142
अडचणीच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र
मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो;
मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो.
मी आपला विलाप त्याच्यासमोर ओततो;
त्यास मी आपल्या समस्या सांगतो.
जेव्हा माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला,
तेव्हा तू माझा मार्ग जाणला.
ज्या मार्गात मी चाललो,
त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे.
माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा,
कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही.
मला कशाचाही आश्रय नाही;
माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही.
हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो;
मी म्हणतो, तू माझा आश्रय आहेस,
जिवंताच्या भूमित तू माझा वाटा आहेस.
माझ्या आरोळीकडे लक्ष दे,
कारण माझी फार दुर्दशा झाली आहे;
माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव,
कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत.
मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी,
म्हणून माझा जीव बंदीतून काढ.
नितीमान माझ्याभोवती जमतील,
कारण तू माझ्याशी चांगला आहेस.