69
संकटसमयी केलेली आरोळी
दाविदाचे स्तोत्र
हे देवा, मला तार;
कारण पाणी माझ्या गळ्याशी * जीवाशीयेऊन पोहचले आहे.
मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही;
मी खोल पाण्यात आलो आहे, तेथे पुराचे पाणी माझ्यावरून वाहत आहे.
माझ्या रडण्याने मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे;
माझ्या देवाची वाट पाहता माझे डोळे शिणले आहेत.
विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही अधिक आहेत;
जे अन्यायाने माझे वैरी असून मला कापून काढायला पाहतात ते बलवान आहेत;
जे मी चोरले नव्हते, ते मला परत करावे लागले.
हे देवा, तू माझा मूर्खापणा जाणतो,
आणि माझी पापे तुझ्यापासून लपली नाहीत.
हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतिक्षा करतात, त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये.
हे इस्राएलाच्या देवा, जे तुला शोधतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये.
कारण तुझ्याकरता मी निंदा सहन केली आहे;
लाजेने माझे तोंड झाकले आहे.
मी आपल्या बंधूला परका झालो आहे,
आपल्या आईच्या मुलांस विदेशी झालो आहे.
कारण तुझ्या मंदीराविषयीच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे,
आणि तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेल्या निंदा माझ्यावर पडल्या आहेत.
10 जेव्हा मी रडलो आणि उपवास करून माझ्या जिवाला शिक्षा केली मी उपवास करून स्वतःला नम्र केले,
तेव्हा ते जसे माझ्या स्वतःची निंदा होती.
11 जेव्हा मी गोणपाट आपले वस्र केले,
तेव्हा मी त्यांना उपहास असा झालो.
12 जे नगराच्या वेशीत बसतात;
ते माझी निंदा करतात; मी मद्यप्यांचा गीत झालो.
13 पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो;
हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपल्या तारणाच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.
14 मला चिखलातून बाहेर काढ, आणि त्यामध्ये मला बुडू देऊ नकोस;
माझा तिरस्कार करणाऱ्यापासून मला वाचव. खोल पाण्यापासून मला काढ.
15 पुराच्या पाण्याने मला पूर्ण झाकून टाकू नकोस,
खोल डोह मला न गिळो.
खाच आपले तोंड माझ्यावर बंद न करो.
16 हे परमेश्वरा, मला उत्तर दे,
कारण तुझ्या कराराची विश्वसनियता उत्तम आहे.
17 आपल्या सेवकापासून आपले तोंड लपवू नकोस,
कारण मी क्लेशात आहे; मला त्वरीत उत्तर दे.
18 माझ्या जिवाजवळ ये आणि त्यास खंडून घे;
माझ्या शत्रूंमुळे खंडणी भरून मला सोडव.
19 तुला माझी निंदा, माझी लाज आणि माझी अप्रतिष्ठा माहित आहे;
माझे विरोधक माझ्यापुढे आहेत;
20 निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे;
माझी कीव करणारा कोणीतरी आहे का हे मी पाहिले, पण तेथे कोणीच नव्हता;
मी सांत्वनासाठी पाहिले, पण मला कोणी सापडला नाही.
21 त्यांनी मला खाण्यासाठी विष दिले;
मला तहान लागली असता आंब दिली
22 त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत;
जेव्हा ते सुरक्षित आहेत असा विचार करतील, तो त्यांना सापळा होवो.
23 त्यांचे डोळे आंधळे होवोत यासाठी की, त्यांना काही दिसू नये;
आणि त्यांची कंबर नेहमी थरथर कापावी असे कर.
24 तू त्यांच्यावर आपला संताप ओत,
आणि तुझ्या संतापाची तीव्रता त्यांना गाठो.
25 त्यांची ठिकाणे ओसाड पडो;
त्यांच्या तंबूत कोणीही न राहो.
26 कारण ज्याला तू दणका दिला त्याचा ते छळ करतात;
तू ज्यांस जखमी केलेस त्यांच्या वेदनेविषयी ते दुसऱ्याला सांगतात.
27 ते अन्यायानंतर अन्याय करतात त्यांना दोष लाव;
तुझ्या न्यायाच्या विजयात त्यांना येऊ देऊ नको.
28 जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत,
आणि नितिमानांबरोबर त्यांची नावे लिहिली न जावोत.
29 पण मी गरीब आणि दु:खी आहे;
हे देवा, तुझे तारण मला उंचावर नेवो.
30 मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन,
आणि धन्यवाद देऊन त्यास उंचाविन.
31 ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या,
किंवा दुभागलेल्या खुराच्या गोऱ्ह्यांपेक्षा परमेश्वरास आवडेल.
32 लीनांनी हे पाहिले आहे आणि हर्षित झाले;
जे देवाचा शोध घेतात त्या तुमचे हृदय जिवंत होवो.
33 कारण परमेश्वर गरजवंताचे ऐकतो
आणि आपल्या बंदिवानांचा तिरस्कार करत नाही.
34 आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यामध्ये संचार करणारे
प्रत्येकगोष्ट त्याची स्तुती करा.
35 कारण देव सियोनेला तारील आणि यहूदाची नगरे पुन्हा बांधील;
लोक तेथे राहतील आणि ते त्यांच्या मालकीचे होईल.
36 त्याच्या सेवकाचे वंशजही ते वतन करून घेतील;
आणि ज्यांना त्याचे नाव प्रिय आहे ते तेथे राहतील.

*69:1 जीवाशी

69:10 मी उपवास करून स्वतःला नम्र केले