11
दावीद इस्राएलचा राजा झाला 
  1 मग इस्राएलचे पुढारी एकत्र आले व हेब्रोन येथे दावीदाकडे आले आणि त्याला म्हणाले, “आम्ही तर तुमचेच मांस आणि रक्त आहोत.   2 मागील काळात, जेव्हा शौल राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएली लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ”   
 3 जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले होते, तेव्हा त्याने याहवेहसमोर हेब्रोन येथे त्यांच्याशी एक करार केला आणि त्यांनी दावीदाचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला, जसे याहवेहने शमुवेलद्वारे वचन दिले होते.   
दावीद यरुशलेम जिंकून घेतो 
  4 नंतर दावीद व इस्राएलचे सर्व लोक मिळून यरुशलेमला (म्हणजे यबूसला) गेले.   5 तिथे राहणारे यबूसी लोक दावीदाला म्हणाले, “तू या शहरात प्रवेश करू शकणार नाही.” तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे.   
 6 दावीद म्हणाला, “जो कोणी यबूसींवर हल्ला करण्यात पुढाकार घेईल तो सेनापती होईल.” मग जेरुइयाहचा पुत्र योआबने पहिल्याने आक्रमण करण्यास गेल्यामुळे तो दावीदाच्या सैन्याचा सेनापती झाला.   
 7 तेव्हा दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला, म्हणून त्याला दावीदाचे शहर असे नाव पडले.   8 दावीदाने मिल्लोपासून गडाभोवतालच्या शहराच्या भागाचा विस्तार केला आणि योआबाने बाकी यरुशलेमची पुनर्बांधणी केली.   9 आणि दावीद अधिकाधिक शक्तिशाली बनत गेला, कारण सर्वसमर्थ याहवेह त्याच्याबरोबर होते.   
दावीदाचे शूर योद्धे 
  10 दावीदाच्या काही अत्यंत शूर योद्ध्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत—याहवेहच्या कराराप्रमाणे या योद्ध्यांनी इस्राएली पुढार्यांसह राज्याची वाढ करण्यासाठी त्याला मजबूत आधार दिला.   11 दावीदाच्या पराक्रमी योद्ध्यांची नावे:  
हखमोनी याशबआम*दुसरे नाव यशोब-बाल हा दावीदाच्या सैन्यातील पहिल्या श्रेणीच्या वीरांपैकी होता; त्याने भाला उगारून एका हल्ल्यात तीनशे लोकांचा वध केला.   
 12 त्याच्यानंतर अहोहचा रहिवासी, दोदोचा पुत्र एलअज़ार होता, तो तीन पराक्रमी योद्ध्यांपैकी एक होता.   13 पस-दम्मीम येथे पलिष्ट्यांबरोबर केलेल्या लढाईत तो दावीदाबरोबर होता. तो जवाच्या शेतात असताना इस्राएली सैन्याने पलिष्ट्यांपुढून पळ काढला होता.   14 परंतु ते त्या शेताच्या मध्यभागी उभे राहिले, त्यांनी सामना केला आणि पलिष्ट्यांना मारून टाकले आणि याहवेहने त्या दिवशी मोठा विजय मिळवून दिला.   
 15 जेव्हा पलिष्ट्यांच्या टोळीने रेफाईमच्या खोर्यात छावणी दिली होती तेव्हा तीस मुख्य सेनापती योद्ध्यांपैकी तिघे जण दावीदाकडे अदुल्लाम गुहेतील खडकाकडे आले.   16 त्यावेळी दावीद गडावर होता आणि पलिष्टी सेना बेथलेहेम नगरात होती.   17 दावीदाला पाणी पिण्याची उत्कट इच्छा झाली व तो म्हणाला, “बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे झाले असते!”   18 तेव्हा या तीन पराक्रमी योद्ध्यांनी पलिष्ट्यांच्या छावणीमधून घुसून, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीचे पाणी काढून दावीदाकडे आणले. परंतु दावीदाने ते पिण्याचे नाकारले; आणि ते याहवेहसमोर ओतले.   19 त्याने म्हटले, “परमेश्वर न करो मला ते करावे लागेल. ज्या पुरुषांनी ते आपला जीव धोक्यात घालून आणले त्यांचे रक्त मी प्यावे काय?” कारण ते आणण्यासाठी त्यांनी त्यांचा जीव धोक्यात घातला होता. त्यामुळे दावीद ते पाणी प्याला नाही.  
अशी साहसी कामे त्या तीन पराक्रमी योद्ध्यांनी केली होती.   
 20 योआबाचा भाऊ अबीशाई हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे लोकांविरुद्ध उगारून त्यांचा वध केला होता, म्हणून तो या तिघांप्रमाणेच प्रसिद्ध झाला होता.   21 या तिघांपेक्षा त्याला दुप्पट सन्मान दिला गेला आणि तो त्या तिघांचाही सेनापती झाला, जरी त्या तिघांमध्ये त्याची गणती केली नाही.   
 22 कबसेल येथील यहोयादाचा पुत्र बेनाइयाह एक शूर मनुष्य होता. त्याने मोआबाच्या सर्वात पराक्रमी योद्ध्यांना ठार मारले होते. त्याचप्रमाणे हिमवर्षावाच्या दिवसात खाली गुहेत जाऊन एका सिंहाला ठार मारले.   23 एकदा त्याने पाच हात†अंदाजे 2.3 मीटर उंचीच्या इजिप्ती मनुष्याला जिवे मारले होते. त्या इजिप्ती माणसाच्या हातात भाला होता, तरी बेनाइयाह केवळ आपली विणकर्याची काठी हातात घेऊन त्याच्याशी लढण्यास गेला. त्याने त्याचा भाला हिसकावून घेतला व त्याच्याच भाल्याने त्याला ठार मारले.   24 यहोयादाचा पुत्र बेनाइयाहची ही साहसी कामे होती; त्या तीन पराक्रमी योद्ध्यांप्रमाणे त्याने देखील किर्ती मिळविली होती.   25 इतर तीस जणांपेक्षा त्याला मोठा सन्मान दिला गेला, परंतु तिघांमध्ये त्याची गणती झाली नाही. आणि दावीदाने त्याला आपल्या अंगरक्षकांचा अधिकारी म्हणून नेमले.   
 26 दावीदाचे पराक्रमी योद्धे हे होते:  
योआबाचा भाऊ असाहेल,  
बेथलेहेमकर दोदोचा पुत्र एलहानान,   
 27 हरोरचा शम्मोथ,  
पलोनी हेलेस,   
 28 तकोवा येथील इक्केशाचा पुत्र ईरा,  
अनाथोथचा अबिएजेर,   
 29 हुशाथचा सिब्बखय,  
अहोहचा ईलाय,   
 30 नटोफाथी माहाराई,  
नटोफाथी बाअनाहचा पुत्र हेलेद,   
 31 गिबियाहतील बिन्यामीन गोत्रातील रीबाईचा पुत्र इत्तय,  
पिराथोनचा बेनाइयाह,   
 32 गाशाच्या ओढ्याजवळचा हूरय,  
अर्बाथचा अबीएल,   
 33 बहरूमचा अजमावेथ,  
शालबोनचा एलीहबा,   
 34 गिजोन येथील हाशेमचे पुत्र,  
हरार येथील शागे याचा पुत्र योनाथान,   
 35 हरार येथील साखार याचा पुत्र अहीयाम,  
ऊरचा पुत्र एलिफाल,   
 36 मकेराथी हेफेर,  
पलोनी अहीयाह,   
 37 कर्मेलचा हेस्रो,  
एजबयाचा पुत्र नाराय,   
 38 नाथानाचा भाऊ योएल,  
हागरीचा पुत्र मिभार,   
 39 अम्मोनी सेलेक,  
जेरुइयाहचा पुत्र योआब याचा शस्त्रवाहक बैरोथचा नाहाराई,   
 40 इथ्री येथील ईरा,  
इथ्री येथील गारेब,   
 41 उरीयाह हिथी,  
अहलायाचा पुत्र जाबाद,   
 42 शीझाचा पुत्र अदीना, तो रऊबेनच्या गोत्रातील एकतीस पुढार्यांपैकी एक होता.   
 43 माकाहचा पुत्र हानान,  
मिथनी योशाफाट,   
 44 अष्टराथी उज्जिया,  
अरोएर येथील होथामाचे पुत्र शामा व ईयेल,   
 45 शिम्रीचा पुत्र यदिएल,  
व तीसा येथील त्याचा भाऊ योहा,   
 46 महवी येथील एलीएल,  
व एलानामाचे पुत्र यरीबय व योशव्याह,  
मोआबी इथ्माह,   
 47 मसोबी एलीएल, ओबेद आणि यासीएल.