13
जर मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणार्‍या झांजेसारखा आहे. मला परमेश्वराचे संकल्पनिवेदन करण्याचे दान असले, सर्वप्रकारच्या रहस्यांचे गहन अर्थ आकलन होत असले आणि सर्व ज्ञान असले आणि जरी डोंगर हालविण्याइतका मजजवळ विश्वास असला, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही. माझ्याजवळ जी संपत्ती आहे ती सर्व मी गरिबांना दिली आणि माझे शरीर कष्ट सहन करण्यासाठी अर्पण केले, परंतु माझ्याठायी प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.
प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे. ती कधीही हेवा किंवा मत्सर करीत नाही, कधीही अभिमान बाळगत नाही, गर्व करीत नाही. ती कधीही इतरांचा अपमान करीत नाही, स्वार्थ पाहत नाही किंवा सहज चिडत नाही. ती अयोग्य गोष्टींची कधीही नोंद ठेवीत नाही. प्रीती वाईट गोष्टींमध्ये आनंद मानत नाही परंतु सत्यामध्ये आनंद मानते. प्रीती नेहमी संरक्षण करते, सर्वदा विश्वास ठेवते, सर्वदा आशा धरते आणि सर्वदा धीर धरते.
भविष्यनिवेदन करण्याचे दान समाप्त होईल, वेगवेगळी भाषा बोलण्याचे दान स्तब्ध होईल आणि बुद्धीचे ज्ञान नाहीसे होईल; परंतु प्रीती अखंडपणे टिकून राहील. कारण आपल्याला थोडेच कळते, आपल्याला संकल्पाचेही ज्ञान थोडे आहे. 10 परंतु पूर्णत्वाचे आगमन झाल्यावर, जे अपूर्ण आहे ते नाहीसे होईल. 11 मी बालक होतो, तेव्हा माझे बोलणे, विचार करणे, विवाद करणे बालकासारखे होते. परंतु जेव्हा मी प्रौढ झालो, तेव्हा लेकरांसारखे वागणे मी सोडून दिले आहे. 12 कारण आपण आता केवळ आरशात प्रतिबिंब पाहत आहोत; नंतर आपण समोरासमोर पाहणार आहोत. मला आता केवळ अंशतः कळते; नंतर मला सर्वकाही स्पष्ट असे दिसेल, जशी माझी संपूर्ण ओळख झाली आहे.
13 विश्वास, आशा, प्रीती या तीन गोष्टी टिकून राहतात; परंतु त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे.