19
ज्याची वाणी कुटिल असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा
जो कोणी गरीब मनुष्य आपल्या सात्विकपणाने चालतो तो उत्तम आहे.
ज्ञानाशिवाय इच्छा असणे सुद्धा चांगले नाही,
आणि जो कोणी उतावळ्या पायांचा आहे तो वाट चुकतो.
मनुष्याचा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो,
आणि त्याचे मन परमेश्वराविरूद्ध संतापते.
संपत्ती खूप मित्रांची भर घालते,
पण गरीब मनुष्याचे मित्र त्याच्यापासून वेगळे होतात.
खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,
आणि जो कोणी लबाड्या करतो तो सुटणार नाही.
उदार मनुष्यापासून पुष्कळ लोक मदतीसाठी विचारणा करतात;
आणि जो कोणी दान देतो त्याचा प्रत्येकजण मित्र आहे.
गरीब मनुष्याचे सर्व बंधू त्याचा द्वेष करतात,
तर मग त्याचे मित्र त्याच्यापासून किती तरी दूर जाणार!
तो बोलत त्यांच्या पाठोपाठ जातो पण ते निघून जातात.
जो कोणी ज्ञान मिळवतो तो आपल्या जिवावर प्रेम करतो,
जो कोणी सुज्ञता सांभाळतो त्यास जे काही चांगले आहे ते मिळेल.
खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,
पण जो कोणी लबाड्या करतो त्याचा नाश होईल.
10 मूर्खाला आलिशानपणा शोभत नाही,
तसे सरदारांवर राज्य करणे गुलामाला कितीतरी कमी शोभते.
11 बुद्धीने मनुष्य रागास मंद होतो,
आणि अपराधाकडे दुर्लक्ष करणे त्याची शोभा आहे.
12 राजाचा राग सिंहाच्या गर्जनेसारखा आहे,
पण त्याचा उपकार गवतावर पडलेल्या दहिवरासारखे आहे.
13 मूर्ख मुलगा आपल्या वडिलांना अरिष्टासारखा आहे;
आणि भांडखोर पत्नी सतत गळणाऱ्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे.
14 घर व संपत्ती आईवडीलांकडून आलेले वतन आहे,
पण समंजस पत्नी परमेश्वरापासून आहे.
15 आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो,
पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो.
16 जो कोणी आज्ञा पाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो,
पण जो मनुष्य आपल्या मार्गाविषयी विचार करत नाही तो मरेल.
17 जो कोणी गरीबावर दया करतो तो परमेश्वरास उसने देतो,
आणि तो त्याने जे काही केले त्याची परतफेड करील.
18 काही आशा असेल तर आपल्या मुलाला शिक्षा कर,
आणि त्याच्या मरणाची तुझ्या जिवाला काळजी वाटू देऊ नको.
19 रागीट मनुष्याला दंड दिला पाहिजे;
जर तुम्ही त्यास सोडवले, तर तुम्हास दुसऱ्या वेळेसही सोडवावे लागेल.
20 सल्ला ऐक आणि शिक्षण स्वीकार,
म्हणजे तू आपल्या आयुष्याच्या शेवटी सुज्ञान होशील.
21 मनुष्याच्या मनात बऱ्याच योजना येतात,
पण परमेश्वराचे उद्देश स्थिर राहतील.
22 प्रामाणिकपणा ही मनुष्याची इच्छा असते;
आणि खोटे बोलणाऱ्यापेक्षा गरीब चांगला.
23 परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे;
आणि तो जीवनाकडे नेतो,
आणि ज्या कोणाकडे ते आहे तो समाधानी आहे,
आणि त्याची संकटांनी हानी होणार नाही.
24 आळशी आपला हात ताटात घालतो,
आणि तो पुन्हा आपल्या तोंडाकडेसुद्धा घेऊन जात नाही.
25 निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल,
बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल.
26 जो कोणी आपल्या पित्याला लुटतो, व आईला हाकलून लावतो,
तो मुलगा लाज आणि दोष आणणारा आहे.
27 माझ्या मुला, जर तू सूचना ऐकण्याचे थांबवले
तर ज्ञानाच्या वचनापासून भटकशील.
28 भ्रष्ट साक्षीदार न्यायाची थट्टा करतो
आणि वाईटाचे मुख अन्याय गिळून टाकते.
29 निंदकासाठी धिक्कार
आणि मूर्खाच्या पाठीसाठी फटके तयार आहेत.