Romans
प्रेषित पौलाचे रोमकरांस पत्र
अभिनंदन
१ प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून; २ देवाने सुवार्तेविषयी आपल्या संदेष्ट्यांद्वारे पवित्र शास्त्रलेखात अगोदरच अभिवचन दिले होते; ३ ती सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्मास आला. ४ व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टी प्रमाणे मरण पावलेल्यातून पुन्हा उठण्याने तो सामर्थ्याने देवाचा पुत्र ठरवला गेला; तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे. ५ त्याच्याद्वारे आम्हास कृपा व प्रेषितपण ही मिळाली आहेत, ह्यासाठी की सर्व राष्ट्रांत त्याच्या नावाकरता विश्वासाचे आज्ञापालन केले जावे.
६ त्यांपैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यास बोलावलेले आहात. ७ रोममधील तुम्हा सर्वांस, देवाच्या प्रियांस, पवित्रजन होण्यास बोलावलेल्यांस देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती मिळत राहो.
रोम शहराला भेट देण्याचा पौलाचा बेत
८ मी तुमच्यातल्या सर्वांसाठी प्रथम येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्या देवाचे उपकार मानतो कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. ९ मी ज्याच्या पुत्राच्या सुवार्तेत माझ्या आत्म्याने ज्याची सेवा करीत आहे, तो देव माझा साक्षी आहे की, मी निरंतर माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करतो; १० आणि अशी विनवणी करतो की, आता शेवटी शक्यतो देवाच्या इच्छेने तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा. ११ कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हास काही आत्मिक कृपादान दयावे ह्यासाठी मी तुम्हास भेटण्यास उत्कंठित आहे; १२ म्हणजे आपल्या एकमेकांना तुमच्या व माझ्या, विश्वासाने, मला तुमच्याबरोबर उत्तेजन मिळावे. १३ बंधूंनो, मला जसे इतर परराष्ट्रीयात फळ मिळाले, तसेच तुमच्यात काही फळ मिळावे म्हणून, मी तुमच्याकडे यावे असे पुष्कळदा योजले होते, पण आतापर्यंत अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही. १४ मी ग्रीक व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा देणेकरी आहे. १५ म्हणून मी माझ्याकडून रोममधील तुम्हासही सुवार्ता सांगण्यास उत्सुक आहे.
सुवार्तेचे स्वरूप
१६ कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही. १७ कारण तिच्या द्वारे देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते कारण असा शास्त्रलेख आहे की, “नीतिमान विश्वासाने जगेल.”
परराष्ट्रीयांची दुष्टाई
१८ वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. १९ कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने स्वतः त्यांना ते प्रकट केले आहे.
२० कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही. २१ कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही किंवा उपकार मानले नाहीत. पण ते स्वतःच्या कल्पनांत विचारहीन झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले. २२ स्वतःला ज्ञानी म्हणता म्हणता ते मूर्ख बनले. २३ आणि अविनाशी देवाच्या गौरवाऐवजी त्यांनी नाशवंत मनुष्य, तसेच पक्षी आणि चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या स्वरूपाची प्रतिमा केली.
२४ म्हणून त्यांना आपल्या शरीराचा त्यांचा त्यांच्यातच दुरुपयोग करण्यास देवानेदेखील त्यांना त्यांच्या अंतःकरणातील वासनांद्वारे अमंगळपणाच्या स्वाधीन केले. २५ त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले आणि निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन.
२६ या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; कारण त्यांच्या स्त्रियांनीही आपला नैसर्गिक उपभोग सोडून अनैसर्गिक प्रकार स्वीकारले; २७ आणि तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून ते आपल्या वासनांत एकमेकांविषयी कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांशी अयोग्य कर्म केले आणि त्यांनी आपल्या संभ्रमाचे योग्य प्रतिफळ आपल्याठायी भोगले.
२८ आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. २९ ते सर्व प्रकारच्या अनीतीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्ट भाव, ह्यांनी पूर्ण भरलेले; कानगोष्टी करणारे, ३० निंदक, देवद्वेष्टे, टवाळखोर, गर्विष्ठ, प्रौढी मिरवणारे, वाईट गोष्टी शोधून काढणारे, आई-वडीलांचा अवमान करणारे, ३१ निर्बुद्ध, वचनभंग करणारे, दयाहीन व निर्दय झाले. ३२ आणि या गोष्टी करणारे मरणाच्या शिक्षेस पात्र आहेत हा देवाचा न्याय त्यांना कळत असून ते त्या करतात एवढेच केवळ नाही, पण अशा गोष्टी करणार्‍यांना ते संमतीही देतात.