16
कोरह, दाथान व अबीराम ह्यांचे बंड
1 कोरह इसहारचा मुलगा, इसहार कहाथचा मुलगा आणि कहाथ लेवीचा मुलगा, दाथान आणि अबीराम भाऊ होते आणि ती अलीयाबाची मुले होती. ओन पेलेथचा मुलगा होता. दाथान, अबीराम आणि ओन रऊबेन वंशातील होते. यांनी काही माणसे जमवली. 2 या चार मनुष्यांनी इस्राएलातून अडीचशे माणसे एकत्र जमविली आणि ते मोशेविरूद्ध उठले. ते लोकांनी निवडलेले नेते होते, हे सर्व लोकांस माहीत होते. 3 ते मोशेविरूद्ध व अहरोनाविरूद्ध एकत्र समुहाने आले. ते त्यांना म्हणाले, “तुम्ही फारच अधिकार दाखवता आता पुरे झाले! इस्राएलाचे इतर लोकसुद्धा पवित्र आहेत. त्यांच्यात अजूनही परमेश्वर राहतो. तुम्ही परमेश्वराच्या इतर लोकांपेक्षा स्वत:ला अधिक महत्वाचे समजत आहात.”
4 जेव्हा मोशेने ते ऐकले, तो पालथा पडला. 5 मग मोशे कोरह व त्याच्या सर्व अनुयायांना म्हणाला, “उद्या सकाळी परमेश्वर कोण खरोखर त्याचा मनुष्य आहे ते दाखवील. कोण खरा पवित्र आहे ते परमेश्वर दाखवील आणि परमेश्वर त्या मनुष्यास त्याच्याजवळ आणिल. परमेश्वर त्या मनुष्याची निवड करील आणि त्यास स्वत: जवळ आणिल. 6 म्हणून कोरह तू आणि तुझ्या गटाने धुपाटणे आणा. 7 उद्या अग्नी आणि धूप काही खास भांड्यात ठेवा. नंतर ती भांडी परमेश्वरासमोर आणा. खरोखरच जो पवित्र असेल त्याची परमेश्वर निवड करील. लेवीच्या वंशजांनो तुम्ही फार पुढे गेलात. तुम्ही चूक केलीत.”
8 मोशे कोरहाला आणखी म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो तुम्ही माझे ऐका 9 तुमची निवड इस्राएलच्या देवाने केली आहे आणि तुम्हास खास दर्जा दिला आहे म्हणून तुम्ही आनंदी असायला हवे. तुम्ही इस्राएलच्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहात. परमेश्वराने तुम्हास खास कामासाठी, इस्राएल लोकांस परमेश्वराची भक्ती करायला मदत व्हावी म्हणून त्याच्या पवित्र निवासमंडपात त्याच्याजवळ आणले. हे पुरेसे नाही का? 10 परमेश्वराने लेवीच्या वंशजांना याजकांच्या मदतीसाठी जवळ आणले. परंतु आता तुम्हीच याजक होण्याची वेळ प्रयत्न करीत आहात. 11 तुम्ही आणि तुमचे अनुयायी एकत्र आलात आणि परमेश्वराच्या विरूद्ध गेलात. अहरोनाने काही चूक केली का? नाही. मग तुम्ही अहरोनाविरूद्ध का तक्रार करीत आहात.”
12 नंतर मोशेने दाथान, अबीराम, या अलीयाबाच्या मुलांना बोलावले पण ते दोघे म्हणाले, आम्ही येणार नाही. 13 तू आम्हास रानात जिवे मारावे म्हणून दूध व मध वाहण्याच्या देशातून*सुपीक जमीन काढून वर आणले आहेस हे काय थोडे आहे. आणि आता आमच्यावर तुझी अधिक सत्ता आहे हे तुला दाखवायचे आहे. 14 आणखी तू आम्हास दूध व मध वाहण्याच्या देशात आणले नाही आणि आम्हास शेताचे व द्राक्षमळ्याचे वतन दिले नाही. आता तू पोकळ वचने देऊन आमचे डोळे आंधळे करीत आहेस काय? आम्ही तुझ्याकडे येणार नाही.
