5
अनीतिमान बंधूला बहिष्कृत करा
1 मला असा अहवाल मिळाला आहे की तुमच्यामध्ये लैंगिक अनैतिकता आहे, की जी गैरयहूदीही खपवून घेणार नाहीत; कोणाएका मनुष्याने आपल्या वडिलांच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले आहेत. 2 आणि तुम्ही अभिमान बाळगता! याउलट दुःखाने ज्या मनुष्याने असे केले, त्याला सहभागितेतून घालवून द्यावयाचे नव्हते का? 3 मी शरीराने अनुपस्थित असलो तरी आत्म्याने उपस्थित आहे आणि उपस्थित असल्यासारखा मी प्रभू येशूंच्या नावाने जो हे कृत्य करीत आहे त्याचा न्याय करून चुकलो आहे. 4 आपल्या प्रभू येशूंच्या शक्तीने युक्त असा माझा आत्मा व तुम्ही एकत्र मिळून 5 या मनुष्याला देहस्वभावाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे, यासाठी की त्याचा आत्मा प्रभूच्या दिवशी तारला जावा.
6 तुम्ही गर्व करणे उचित नाही. थोडे खमीर सर्व पिठाच्या गोळ्याला फुगविते, हे तुम्हाला माहीत नाही का? 7 या जुन्या खमिराला काढून टाका, म्हणजे तुम्ही एक नवीन अखमीर गोळा तयार व्हाल, जे वास्तविक तुम्हीच आहात. कारण ख्रिस्त आपल्यासाठी वल्हांडणाचा कोकरा म्हणून अर्पिले गेले. 8 आपण सण साजरा करू या, जुन्या भाकरीच्या खमिराने, द्वेष आणि दुष्टपणाने नव्हे तर त्याऐवजी प्रामाणिकपणाने व सत्याने अखमीर भाकरीने साजरा करू या.
9 तुम्हाला लिहिलेल्या पत्रात तुम्ही जारकर्मी लोकांमध्ये मिसळू नये असे मी म्हटले होते. 10 जे अनीतिमान, लोभिष्ट, फसविणारे आणि मूर्तिपूजक अशा या जगाच्या लोकांविषयी मी बोलत नव्हतो, अन्यथा तुम्हाला हे जग सोडून जावे लागेल. 11 मी तुम्हाला लिहित आहे की आपण बंधू किंवा भगिनी आहोत असा दावा करीत असतानाही जे जारकर्म किंवा लोभी, निंदक, मूर्तिपूजक, मद्य प्राशन करणारे आहेत अशांमध्ये मिसळू नका. अशा लोकांबरोबर भोजनास देखील बसू नका.
12 मंडळीच्या बाहेर जे आहेत त्यांचा न्याय मी का करावा? परंतु जे आत आहेत त्यांचा न्याय करू नये का? 13 बाहेरच्या लोकांचा न्याय करणारे परमेश्वर आहेत. “या दुष्ट मनुष्याला तुमच्यामधून काढून टाका.”*अनु 13:5; 17:7; 19:19; 21:21; 22:21, 24; 24:7