9
शलोमोनला याहवेहचे दर्शन
शलोमोनने जेव्हा याहवेहचे मंदिर व राजमहाल बांधण्याचे काम संपविले, आणि त्याला जे काही करावयाचे मनोरथ होते ते साधल्यानंतर, याहवेहने शलोमोनला जसे गिबोन येथे दर्शन दिले होते, तसे त्याला दुसर्‍यांदा दर्शन दिले. याहवेह शलोमोनला म्हणाले:
“तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनंती मी ऐकली आहे; हे जे मंदिर तू बांधले आहे तिथे सर्वकाळासाठी माझे नाव देऊन मी ते पवित्र केले आहे. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील.
“तुझ्या बाबतीत म्हणायचे तर तू आपला पिता दावीद याच्याप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे हृदयाच्या सरळतेने चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील, तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीद याला मी अभिवचन देत म्हटले होते, ‘इस्राएलच्या राजासनावर तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’
“पण जर तू किंवा तुझी संतती माझ्यापासून दूर वळली आणि मी तुला दिलेल्या आज्ञा व विधी पाळले नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली, तर जो देश मी त्यांना दिला आहे त्यातून मी इस्राएली लोकांना छेदून टाकीन आणि हे मंदिर जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. मग इस्राएल सर्व लोकांमध्ये थट्टा व निंदेचा विषय होतील. हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन तुच्छतेने म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’ तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह त्यांचे परमेश्वर, ज्यांनी या लोकांच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून याहवेहने त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ”
शलोमोनचे इतर कार्य
10 शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले. 11 शलोमोन राजाने सोरचा राजा हीराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली, कारण त्याने हवे असलेले सर्व गंधसरू, देवदारू, आणि सोने शलोमोनला पुरविले होते. 12 परंतु जेव्हा शलोमोनने त्याला दिलेली नगरे पाहण्यासाठी हीराम सोरवरून गेला, ते पाहून त्याला समाधान झाले नाही. 13 तेव्हा तो म्हणाला, “माझ्या भावा, ही कशी नगरे तू मला दिलीस?” आणि त्याने त्यास काबूल*काबूल अर्थात् निकामी प्रांत असे नाव दिले, ते नाव आजही प्रचलित आहे. 14 हीरामाने राजाकडे एकशेवीस तालांतसुमारे 4 मेट्रिक टन सोने पाठवले होते.
15 शलोमोन राजाने ज्या मजुरांना याहवेहचे मंदिर, आपला स्वतःचा राजवाडा, स्तरीय बांधकामकिंवा इब्री भाषेत मिल्लो ज्याचा अर्थ स्पष्ट नाही, यरुशलेमचा तट आणि हासोर, मगिद्दो व गेजेर नगर बांधण्यासाठी कामावर लावले होते त्यांचा अहवाल अशाप्रकारे आहे. 16 (इजिप्तचा राजा फारोहने गेजेरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले होते. त्याने त्याला आग लावली व त्यातील कनानी रहिवाशांना मारून टाकले व ते नगर आपली कन्या, शलोमोनच्या पत्नीला तिच्या लग्नाची भेट म्हणून दिले. 17 आणि शलोमोनने गेजेर नगराची पुनर्बांधणी केली.) त्याने खालचे बेथ-होरोन बांधले, 18 वाळवंटातील देशाच्या हद्दीतील बालाथ आणि तदमोर§किंवा इब्री भाषेत तामार बांधली, 19 त्याचप्रमाणे शलोमोनचे रथ व त्याचे घोडे*किंवा रथस्वार यांच्यासाठी सर्व शहरे व नगरे; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व प्रदेशात त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले.
20 अमोरी, हिथी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते (हे लोक इस्राएली नव्हते). 21 या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांनाही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केले; हे ते लोक होते ज्यांना इस्राएली लोक पूर्णपणे नष्ट करू शकले नव्हते, आजवर हे तसेच आहेत. 22 परंतु इस्राएली लोकांपैकी कोणावरही शलोमोनने गुलामी लादली नाही; ते त्याचे योद्धे, त्याचे सरकारी अधिकारी, सरदार, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते. 23 शलोमोनच्या प्रकल्पांवर जे मुख्य अधिकारीसुद्धा होते, ते पाचशे पन्नास जण होते, जे माणसांवर देखरेख ठेवणारे मुकादम होते.
24 फारोहची कन्या दावीदाचे शहर सोडून शलोमोनने तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आली, मग त्याने स्तरीय बांधकाम केले.
25 याहवेहसाठी बांधलेल्या वेदीवर शलोमोन वर्षातून तीन वेळा होमार्पणे, शांत्यर्पणे करून त्याबरोबर धूप जाळत असे, अशाप्रकारे त्याने मंदिराची कर्तव्ये पूर्ण केली.
26 शलोमोन राजाने एदोम देशात तांबड्या समुद्रतीरी एलोथजवळ एजिओन-गेबेर येथे सुद्धा गलबते बांधली. 27 आणि हीरामाने त्याच्या अनुभवी खलाश्यांना शलोमोनच्या माणसांबरोबर सेवा करण्यास पाठवले. 28 त्यांनी ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे वीस तालांतअंदाजे 14 मेट्रिक टन सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले.

*9:13 काबूल अर्थात् निकामी

9:14 सुमारे 4 मेट्रिक टन

9:15 किंवा इब्री भाषेत मिल्लो ज्याचा अर्थ स्पष्ट नाही

§9:18 किंवा इब्री भाषेत तामार

*9:19 किंवा रथस्वार

9:28 अंदाजे 14 मेट्रिक टन