13
परमेश्वराच्या भवनाची धूळधान व युगाची समाप्ती याविषयी येशूचे भविष्य
मत्त. 24:1, 2; लूक 21:5, 6
मग येशू परमेश्वराच्या भवनातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एकजण त्यास म्हणाला, “गुरूजी, पाहा, कसे हे अद्भूत धोंडे व बांधलेली इमारत आहे.” येशू त्यास म्हणाला “तू या मोठ्या इमारती पाहतोस ना? येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक खाली पाडला जाईल.” येशू परमेश्वराच्या भवनासमोरच्या जैतुनाच्या डोंगरावर बसला होता. पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया यांनी त्यास एकांतात विचारले, “या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हास सांगा आणि या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल?” नंतर येशू त्यांना सांगू लागला, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील. जेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायांच्या अफवाविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडणारच आहे. पण एवढ्याने शेवट होणार नाही. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील आणि दुष्काळ पडतील. पण या गोष्टी म्हणजे केवळ नाशाची सुरूवात आहे.
तुम्ही सावध असा. ते तुम्हास न्यायसभांच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हास मार देतील. त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुम्हास राज्यकर्ते व राजे यांच्यासमोर उभे रहावे लागेल. 10 या गोष्टी घडण्यापूर्वी सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा झालीच पाहिजे. 11 ते तुम्हास अटक करून चौकशीसाठी आणतील तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळजी करू नका, तर त्या घटकेला जे काही सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल. 12 भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांवर उठतील आणि ते त्यांना ठार करतील. 13 आणि माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल.
14 जेव्हा तुम्ही नाशाला कारण अशी भयंकर गोष्ट, दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जो जिथे नको तेथे पाहाल. (वाचकाने याचा अर्थ काय तो समजावून घ्यावा) तेव्हा जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. 15 जो मनुष्य आपल्या घराच्या छतावर असेल त्याने घरातून काही आणण्यासाठी खाली उतरू नये. 16 आणि जर एखादा मनुष्य शेतात असेल तर त्याने आपला झगा आणण्यासाठी माघारी जाऊ नये. 17 त्या दिवसात ज्या स्त्रियांची मुले तान्ही असतील व अंगावर पाजत असतील त्यांच्यासाठी हे अती भयंकर होईल. 18 हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा. 19 कारण त्या दिवासात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधीही होणार नाही, असा असेल. 20 परमेश्वराने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या मनुष्यांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत. 21 आणि जर कोणी तुम्हास म्हणेल की ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे,’ तर त्यावर विश्वास ठेवू नका. 22 कारण काही लोक आपण खोटे ख्रिस्त किंवा खोटे संदेष्टे असल्याचा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांस फसवण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील. 23 पहा, तेव्हा तुम्ही सावध राहा. मी काळापूर्वीच तुम्हास सर्वकाही सांगून ठेवले आहे.
24 परंतु त्या दिवसात ही संकटे येऊन गेल्यावर,
‘सूर्य अंधकारमय होईल,
चंद्र प्रकाश देणार नाही.’
25 ‘आकाशातून तारे पडतील
आणि आकाशातील बळे डळमळतील.’
26 आणि लोक मनुष्याचा पुत्राला मेघांरूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानिशी आणि वैभवाने येताना पाहतील. 27 नंतर तो आपल्या देवदूतास पाठवील व चार दिशातून, पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांस एकत्र करील.
जागृतीची आवश्यकता
मत्त. 24:32-35; लूक 21:29-33
28 अंजिराच्या झाडापासून शिका. जेव्हा त्याच्या डहाळ्या कोमल होतात आणि त्यावर पाने फुटतात तेव्हा तुम्हास उन्हाळा जवळ आला हे समजते. 29 त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हास समजेल की, तो काळ अगदीच दाराशी येऊन ठेपला आहे. 30 मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. 31 स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.
32 त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांनाही नाही व पुत्रासही नाही. फक्त पित्याला ठाऊक आहे. 33 सावध असा, प्रार्थनेत जागृत असा कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. 34 ती वेळ अशी आहे की, एक मनुष्य प्रवासास निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नोकराला काम नेमून देतो. तो पहारेकऱ्यास जागरूक राहण्याची आज्ञा करतो. तसे हे आहे. 35 म्हणून तुम्ही जागे असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हास माहीत नाही. 36 जर तो अचानक आला तर तुम्हास झोपेत असताना पाहील. 37 मी तुम्हास सांगतो, ते सर्वांना सांगतो, जागृत राहा.”