6
अडचणीच्या प्रसंगी दयेची याचना
मुख्य वाजंत्र्यासाठी; तंतुवाद्यावरचे शेमीनीथ नावाच्या सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र.
हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस,
किंवा तुझ्या संतापात मला शिक्षा करू नकोस.
हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे.
हे परमेश्वरा मला निरोगी कर, कारण माझी हाडे ठणकत आहेत.
माझा जीव फार घाबरला आहे.
परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?
हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव!
तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने मला तार.
कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही.
मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार?
मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे.
रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो.
मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.
शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत.
माझ्या सर्व शत्रूंमुळे ते जीर्ण झाले आहेत.
अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा.
कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.
परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे;
त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आहे.
10 माझे सर्व शत्रू लाजवले जातील आणि फार घाबरतील.
ते माघारे फिरतील आणि अकस्मात लज्जित होतील.