The Gospel According to
Mark
मार्ककृत शुभवर्तमान
लेखक
सुरुवातीच्या मंडळीमधील वडिलांनी एकमताने हे मान्य केले की हा दस्तऐवज योहान मार्कने लिहिला होता. योहान मार्कचा दहावेळा नवीन करारात उल्लेख केला आहे (प्रेषित 12:12, 25; 13:5, 13; 15:37, 3 9; कलस्सै. 4:10; 2 तीमथ्य. 4:11; फिलेमोन 24; 1 पेत्र. 5:13). हे संदर्भ दर्शवितात की मार्क हा बर्णबाचा चुलत भाऊ होता (कलस्सै. 4:10). मार्कच्या आईचे नाव मरीया होते जी यरूशलेममध्ये संपत्ती आणि दर्जा असलेली स्त्री होती आणि तिचे घर प्राचीन ख्रिस्ती लोकांसाठी सभेचे घर होते (प्रेषित 12:12). योहान मार्क पौल आणि बर्णबा बरोबर पौलाच्या पहिल्या सुवार्तेच्या प्रवासात गेला (प्रेषित 12:25; 13:5). पवित्र शास्त्रासंबंधी पुरावे आणि प्राचीन मंडळीचे वडील पेत्र आणि मार्क यांच्यातील घनिष्ठ संबंध प्रदर्शित करतात (1 पेत्र. 5:13). तो पेत्राचा अनुवादक देखील होता आणि पेत्राच्या प्रचार प्रक्रियेतील संभाव्यतेबद्दल मार्कचे शुभवर्तमान प्रतिनिधिक स्त्रोत असू शकतील.
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ.स. 50 - 60.
मंडळीमधील वडिलांनी (आयरेनियस, क्लेमेंट ऑफ अलेक्झांड्रिया आणि इतर) अनेक लिखाणांना प्रतिबिंबित केले की मार्कचे शुभवर्तमान रोममध्ये लिहिलेले असू शकते. प्राचीन मंडळीच्या सूत्रांनी असे म्हटले आहे की शुभवर्तमान पेत्राच्या मृत्यूनंतर लिहिले होते (इ.स. 67-68).
प्राप्तकर्ता
दस्ताऐवजाचे पुरावे स्पष्ट करतात की मार्कने विशेषतः अन्य जातीय वाचकांसाठी आणि रोमन प्रेक्षकांना शुभवर्तमान लिहिले होते. याचे कारण असे असू शकते की येशूची वंशावळ त्यामध्ये समाविष्ट नाही कारण अन्य जातीय जगासाठी याचा अर्थ खूप कमी होईल.
हेतू
मार्कचे वाचक मुख्यत: रोमन ख्रिस्ती होते, ज्यांना इ.स. 67-68 मध्ये तीव्र छळाच्या दरम्यान सम्राट निरो ख्रिस्ती शासनाखाली गंभीरपणे छळ करण्यात आला आणि ठार मारण्यात आले. अशा परिस्थितीत, मार्कने अशा ख्रिस्ती लोकांना उत्तेजन देण्यासाठी या सुवार्तेची लिहिली जे अशा कठीण काळातून जात होते. येशूला दुःखी सेवक म्हणून चित्रित केले गेले. (यशया 53).
विषय
येशू-कष्टी सेवक
रूपरेषा
1. अरण्यात सेवाकार्यासाठी येशूची तयारी — 1:1-13
2. गालीलमध्ये व त्याच्या आसपास येशूची सेवा — 1:14-8:30
3. येशूचे सेवाकार्य, दुःख आणि मृत्यू — 8:31-10:52
4. यरूशलेममध्ये येशूची सेवाकार्ये — 11:1-13:37
5. वधस्तंभावर चढवण्याची कथा — 14:1-15:47
6. पुनरुत्थान आणि येशूचे स्वरूप — 16:1-20
1
बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश
मत्त. 3:1-12; लूक 3:1-12; योहा. 1:19-28
देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरूवात आहे.
यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे,
“पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो,
तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील;
अरण्यांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली,
‘परमेश्वराचा मार्ग तयार करा,
त्याच्या वाटा सरळ करा.’ ”
त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यांत बाप्तिस्मा देत होता आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता. यहूदीया प्रांत व यरूशलेम शहरातील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला. योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता व तो टोळ व रानमध खात असे. तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षाही महान असा कोणीएक माझ्यामागून येत आहे आणि मी त्याच्या वहाणांचा बंद खाली वाकून लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”
येशूचा बाप्तिस्मा
मत्त. 3:13-17; लूक 3:21-22; योहा. 1:29-34
त्या दिवसात असे झाले की, येशू गालील प्रांतातील नासरेथ नगराहून आला आणि योहानाच्या हातून यार्देन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला. 10 येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्यास दिसले. 11 तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
येशूची परीक्षा
मत्त. 4:1-11; लूक 4:1-11
12 मग आत्म्याने लगेचच त्यास अरण्यांत घालवले. 13 सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता. आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते.
येशूच्या लौकिक कार्याचा प्रारंभ
मत्त. 4:12-17; लूक 4:14-15
14 योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली. 15 तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.”
पहिल्या शिष्यांना पाचारण
मत्त. 4:18-22; लूक 5:1-11
16 येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. 17 येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.” 18 मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले. 19 तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळे नीट करताना दिसले. 20 त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग ते त्यांचा पिता जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
कफर्णहूमातील सभास्थानांत येशू शिक्षण देतो व अशुद्ध आत्मा काढतो
21 नंतर येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम नगरास गेले, आणि लगेचच येशूने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. 22 त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्यास अधिकार असल्यासारखा शिकवीत होता. 23 त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला, 24 आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, जो देवाचा पवित्र तो तूच.” 25 परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.” 26 “नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.” 27 लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!” 28 येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालील प्रांतात सर्वत्र पसरली.
पेत्राची सासू व इतर रोगी यांना येशू बरे करतो
मत्त. 8:14-15; लूक 4:38-39
29 येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला. 30 शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले. 31 तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्यांची सेवा करू लागली.
32 संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले. 33 सर्व नगर दरवाजापुढे जमा झाले. 34 त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही कारण ती त्यास ओळखत होती.
येशू प्रार्थनेसाठी एकांत स्थळी जातो व पुढे कफर्णहूम सोडतो
मत्त. 4:23-25; लूक 4:42-44
35 मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. 36 शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते, 37 व तो सापडल्यावर ते त्यास म्हणाले, गुरूजी “आम्ही सर्वजण तुमचा शोध करीत आहोत.” 38 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या गावात जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण त्यासाठीच मी निघून आलो आहे.” 39 मग तो सर्व गालील प्रांतातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला.
येशू कुष्ठरोग्याला बरे करतो
मत्त. 8:1-4; लूक 5:12-16
40 एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची त्यास विनंती केली. तो येशूला म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” 41 येशूला त्याचा कळवळा आला, त्याने हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” 42 आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला. 43 येशूने त्यास सक्त ताकीद दिली व लगेच लावून दिले. 44 आणि म्हटले, “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना साक्ष व्हावी म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.” 45 परंतु तो तेथून गेला व घोषणा करून ही बातमी इतकी पसरवली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे येत राहण्याचे थांबले नाही.