13
 1 सुज्ञ मुलगा आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतो,  
परंतु निंदक निषेध ऐकत नाही.   
 2 आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो,  
पण अविश्वासणाऱ्याची भूक जुलूम आहे.   
 3 जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो,  
परंतु जो आपले तोंड उघडतो तो स्वतःचा नाश करून घेतो.   
 4 आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही,  
पण उद्योग्याची भूक पूर्णपणे तृप्त होते.   
 5 नीतिमान लबाडीचा तिरस्कार करतो,  
पण दुर्जन जे लाजिरवाणे आहे ते करतो, आणि स्वतःला किळसवाणे करतो.   
 6 नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते,  
पण पाप्याला त्याचे पाप उलथून टाकते.   
 7 जो कोणी आपणाला संपन्न करतो, पण त्यांच्याजवळ मात्र काहीच नसते,  
आणि जो कोणी सर्वकाही देऊन टाकतो, खरोखर तो अजून श्रीमंत आहे.   
 8 श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे,  
पण गरीब मनुष्यास अशा प्रकारच्या धमक्या कधीच मिळत नाहीत.   
 9 नीतिमानाचा प्रकाश आनंदाने प्रकाशतो,  
पण दुष्टाचा दीप मालवला जाईल.   
 10 गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात,  
पण जो चांगला सल्ला ऐकतो त्याच्याजवळ ज्ञान असते.   
 11 वाईट मार्गाने मिळवलेले धन कमी होत जाते,  
पण जो आपल्या हाताने काम करून पैसा कमावतो, त्याचा पैसा वाढत जातो.   
 12 जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते,  
परंतु इच्छा पूर्ण होते तेव्हा ते जीवनाचे झाड आहे.   
 13 जो कोणी शिक्षणाचा तिरस्कार करतो तो स्वतःवर अनर्थ आणतो,  
पण जो कोणी आज्ञेचा आदर करतो त्यास प्रतिफळ मिळेल.   
 14 सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे,  
ते तुम्हास मृत्युपाशापासून दूर वळविल.   
 15 सुबोध अनुग्रह मिळवून देतो,  
पण विश्वासघातक्याचा मार्ग कधी न संपणारा आहे.   
 16 शहाणा मनुष्य कृती करण्याआधी विचार करतो.  
परंतु मूर्ख मनुष्य त्याच्या कृतीने तो मूर्ख आहे हे दर्शवितो.   
 17 दुष्ट निरोप्या संकटात पडतो,  
पण विश्वासू वकील समेट घडवून आणतो.   
 18 जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर त्यास गरीबी आणि लाज प्राप्त होईल,  
पण जर एखादा त्याच्या शासनातून शिकला तर त्याचा सन्मान होईल.   
 19 इच्छातृप्ती जिवाला गोड लागते,  
पण वाईटापासून दूर होणे याचा मूर्खांना द्वेष वाटतो.   
 20 शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल,  
पण जर तुम्ही मूर्खांशी संगत केली तर तुम्ही संकटात पडाल.   
 21 आपत्ती पाप्याच्या पाठीस लागते,  
पण जे कोणी चांगले करतो त्यास प्रतिफळ मिळते.   
 22 चांगला मनुष्य आपल्या नातवंडांना वतन देऊन ठेवतो,  
पण पाप्यांची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते.   
 23 गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते,  
पण अन्यायामुळे अनेकांचा नाश होतो.   
 24 जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो,  
पण जो कोणी आपल्या मुलांवर प्रेम करतो तो काळजीपूर्वक त्यांना शिस्त लावतो.   
 25 जो चांगले करतो तो त्याची भूक तृप्त होईपर्यंत जेवतो,  
पण दुष्टांचे पोट रिकामेच राहते.