21
 1 राजाचे मन पाण्याच्या प्रवाहासारखे परमेश्वराच्या हातात आहे;  
तो त्यास वाटेल तेथे वळवतो.   
 2 प्रत्येक मनुष्याचे मार्ग त्याच्या दृष्टीने योग्य असतात,  
परंतु परमेश्वर अंतःकरणे तोलून पाहतो.   
 3 योग्य व न्याय करणे हे यज्ञापेक्षा  
परमेश्वरास अधिक मान्य आहेत.   
 4 घमेंडखोर दृष्टी व गर्विष्ठ मन  
दुर्जनांच्या शेतातील उपज हे पाप उत्पन्न करतात.   
 5 परीश्रमपूर्वक केलेल्या योजनांमुळे भरभराट होते,  
परंतु जो घाईघाईने कृती करतो तो केवळ दरिद्री होतो.   
 6 लबाड जिव्हेने मिळवलेली संपत्ती  
ही वाफेसारखी क्षणभंगुर आहे ती मरण शोधते.   
 7 दुष्टांचा बलात्कार त्यांना झाडून टाकील,  
कारण ते न्याय करण्याचे नाकारतात.   
 8 अपराधी मनुष्याचा मार्ग वाकडा असतो,  
पण जो शुद्ध आहे तो योग्य करतो.   
 9 भांडखोर पत्नीबरोबर मोठ्या घरात राहाण्यापेक्षा,  
धाब्याच्या कोपऱ्यात राहणे अधिक चांगले.   
 10 दुष्टाचा जीव वाईटाची हाव धरतो;  
त्याच्या शेजाऱ्याला तो दया दाखवत नाही.   
 11 जेव्हा निंदकास शासन होते तेव्हा अज्ञानी शहाणे होतात;  
आणि जेव्हा सुज्ञास शिक्षण मिळते तेव्हा त्याच्या ज्ञानात वाढ होते.   
 12 नीतिमान दुष्टाच्या घराकडे लक्ष लावतो,  
तो दुष्टांचा नाश करण्यासाठी त्यांना उलथून टाकतो.   
 13 जो कोणी गरिबाची आरोळी ऐकत नाही,  
तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही.   
 14 गुप्तपणे दिलेली देणगी राग शांत करते,  
आणि दडवलेली देणगी तीव्र कोप दूर करते.   
 15 योग्य न्यायाने नीतिमानाला आनंद होतो.  
पण तोच दुष्कर्म करणाऱ्यांवर फार मोठी भीती आणतो.   
 16 जो कोणी ज्ञानाच्या मार्गापासून भटकतो,  
त्यास मरण पावलेल्यांच्या मंडळीत विसावा मिळेल.   
 17 ज्याला ख्यालीखुशाली प्रिय आहे तो दरिद्री होतो;  
ज्याला द्राक्षरस आणि तेल प्रिय आहे तो श्रीमंत होणार नाही.   
 18 जो कोणी चांगले करतो त्याची खंडणी दुर्जन आहे,  
आणि सरळांचा मोबदला विश्वासघातकी असतो.   
 19 भांडखोर आणि खूप तक्रार करून अशांती निर्माण करणाऱ्या पत्नीबरोबर राहाण्यापेक्षा  
वाळवंटात राहाणे अधिक चांगले.   
 20 सुज्ञाच्या घरात मोलवान खजिना आणि तेल आहेत,  
पण मूर्ख मनुष्य ते वाया घालवतो.   
 21 जो कोणी नीतिमत्ता आणि दया करतो,  
त्यास आयुष्य, उन्नती आणि मान मिळेल.   
 22 सुज्ञ मनुष्य बलवानांच्या नगराविरूद्ध चढतो,  
आणि तो त्यांच्या संरक्षणाचा आश्रयदुर्ग पाडून टाकतो.   
 23 जो कोणी आपले तोंड व जीभ सांभाळतो,  
तो संकटापासून आपला जीव वाचवतो.   
 24 गर्विष्ठ व घमेंडखोर मनुष्यास उद्दाम असे नाव आहे.  
तो गर्वाने उद्धट कृती करतो.   
 25 आळशाची वासना त्यास मारून टाकते;  
त्याचे हात काम करण्यास नकार देतात.   
 26 तो सर्व दिवस हाव आणि अधिक हाव धरतो,  
परंतु नीतिमान देतो आणि मागे धरून ठेवत नाही.   
 27 दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते,  
तर मग तो यज्ञ दुष्ट हेतूने आणतो ते किती अधिक वीट असे आहे.   
 28 खोटा साक्षीदार नाश पावेल,  
पण जो कोणी ऐकतो त्याप्रमाणे सर्व वेळ तसे बोलतो.   
 29 दुष्ट मनुष्य आपले मुख धीट करतो,  
पण सरळ मनुष्य आपल्या मार्गाचा नीट विचार करतो.   
 30 परमेश्वराविरूद्ध शहाणपण, बुद्धि  
किंवा युक्ती ही मुळीच उभी राहू शकत नाहीत.   
 31 लढाईच्या दिवसासाठी घोडा तयार करतात,  
पण तारण परमेश्वराकडून आहे.