15 म्हणून मोशेला खूप राग आला. तो परमेश्वरास म्हणाला, “मी या लोकांच्या बाबतीत काहीही वाईट केले नाही. मी त्यांच्याकडून एक गाढव देखील घेतले नाही! आणि मी कोणाचेही वाईट केले नाही. 16 नंतर मोशे कोरहाला म्हणाला, उद्या तू आणि तुझे अनुयायी परमेश्वरापुढे उभे राहतील. तिथे तू अहरोन आणि तुझे अनुयायी असतील. 17 तुम्ही प्रत्येकाने एक भांडे आणावे त्यामध्ये धूप टाकावा आणि ते परमेश्वरास द्यावे. नेत्यांसाठी अडीचशे भांडी असतील आणि एकेक भांडे तुझ्यासाठी व अहरोनासाठी असेल.”
18 म्हणून प्रत्येकाने भांडे आणले आणि त्यामध्ये उद धूप जाळला, नंतर ते दर्शनमंडपाच्या दारात उभे राहिले. मोशे आणि अहरोनसुद्धा तिथे उभे राहिले. 19 कोरहानेसुद्धा त्याच्याविरुध्द दर्शनमंडपाच्या दारापाशी सर्व लोक जमा केले. नंतर प्रत्येकाला परमेश्वराचे तेज दिसले.
20 परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, 21 या लोकांपासून दूर जा. मला आता त्यांचा नाश करायचा आहे. 22 पण मोशे आणि अहरोन जमिनीवर पालथे पडले आणि ओरडले, हे देवा सर्व देहधारी आत्म्यांच्या, देवा! फक्त एका मनुष्याने पाप केले आहे! म्हणून सर्व मंडळीवर रागावू नकोस.
23 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, 24 सर्व लोकांस कोरह, दाथान, व अबीराम यांच्या तंबूपासून दूर जायला सांग.
25 मोशे उभा राहिला आणि दाथान व अबीराम यांच्याकडे गेला. इस्राएलचे सर्व वडिलधारी त्यांच्यामागे गेले. 26 मोशेने सर्व लोकांस बजावले, या दुष्टांच्या तंबू पासून दूर जा. त्यांच्या कोणत्याही वस्तुला हात लावू नका. जर तुम्ही हात लावला तर त्यांच्या पापामुळे तुमचाही नाश होईल. 27 म्हणून लोक कोरह, दाथान व अबीराम यांच्या तंबू पासून दूर गेले. दाथान आणि अबीराम त्यांच्या तंबूकडे गेले. ते त्यांच्या तंबू बाहेर आपल्या स्त्रिया, मुले आणि लहाण्या मुलांबरोबर उभे राहिले.
28 नंतर मोशे म्हणाला, “परमेश्वराने मला मी तुम्हास सांगितलेल्या गोष्टी करायला पाठवले आहे या बद्दलचा पुरावा मी तुम्हास दाखवीन. या गोष्टी करण्याची कल्पना माझी नव्हती हेही मी तुम्हास दाखवीन. 29 हे इथले लोक मरतील. पण ते जर सामान्य रीतीने मरण पावले जशी माणसे नेहमी मरतात, तर त्यावरून असे दिसेल की परमेश्वराने मला खरेच पाठवले नाही. 30 पण जर परमेश्वराने या लोकांस वेगळ्या नव्या रीतीने मारले. तर तुम्हास कळेल की त्यांनी परमेश्वराविरूद्ध पाप केले होते. हा पुरावा आहे. धरती दुभागेल आणि त्या लोकांस आपल्या पोटात घेईल. ते जिवंतपणीच त्यांच्या कबरेत जातील. आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जाईल.”
31 जेव्हा मोशेचे बोलणे संपले तेव्हा त्या लोकांच्या पायाखालची जमीन दुभागली. 32 धरतीने जणू आपले तोंड उघडून त्यांना गिळून टाकले. कोरहाची सगळी माणसे, त्याचे संपूर्ण घराणे आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जमिनीत गेली.
