ती मी तुम्हास देईन.’ मग ते काम करण्यास मळ्यात गेले, तो मनुष्य बारा वाजता आणि तीन वाजता बाजारात गेला आणि त्या मनुष्याने आपल्या मळ्यात काम करण्यासाठी लोकांस दोन वेळा जाऊन मजुरीवर घेतले पाच वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणखी काही लोक उभे असलेले त्यास आढळले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही काही काम न करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?’ त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्हास कोणी काम दिले नाही.’ तो मनुष्य त्यांना म्हणाला, ‘तर मग तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’ संध्याकाळी द्राक्षमळ्याचा मालक मुकादमाला म्हणाला, ‘मजुरांना बोलवा आणि त्यांना त्यांची मजुरी देऊन टाका, मी ज्यांना अगदी शेवटी कामावर आणले त्यांना अगोदर मजुरी द्या, नंतर बाकीच्या सर्वांना मजुरी द्या, मी कामावर रोजगारीने पहिल्याने बोलावलेल्यांना सर्वात शेवटी मजुरी द्या.’ जे मजूर संध्याकाळी साधारण पाच वाजता कामावर घेतले होते ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. प्रत्येकाला एक नाणे मजुरी मिळाली. 10 मग ज्यांना सुरूवातीला कामावर घेण्यात आले होते, ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. त्यांना वाटत होते की, इतरांपेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतील, पण त्या सर्वांना चांदीचे एकच नाणे मजुरी मिळाली. 11 त्यांनी ते घेतले व मालकाकडे तक्रार करू लागले. 12 ते म्हणाले, ‘ज्यांना शेवटी कामावर घेतले त्यांनी केवळ एक तासच काम केले. परंतु तुम्ही त्यांना आमच्या बरोबरीने मजुरी दिली. आम्ही मात्र दिवसभर उन्हात कष्ट केले.’ 13 परंतु मळ्याचा मालक त्यांच्यातील एकाला म्हणाला, ‘मित्रा मी तुझ्याबाबतीत अन्याय करीत नाही. मी तुला एक चांदीचे नाणे मजुरी देईन यावर आपण सहमत झालो नाही का? 14 जे तुझे आहे ते घे आणि चालायला लाग, तुला दिली तितकीच मजुरी मला या शेवटच्या मनुष्यास द्यायची आहे. 15 मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’ 16 म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणि पहिले ते शेवटचे होतील.”
येशूने आपल्या मृत्युबद्दल तिसऱ्यांदा केलेले भविष्य
मार्क 10:32-34; लूक 18:31-34
17 येशू यरूशलेम शहराला जात असता त्याने त्याच्या शिष्यांना एकाबाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला, 18 “पाहा, आपण यरूशलेम शहराकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरुन देण्यात येईल. ते त्यास मरणदंड ठरतील. 19 आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्यास परराष्ट्रीयांच्या हाती देतील. परंतु तिसऱ्या दिवशी तो परत जीवनात येईल.”
ऐहिक सन्मानाप्रीत्यर्थ विनंती
मार्क 10:35-45
20 त्यानंतर जब्दीच्या मुलांची आई, आपल्या मुलांसह त्याच्याकडे आली. ती त्याच्या पाया पडली आणि तिने त्यास एक विनंती केली. 21 त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, “माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.” 22 तो तिला म्हणाला, “तू काय मागत आहेस ते तुला समजत नाही! जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हास पिता येईल काय?” ते म्हणाले, होय, “पिता येईल!” 23 येशू त्याना म्हणाला, “तुम्ही खरोखर माझ्या प्याल्यातून प्याल खरे, पण माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसण्याचा मान कोणाला देणे हे ठरविणारा मी नाही, तर माझ्या पित्याने तो मान कोणाला द्यायचा हे ठरवले आहे.” 24 जेव्हा इतर दहा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते त्या दोघां भावांवर नाराज झाला.
खरे मोठेपण
25 मग येशूने त्यांना बोलावून म्हटले, “परराष्ट्रीय लोकांच्या राजांना लोकांवर आपली सत्ता आहे हे दाखवणे आवडले आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना आपले अधिकार वाटेल तसे वापरणे आवडते. 26 पण तुमचे वागणे तसे नसावे. जर तुमच्यातील कोणाला मोठे व्हायचे असेल तर त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. 27 आणि ज्याला पहिला व्हावयाचे आहे त्याने दास झाले पाहिजे. 28 म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे. जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
दोन आंधळ्यांना दृष्टिदान
मार्क 10:46-52; लूक 18:35-43
29 ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे आला. 30 रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभू येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा.” 31 जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया करा.” 32 मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” 33 त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, “प्रभूजी, आम्हास दिसावे अशी आमची इच्छा आहे.” 34 येशूला त्यांच्यांबद्दल कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले आणि ते त्याच्यामागे गेले.