11
शलोमोनच्या स्त्रिया
1 शलोमोन राजा, फारोहच्या कन्येशिवाय मोआबी, अम्मोनी, एदोमी, सीदोनी व हिथी या परदेशीय स्त्रियांवर देखील प्रेम करत होता. 2 हे ते राष्ट्र होते ज्याविषयी याहवेहने इस्राएल लोकांना सांगितले होते, “तुम्ही त्यांच्याशी विवाह करू नये, कारण ते खचितच तुमची मने त्यांच्या दैवतांकडे वळवतील.” तरीही, शलोमोन त्या स्त्रियांच्या प्रेमात फार जडला होता. 3 त्याला राजकीय घराण्यातील सातशे पत्नी आणि तीनशे उपपत्नी होत्या व त्याच्या पत्नींनी त्याला बहकविले. 4 तो उतार वयाचा होईपर्यंत, त्याच्या पत्नींनी त्याचे हृदय इतर दैवतांकडे वळविले आणि त्याचा पिता दावीदाप्रमाणे शलोमोनचे हृदय आता संपूर्णपणे याहवेह त्याच्या परमेश्वरास समर्पित नव्हते. 5 शलोमोन सीदोन लोकांची देवी अष्टारोथ आणि अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलेख याची उपासना करू लागला. 6 याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते शलोमोनने केले; त्याचा पिता दावीदाने केले त्याप्रमाणे शलोमोन याहवेहला पूर्णपणे अनुसरला नाही.
7 शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील डोंगरावर मोआबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलख यांच्यासाठी पूजास्थाने बांधली. 8 आपल्या परदेशीय स्त्रिया, ज्या धूप जाळून आपआपल्या दैवतांना यज्ञ अर्पण करीत होत्या, त्यांच्यासाठी सुद्धा त्याने तसेच केले.
9 शलोमोनचे हृदय याहवेह इस्राएलचे परमेश्वर, ज्यांनी त्याला दोनदा दर्शन दिले होते त्यांच्यापासून दूर वळले होते, म्हणून याहवेह शलोमोनवर रागावले. 10 जरी याहवेहने इतर देवांचे अनुसरण करण्यास मना केली होती, तरी शलोमोनने याहवेहची आज्ञा मानली नाही. 11 म्हणून याहवेहने शलोमोनला म्हटले, “तुझी ही वृत्ती आहे, आणि मी तुला लावून दिलेल्या माझ्या कराराचे व विधींचे पालन तू केले नाही, मी खचितच तुझे राज्य तुझ्यापासून हिसकावून घेईन व ते तुझ्या हाताखालच्या मनुष्याला देईन. 12 तथापि, तुझा पिता दावीद याच्याप्रीत्यर्थ, ते मी तुझ्या जीवनकाळात करणार नाही. ते मी तुझ्या पुत्राच्या हातून हिसकावून घेईन. 13 तरीही, संपूर्ण राज्यच मी त्याच्यापासून हिसकावून घेणार नाही, तर माझा सेवक दावीद व यरुशलेम ज्यांना मी निवडले, याच्याप्रीत्यर्थ एक गोत्र मी तुझ्या पुत्राच्या हाती देईन.”
शलोमोनचे शत्रू
14 नंतर याहवेहने एदोमी राजघराण्यातील एदोम हदाद याला शलोमोनचा शत्रू म्हणून उभे केले. 15 काही वर्षापूर्वी योआबाचा सेनापती एदोम, जो मृतांना पुरण्यास गेला होता, तेव्हा दावीदाने त्याच्याशी युद्ध केले होते आणि एदोमातील सर्व पुरुषांना मारून टाकले होते. 16 एदोमातील सर्व पुरुषांना मारेपर्यंत योआब व सर्व इस्राएली लोक सहा महिने तिथेच राहिले. 17 परंतु हदाद, जो अजूनही कोवळा मुलगा होता, काही एदोमी अधिकारी, ज्यांनी त्याच्या पित्याची सेवा केली होती, त्यांच्याबरोबर इजिप्तमध्ये पळून गेला. 18 ते मिद्यान येथून निघून पारानकडे आले. मग पारानातून त्यांच्याबरोबर लोकांना घेऊन पुढे इजिप्तला, इजिप्तचा राजा फारोह याच्याकडे गेले, राजाने हदादला घर व जमीन व अन्नपुरवठा केला.
19 फारोह हदादवर इतका प्रसन्न झाला की त्याने आपली पत्नी, तहपनीस राणीची बहीण त्याला पत्नी म्हणून दिली. 20 तहपनीसच्या बहिणीकडून त्याला गेनुबाथ नावाचा एक पुत्र झाला, ज्याचे संगोपन तहपनीसने राजवाड्यात केले. गेनुबाथ तिथे स्वतः फारोहच्या लेकरांबरोबर राहिला.
21 इजिप्तमध्ये असताना हदादने ऐकले की दावीद आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आहे आणि सैन्याचा अधिकारी योआब देखील मरण पावला होता. तेव्हा हदाद फारोहला म्हणाला, “मी आपल्या स्वदेशास जावे म्हणून मला जाऊ द्यावे.”
22 फारोहने त्याला विचारले, “येथे तुला काय कमी आहे की तू आपल्या देशाला जाऊ इच्छितोस?”
हदाद म्हणाला, “काही कमी नाही, पण मला जाऊ द्यावे!”
