15
सात वाट्या आणि पीडा
यानंतर मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह बघितले; ज्यांच्याजवळ सात पीडा होत्या, असे सात देवदूत मी पाहिले त्या शेवटल्या पीडा होत्या, कारण देवाचा क्रोध त्यानंतर पूर्ण होणार होता.
मग मी बघितले की, जणू एक अग्निमिश्रित काचेचा समुद्र आहे आणि ज्यांनी त्या पशूवर व त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय प्राप्त केला होता ते त्या काचेच्या समुद्राजवळ, देवाने दिलेली वीणा घेऊन उभे होते.
देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकऱ्याचे गीत गात होते.
सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत.
हे प्रभू देवा, तू सर्वांवर राज्य करतो
तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत.
हे प्रभू, तुला कोण भिणार नाही?
आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही?
कारण तू एकच पवित्र आहेस;
कारण सगळी राष्ट्रे येऊन
तुझ्यापुढे नमन करतील.
कारण तुझ्या नीतिमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.
नंतर मी बघितले आणि साक्षीच्या मंडपाचे परमेश्वराचे स्वर्गातील भवन उघडले गेले. आणि त्या भवनातून सात देवदूत बाहेर आले; त्यांच्याजवळ सात पीडा होत्या. त्यांनी स्वच्छ, शुभ्र तागाची वस्त्रे परिधान केली होती आणि आपल्या छातीभोवती सोन्याचे पट्टे बांधले होते. तेव्हा त्या चार प्राण्यांतील एकाने त्या सात देवदूतांना, जो युगानुयुग जिवंत आहे त्या देवाच्या रागाने भरलेल्या, सात सोन्याच्या वाट्या दिल्या. आणि देवाच्या सामर्थ्यापासून व तेजापासून जो धूर निघाला, त्याने परमपवित्रस्थान भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या सात पीडा पूर्ण होईपर्यंत कोणीही आत जाऊ शकला नाही.