7
विवाहासंबंधी प्रश्न
आता ज्या गोष्टींविषयी तुम्ही मला लिहिले होते: “मनुष्याने स्त्रीशी लैंगिक संबंध न ठेवलेले बरे.” तरी जारकर्म वाढले आहे म्हणून प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीशी संबंध ठेवावे आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पतीशी. विवाहित स्त्री म्हणून असलेले सर्व हक्क पुरुषाने आपल्या पत्नीला द्यावेत, आणि पत्नीनेही आपल्या पतीसाठी तसेच करावे. पत्नीच्या शरीरावर तिचा स्वतःचा अधिकार नाही तर, पतीचा असतो. त्याचप्रमाणे पतीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो तर तो त्याच्या पत्नीला असतो. एकमेकांची वंचना करू नका, पण प्रार्थनेला वेळ मिळावा म्हणून एकमेकांच्या संमतीने काही काळ अलिप्त राहा. पण तुम्ही पुन्हा एकत्र यावे म्हणजे आत्मसंयमनाच्या अभावी सैतान तुम्हाला मोहात पाडणार नाही. मी हे आज्ञारूपाने म्हणत नाही परंतु अनुमती म्हणून सांगतो. माझी इच्छा अशी आहे की, जसा मी आहे तसे तुम्ही सर्वांनी असावे. परंतु प्रत्येकाला परमेश्वराकडून देणगी मिळालेली आहे; एकास एक देणगी तर दुसर्‍यास दुसरी देणगी.
म्हणून जे अविवाहित आहेत आणि ज्या विधवा आहेत, त्यांना मी सांगतो तुम्हीही जसा मी आहे तसे राहावे. पण तुम्हाला संयम राखता येत नसेल, तर विवाह केलेला बरा. वासनेने जळण्यापेक्षा विवाह करणे उत्तम.
10 आता जे विवाहित आहेत, त्यांच्यासाठी मी एक आज्ञा देतो (मी नाही, पण प्रभू देतात) पत्नीने पतीपासून विभक्त होऊ नये. 11 पण पत्नी विभक्त झाली असेल, तर तिने दुसरा विवाह करू नये किंवा आपल्या पतीशी समेट करावा. पतीनेही आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ नये.
12 इतरांना मी हे सांगतो (प्रभू नव्हे, पण मी): एखाद्या भावाची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल आणि ती त्याच्या जवळच राहण्यास तयार असेल, तर त्याने तिला घटस्फोट देऊ नये. 13 त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीचा पती अविश्वासी असेल आणि तिच्याबरोबर राहण्यास तयार असेल, तर तिनेही त्याला घटस्फोट देऊ नये. 14 कारण अविश्वासी पती, विश्वासणाऱ्या पत्नीद्वारे पवित्र होऊ शकेल आणि अविश्वासी पत्नी, विश्वासणाऱ्या पतीद्वारे पवित्र होऊ शकेल. नाही तर तुमची लेकरे अशुद्ध असती, परंतु ती आता पवित्र आहेत.
15 परंतु जर अविश्वासी व्यक्ती वेगळी होऊ इच्छित असेल तर तसे होऊ द्या. अशा परिस्थितीत भाऊ किंवा बहीण बांधलेले नाही; कारण परमेश्वराने आपल्याला पाचारण केले आहे ते यासाठी की आपण शांतीने राहावे. 16 अहो पत्नींनो, तुमच्या पतींचे तारण तुमच्याद्वारे होईल किंवा नाही हे कसे समजावे? किंवा पतींनो तुमच्या पत्नीचे तारण तुमच्याद्वारे होईल किंवा नाही हे कसे समजावे?
बदलती स्थिती
17 प्रत्येकाने विश्वासू व्यक्तीसारखे प्रभूने तुम्हाला ज्या स्थितीत ठेवले आहे व परमेश्वराने जसे पाचारण केले आहे तसे राहावे. सर्व मंडळ्यांसाठी माझा हाच नियम आहे. 18 सुंता झालेल्या एखाद्या व्यक्तीस पाचारण झाले आहे काय? तर तुम्ही असुंती होऊ नये. तसेच सुंता न होण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीस पाचारण झाले आहे का? तर त्याने सुंता करून घेऊ नये. 19 सुंतेचे काही महत्त्व नाही व असुंतेचेही नाही. परंतु परमेश्वराच्या आज्ञा पाळणे हेच महत्त्वाचे आहे. 20 एखाद्या व्यक्तीला परमेश्वराने पाचारण केले, त्यावेळी ज्या स्थितीत ते होते तसेच त्यांनी राहवे.