23 परमेश्वराने शलोमोनविरुद्ध आणखी एक शत्रू उभा केला, तो एलयादाचा पुत्र रेजोन होता, जो त्याचा मालक सोबाहचा राजा हादादेजर याच्यापासून पळून गेला होता. 24 जेव्हा दावीदाने जोबाहच्या सैन्याचा नाश केला, रेजोनने त्याच्यासोबत काही लोक जमा केले व तो त्यांचा पुढारी झाला; ते पुढे दिमिष्कास गेले, तिथे स्थायिक होऊन त्यांनी त्याचा ताबा घेतला. 25 शलोमोन जिवंत होता तोपर्यंत हदादने दिलेल्या त्रासात भर असे रेजोनने देखील इस्राएलशी वैर केले. तेव्हा रेजोनने अरामात राज्य केले व इस्राएलला विरोध केला.
यरोबोअम शलोमोनविरुद्ध बंड करतो
26 जेरेदाह येथील एक एफ्राईमकर, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने सुद्धा शलोमोन राजाविरुद्ध बंड केले. त्याची आई विधवा होती, तिचे नाव जेरुआह होते.
27 त्याने राजाविरुद्ध बंड कसे केले त्याचा वृत्तांत असा: शलोमोनने स्तरीय बांधकाम व त्याचा पिता दावीदाच्या शहराच्या भिंतीची खिंडारे दुरुस्त केली. 28 यरोबोअम एक शूरवीर होता. या तरुणाने आपले काम किती उत्तम प्रकारे केले आहे, हे शलोमोनने पाहिले, तेव्हा त्याने त्याला योसेफाच्या गोत्रातील सर्व मजूर कामगारांवर मुख्य असे नेमले.
29 त्याच दरम्यान यरोबोअम यरुशलेमातून बाहेर जात असताना, शिलोनी अहीयाह नावाचा संदेष्टा, नवीन झगा घातलेला असा त्याला वाटेत भेटला. ते त्या मैदानात दोघेच होते, 30 अहीयाहने घातलेला आपला नवीन झगा घेऊन तो फाडून त्याचे बारा तुकडे केले. 31 आणि तो यरोबोअमास म्हणाला, “तुझ्यासाठी दहा तुकडे उचलून घे, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘पाहा, मी शलोमोनच्या हातून राज्य हिसकावून घेईन व दहा गोत्र मी तुझ्या हाती देईन. 32 पण माझा सेवक दावीद आणि यरुशलेम शहर ज्याची मी इस्राएलच्या सर्व गोत्रांतून निवड केली त्याच्याप्रित्यर्थ, शलोमोनच्या हातात एक गोत्र राहील. 33 मी असे केले आहे कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मोआबाचे दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे दैवत मिलकाम यांची उपासना केली आणि ते माझ्या आज्ञेनुसार चालले नाहीत किंवा माझ्या दृष्टीने जे बरे ते केले नाही किंवा शलोमोनचा पिता दावीदाने केले तसे माझे विधी व नियम त्यांनी पाळले नाहीत.
34 “ ‘परंतु मी शलोमोनच्या हातून आताच संपूर्ण राज्य हिसकावून घेणार नाही; माझा सेवक दावीदाप्रीत्यर्थ मी त्याला त्याच्या जीवनभर अधिकारी असे नेमले आहे, कारण मी दावीदाला निवडले व त्याने माझ्या आज्ञा व विधींचे पालन केले. 35 परंतु मी शलोमोनच्या पुत्राच्या हातून राज्य काढून दहा गोत्र तुला देईन. 36 मी शलोमोनच्या पुत्राला एक गोत्र देईन, यासाठी की ज्या यरुशलेम नगरास मी माझ्या नावासाठी निवडले आहे त्यात माझा सेवक दावीद याचा दीप सदा माझ्यासमोर पेटलेला असेल. 37 आणि तुझ्याविषयी म्हटले तर, तुला मनास वाटेल त्यावर तू राज्य करशील; इस्राएलवर तू राज्य करशील. 38 मी तुला दिलेल्या आज्ञांनुसार जर तू करशील, माझा सेवक दावीदाने केले त्याप्रमाणे माझ्या आज्ञेत चालशील व माझे विधी व आज्ञा पाळून माझ्या दृष्टीत जे योग्य ते करशील, तर मी तुझ्याबरोबर राहीन. दावीदाचे जसे मी कायमचे राज्य स्थापले आहे, तसेच तुझी व तुझ्या राज्याची स्थापना मी करेन व इस्राएल तुझ्या हाती देईन. 39 असे करून मी दावीदाच्या वंशजांना नम्र बनवीन, पण सर्वकाळासाठी नव्हे.’ ”
40 शलोमोनने यरोबोअमला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण यरोबोअम इजिप्त देशाचा राजा शिशाककडे पळून गेला आणि शलोमोनचा मृत्यू होईपर्यंत तिथेच राहिला.
शलोमोनचा मृत्यू
41 शलोमोनच्या राज्यकाळातील इतर घटना; त्याची कृत्ये व त्याने दाखविलेले ज्ञान हे शलोमोनच्या पुस्तकात लिहिलेले नाहीत का? 42 शलोमोनने यरुशलेमात संपूर्ण इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले. 43 नंतर शलोमोन त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला व त्याला त्याचा पिता दावीदाच्या नगरात पुरले आणि रेहोबोअम राजा म्हणून त्याचा वारस झाला.