138
परमेश्वराच्या कृपाप्रसादाबद्दल उपकारस्तुती
दाविदाचे स्तोत्र
1 मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन;
मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन.
2 मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन,
तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन.
तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची *कराराचीथोरवी वाढविली आहेस.
3 मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस.
तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
4 हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील,
कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत.
5 खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील
कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे.
6 कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो,
पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.
7 जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस.
माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस;
आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो.
8 परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे;
हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे.
तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस.