3
मंडळीतील पुढारी
1 प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आत्म्याद्वारे जीवन जगत असलेल्या लोकांबरोबर बोलावे तसे मी तुमच्याबरोबर बोलू शकलो नाही, कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये लहान बालक असून अजूनही दैहिक आहात. 2 मी तुम्हाला दूध दिले, जड अन्न दिले नाही, कारण तुम्ही त्यासाठी तयार नव्हता आणि निश्चित त्यासाठी तुम्ही अजूनही तयार नाही. 3 तुम्ही अजूनही दैहिक आहात. तुम्हामध्ये भांडणे आणि मत्सर आहेत, तुम्ही दैहिक आहात की नाही? तुम्ही केवळ सामान्य मानवासारखे वागता की नाही? 4 तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे” आणि दुसरा “मी अपुल्लोसाचा अनुयायी आहे,” यावरून तुम्ही सामान्य मनुष्य आहात नाही काय?
5 तर मग काय, अपुल्लोस तरी कोण आहे? मी पौल कोण आहे? आम्ही तर केवळ परमेश्वराचे सेवक, त्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला—प्रभूने प्रत्येकाला कामगिरी सोपवून दिली होती. 6 मी बी पेरले, अपुल्लोसाने पाणी घातले, परंतु परमेश्वराने वाढविले. 7 पेरणारा किंवा पाणी घालणारा कोणी काही नाही, तर फक्त परमेश्वरच जे त्याची वाढ करतात. 8 जो पेरतो व जो पाणी घालतो त्यांचा हेतू एकच आहे आणि त्या दोघांनाही त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ मिळेल. 9 आम्ही परमेश्वराच्या सेवेतील सहकारी आहोत. तुम्ही परमेश्वराचे शेत आहात, परमेश्वराची इमारत आहात.
10 परमेश्वराने जी कृपा मला दिली आहे, त्यानुसार मी कुशल बांधकाम करणार्यासारखा पाया घातला आणि आणखी कोणी त्यावर बांधकाम करीत आहे. परंतु प्रत्येकाने बांधकाम काळजीपूर्वक केले पाहिजे. 11 जो पाया आधी घातलेला आहे, जे स्वतः येशू ख्रिस्त आहे, त्या व्यतिरिक्त दुसरा पाया कोणालाही घालता येणार नाही. 12 जर या पायांवर कोणी सोने, चांदी, रत्ने व माणके आणि कोणी केवळ लाकूड, गवत व पेंढ्या वापरून बांधकाम करेल. 13 तर त्या प्रत्येकाचे काम जसे आहे तसे दिसेल, कारण तो दिवस ते प्रकाशात आणेल. अग्नीद्वारे ते प्रकट होईल, प्रत्येकाचे काम कसे आहे हे अग्नीने पारखले जाईल. 14 बांधलेले टिकून राहिले, तर बांधकाम करणार्याला त्याचे प्रतिफळ मिळेल. 15 परंतु जर ते जळून गेले, तर बांधकाम करणार्याला हानी सोसावी लागेल; परंतु तो स्वतः वाचेल, परंतु जणू काय अग्नी ज्वालांमधून बाहेर ओढून काढल्यासारखाच वाचेल.
16 तुम्ही स्वतः परमेश्वराचे मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो हे तुम्हाला माहीत नाही का? 17 जर कोणी परमेश्वराच्या मंदिराचा नाश करतो, तर परमेश्वरसुद्धा त्या व्यक्तीचा नाश करतील. कारण परमेश्वराचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही मिळून ते मंदिर आहात.
18 तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. जर तुमच्यापैकी कोणी या युगाच्या रीतीप्रमाणे स्वतःला ज्ञानी समजत असेल, तर ज्ञानी होण्यासाठी त्याला “मूर्ख” व्हावे लागेल, 19 कारण या जगाचे ज्ञान परमेश्वराच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. असे लिहिले आहे: “ते ज्ञानी लोकांना त्यांच्याच धूर्तपणात पकडतात,”*इय्योब 5:13 20 आणि पुन्हा, “ज्ञानी लोकांचे विचार निरर्थक असतात हे प्रभू जाणतात.”†स्तोत्र 94:11 21 तेव्हा मानवी नेत्यांची बढाई मारू नका! कारण सर्वकाही तुमचे आहे. 22 मग तो पौल, अपुल्लोस किंवा केफा‡म्हणजे पेत्र किंवा जग, जीवन आणि मरण किंवा सांप्रत काळ किंवा भविष्यकाळ हे सर्व तुमचे आहेत. 23 पण तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त परमेश्वराचे आहेत.