21 तुम्ही गुलाम असताना पाचारण झाले काय? त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. पण तुम्हाला स्वतंत्र होणे शक्य असेल तर अवश्य व्हा. 22 जर कोणी गुलाम असताना, प्रभूने तुम्हाला विश्वासात पाचारण केले, तर तुम्ही प्रभूमध्ये स्वतंत्र केलेली व्यक्ती आहात. त्याचप्रमाणे, जो स्वतंत्र असून पाचारलेला आहे तो ख्रिस्ताचा गुलाम आहे. 23 तुम्हाला किंमत भरून विकत घेण्यात आले आहे; म्हणून तुम्ही माणसांचे गुलाम होऊ नका. 24 माझ्या बंधूंनो व भगिनींनो, प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने पाचारण केले होते तेव्हा ज्या स्थितीत ते होते त्याच स्थितीत त्यांनी परमेश्वराला जोडलेले असावे.
अविवाहितांविषयी
25 आता कुमारिकांबद्दल: मला प्रभूकडून आज्ञा मिळालेली नाही, तरीपण प्रभूच्या कृपेनुसार मी जो विश्वसनीय आहे तो मी माझा न्याय देतो. 26 वर्तमान काळातील संकटामुळे, पुरुषांनी ज्या स्थितीत आहेत, त्या स्थितीत राहावे हे त्यांच्यासाठी योग्य होईल असे मला वाटते. 27 तुमचा विवाह झाला आहे का? तर मुक्त होण्यास पाहू नका. तुम्ही अविवाहित आहात का? तर पत्नी शोधण्याच्या मागे लागू नका. 28 परंतु जर तुम्ही विवाह केला, तरी तुम्ही काही पाप केले नाही आणि एखाद्या कुमारिकेने विवाह केला, तर तिनेही पाप केले नाही. जे विवाह करतात, त्यांना जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल; आणि तुमची त्यापासून सुटका व्हावी अशी माझी इच्छा आहे.
29 बंधू व भगिनींनो, वेळ थोडा आहे. यापुढे ज्यांना पत्नी आहे त्यांनी आपल्याला पत्नी नाही अशाप्रकारे राहावे. 30 जे विलाप करतात त्यांनी जणू काही तो केला नाही असे समजावे; जे आनंदित आहेत ते जणू काही आनंदी नाहीत असे समजावे; जे विकत घेतात, त्यांनी स्वतःचे काही नसल्यासारखे समजावे. 31 जे ऐहिक गोष्टींचा उपभोग घेतात, त्यांनी त्यातच गर्क होऊन जाऊ नये, कारण सध्याचे जग लयाला जात आहे.
32 तुम्ही चिंता विरहित असावे, अशी माझी इच्छा आहे. एखादा अविवाहित पुरुष प्रभूचे कार्य—प्रभूला कसे संतोषविता येईल, यासंबंधी काळजी करतो. 33 तरी विवाहित पुरुष जगातील गोष्टींचा आणि आपल्या पत्नीला आनंदी कसे ठेवता येईल, याचा विचार करतो. 34 त्याच्या आवडीनिवडी विभागल्या जातात. अविवाहित स्त्री वा कुमारिकेचे प्रभूला शरीराने व आत्म्याने संतुष्ट करण्याचे ध्येय असते, परंतु विवाहित स्त्री जगाच्या गोष्टींविषयी व आपल्या पतीला कसे संतोषवावे याकडे लक्ष देते. 35 हे मी तुमच्या भल्यासाठी सांगत आहे, तुम्हावर निर्बंध घालण्यासाठी नव्हे, यासाठी की तुम्ही योग्यप्रकारे जीवन जगावे आणि तुमचे मन विचलित न होता प्रभूला पूर्णपणे समर्पित व्हावे.
36 जर मागणी झालेल्या कुमारिकेशी एखादा मनुष्य आदरपूर्वक वागत नाही असे त्याला वाटले, आणि त्याच्या भावना अतितीव्र आहेत*किंवा जर ती लग्नासाठी सामान्य वयाच्या पुढे जात असेल तर त्याने जे योग्य आहे ते करावे. त्यांनी लग्न करावे, केल्यास तो पाप करत नाही. 37 परंतु एखाद्या माणसाचे मन स्थिर आहे व जो दडपणाखाली नाही व ज्याचा आपल्या शरीरावर ताबा आहे, त्याने कुमारिकेशी विवाह न करण्याचे ठरविले असेल, तर तो मनुष्य योग्य करतो. 38 म्हणून मग जो पुरुष कुमारिकेशी विवाह करतो, तो चांगले करतो. परंतु जो विवाह करीत नाही तो अधिक चांगले करतो.
39 पती जिवंत असेल तोपर्यंत पत्नी आपल्या पतीला बांधलेली आहे. पती मरण पावला, तर ती पाहिजे त्याच्याशी लग्न करण्यास मोकळी आहे, पण तो प्रभूमध्ये विश्वासू असावा. 40 पण माझ्या मते ती जशी आहे तशी राहिली तर ती अधिक सुखी होईल—आणि मला असे वाटते की माझ्यातही परमेश्वराचा आत्मा वास करतो.

*7:36 किंवा जर ती लग्नासाठी सामान्य वयाच्या पुढे जात असेल