33 ते लोक जिवंतपणी कबरेत गेले आणि त्यांची सगळी चीजवस्तूही त्यांच्याबरोबर गेली. नंतर जमीन पूर्ववत झाली. ते नष्ट झाले-लोकांतुन नाहीसे झाले. 34 इस्राएल लोकांनी नाश होत असलेल्या लोकांचे आक्रोश ऐकले म्हणून ते सर्व सैरावैरा धावू लागले आणि म्हणाले, पृथ्वी आपल्यालासुद्धा गिळून टाकील. 35 नंतर परमेश्वराकडून अग्नी आला. त्याने धूप जाळणाऱ्या अडीचशे लोकांचा नाश केला.
36 परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला व म्हणाला 37 याजक अहरोन याचा मुलगा एलाजार याला धुपाटणी अग्नीतून काढ कारण ती पवित्र आहेत आणि तो अग्नी पसरावयाला सांग. 38 लोकांनी माझ्याविरूद्ध पाप केले आणि त्यांच्या पापामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. पण धुपाटणी भांडी अजूनही पवित्र आहेत. ही भांडी पवित्र आहेत कारण ती परमेश्वरास अर्पण केली होती. भांडी ठोकून त्याचा पत्रा कर. या पत्र्याचा उपयोग वेदी झाकायला कर. इस्राएलाच्या सर्व लोकांस हा ताकीद दिल्याचा इशारा असेल.
39 म्हणून याजक एलाजाराने लोकांनी आणलेली काशाची सर्व भांडी गोळा केली. ते सगळे लोक जळून गेले पण त्यांची भांडी मात्र होती. नंतर एलाजाराने काही मनुष्यांना भांडी ठोकून त्यांचा पत्रा करायला सांगितले. नंतर त्याने धातूचा पत्रा वेदीवर ठोकला व वेदी मढवली.
40 परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा केली होती तसेच त्याने केले. अहरोनाच्या वंशातीलच कोणीतरी परमेश्वरासमोर धूप जाळू शकतो, दुसऱ्या कोणी परमेश्वरासमोर धूप जाळला तर तो कोरह आणि त्याच्या अनुयायांप्रमाणे मरेल. हे इस्राएल लोकांनी लक्षात ठेवायची ही एक खूण होती.
41 दुसऱ्या दिवशी इस्राएलच्या सर्व लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रार केली. ते म्हणाले, तुम्ही परमेश्वराची माणसे मारली. 42 मोशे आणि अहरोन दर्शनमंडपाच्या दारात उभे होते. लोक मोशे आणि अहरोन विरूद्ध तक्रार करायला एकत्र जमले. पण जेव्हा त्यांनी दर्शनमंडपाकडे पाहिले तेव्हा ढगांनी त्यास झाकून टाकले आणि तिथे परमेश्वराचे तेज दिसू लागले. 43 हे पाहून मोशे आणि अहरोन दर्शनमंडपाच्या पुढच्या भागात आले.
44 मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, 45 त्या लोकांपासून दूर जा म्हणजे मी त्यांचा नाश करीन ताबोडतोब. मोशे आणि अहरोन यांनी त्यांचे चेहरे जमिनीपर्यंत लववून दंडवत घातले. 46 नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, तुझे तांब्याचे भांडे आणि थोडासा अग्नी वेदीवरुन घे. नंतर त्यावर धूप टाक. लवकर मंडळीकडे घेऊन जा आणि त्यांच्यासाठी प्रायश्चित कर. कारण. परमेश्वराचा कोप भडकला आहे; मरी सुरू झाली आहे.
47 म्हणून अहरोनाने मोशेने जे सांगितले ते केले. अहरोनाने अग्नी व धूप घेतला आणि मग तो मंडळीमध्ये धावत गेला. परंतु लोकात मरीची लागण झाली होती आणि त्याने धूप घालून लोकांसाठी प्रायश्चित केले. 48 अहरोन मरण पावलेल्या आणि अजून जिवंत असलेल्या लोकांच्या मध्ये जाऊन उभा राहिला, अहरोनाने लोकांस पवित्र करण्यासाठी प्रायश्चित केले आणि मरी तिथेच थांबली.
49 पण त्या मरीमुळे चौदा हजार सातशे लोक मरण पावले. यामध्ये कोरहामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा समावेश नाही. 50 भयानक मरी थांबली आणि अहरोन परत दर्शनमंडपाच्या दाराशी असलेल्या मोशेकडे गेला.