12
नवीन जिवितक्रम
म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि या जगाशी समरूप होऊ नका पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.
आध्यात्मिक दानांचा योग्य उपयोग
कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे, मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की, त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे. कारण आपल्याला एका शरीरात जसे पुष्कळ अवयव आहेत आणि सर्व अवयवांचे काम एक नाही, तसे आपण पुष्कळ असून ख्रिस्तात एक शरीर आहोत; आणि आपण एकमेकांचे अवयव आहोत. पण आपल्याला पुरविलेल्या कृपेप्रमाणे आपल्याला वेगवेगळी कृपादाने आहेत; जर ते परमेश्वराचा संदेश देणे असेल तर विश्वासाच्या परिमाणानुसार आपण संदेश द्यावेत; सेवा असेल, तर सेवा करण्यात तत्पर रहावे; जो शिक्षण देतो त्याने शिक्षण देण्यात, किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर रहावे; जो दान देतो त्याने औदार्याने द्यावे; जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा, जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी.
ख्रिस्ती जीवितक्रमाचे नियम
प्रीती निष्कपट असावी. वाईटापासून दूर रहा, चांगल्याला बिलगून रहा. 10 बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे, 11 कामात आळशी न होत, आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा करणारे व्हा. 12 आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे, 13 पवित्रजनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा. 14 जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. 15 आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि रडणार्‍यांबरोबर रडा. 16 एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका. 17 वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा. 18 शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा. 19 प्रियांनो, तुम्ही स्वतः सूड घेऊ नका, पण क्रोधाला वाव द्या कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे परमेश्वर म्हणतो.’
20 पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे;
तो तान्हेला असेल तर त्यास प्यायला दे;
कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील.
21 वाईटाने जिंकला जाऊ नकोस; पण बऱ्याने वाईटाला जिंक.