4
ज्ञानामुळे प्राप्त होणारे फायदे
मुलांनो, वडिलांचे शिक्षण ऐका,
आणि सुज्ञान समजण्यासाठी त्याकडे लक्ष द्या.
मी तुम्हास चांगला सल्ला देतो;
माझी शिकवण कधीही विसरु नका.
जेव्हा मी माझ्या वडिलाचा मुलगा होतो,
माझ्या आईच्या दृष्टीने सुकुमार व एकुलता एक होतो,
त्यांनी मला शिकवले आणि मला म्हणाले,
“तुझे मन माझी वचने घट्ट धरून ठेवो;
माझ्या आज्ञा पाळ आणि जिवंत राहा.
ज्ञान आणि सुज्ञता संपादन कर;
माझे शब्द विसरु नकोस आणि माझ्या मुखातले शब्द नाकारू नकोस;
ज्ञानाचा त्याग करू नकोस ते तुझे राखण करील;
त्याच्यावर प्रीती कर आणि ते तुझे रक्षण करील.
ज्ञान हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून ज्ञान संपादन कर,
आणि आपले सर्वस्व खर्चून सुज्ञता मिळव.
ज्ञान हृदयात जतन करून ठेव आणि ते तुला उंचावेल,
जेव्हा तू त्यास आलिंगन देशील तर ते तुझा सन्मान करील.
ते तुझ्या शिरावर सन्मानाचे वेष्टन देईल;
ते तुला सुंदर मुकुट देईल.”
10 माझ्या मुला, ऐक आणि माझ्या वचनाकडे लक्ष दे,
आणि तुझ्या आयुष्याची वर्षे पुष्कळ होतील.
11 मी तुला ज्ञानाचा मार्ग दाखविला आहे;
मी तुला सरळ मार्गाने घेऊन जात आहे.
12 जेव्हा तू चालशील, तेव्हा तुझ्या मार्गात कोणीही उभा राहणार नाही.
आणि जर तू धावशील, तर तू अडखळणार नाहीस.
13 शिस्त घट्ट धरून ठेव, ती सोडून देऊ नको;
ते सांभाळून ठेव, कारण ते तुझे जीवन आहे.
14 दुष्टांचे मार्ग आचरणात आणू नको,
आणि जे वाईट करतात त्यांच्या मार्गाने चालू नको.
15 ते टाळ, त्याजवळ जाऊ नकोस;
त्यापासून मागे फीर आणि दुसऱ्या मार्गाने जा.
16 कारण त्यांनी वाईट केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही
आणि कोणाला अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही.
17 कारण ते दुष्टाईने मिळवलेली भाकर खातात
आणि हिंसेचे मद्य पितात.
18 परंतु योग्य करणाऱ्याचा मार्ग जो उदयाच्या प्रकाशासारखा आहे;
मध्यान्हापर्यंत अधिकाधिक प्रकाशणाऱ्यासारखा आहे.
19 पण दुष्टाचे मार्ग अंधकारासारखे आहेत,
ते कशाशी अडखळले हे त्यांना समजत नाही.
20 माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष दे.
माझे सांगणे ऐक.
21 ती तुझ्या डोळ्यापासून जाऊ देऊ नकोस;
ती तुझ्या अंतःकरणात ठेव.
22 कारण ज्यांना माझी वचने सापडतात त्यांस ती जीवन देतात,
आणि त्यांच्या सर्व देहाला आरोग्य देतात.
23 तुझे अंतःकरण सुरक्षित ठेव आणि सर्व दक्षतेने त्याचे संरक्षण कर,
कारण त्यातूनच जीवनाचा झरा वाहतो.
24 वाकडे बोलणे तुझ्यापासून दूर ठेव,
आणि दूषित बोलणे सोडून दे.
25 तुझे डोळे नीट समोर पाहोत,
आणि तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत.
26 तुझ्या पावलांसाठी सपाट वाट कर;
मग तुझे सर्व मार्ग सुरक्षित होतील.
27 तू उजवीकडे किंवा डावीकडे दूर वळू नको;
तू आपला पाय वाईटापासून राख.