2
हन्नाहचे प्रार्थनागीत 
  1 तेव्हा हन्नाहने प्रार्थना केली आणि म्हणाली:  
“माझे हृदय याहवेहमध्ये आनंद करीत आहे;  
याहवेहमध्ये माझे शिंग*शिंग येथे याचा अर्थ सामर्थ्य उंच केलेले आहे.  
माझे मुख माझ्या शत्रूंपुढे बढाई मारते,  
कारण याहवेहने दिलेल्या उद्धारात मी आनंद करते.   
 2 “याहवेहसारखे कोणीही पवित्र नाही;  
तुमच्याशिवाय दुसरे कोणीही नाही;  
आमच्या परमेश्वरासारखा दुसरा कोणताही खडक नाही.   
 3 “फार गर्वाने बोलत राहू नका,  
किंवा तुमच्या मुखाला उद्धट बोलणे करू देऊ नका,  
कारण ते याहवेह परमेश्वर आहेत जे सर्वज्ञानी आहेत,  
आणि त्यांच्याद्वारे कृत्ये तोलली जातात.   
 4 “योद्ध्यांचे धनुष्य तुटलेले आहेत,  
परंतु जे अडखळले, ते शक्तीने सज्ज झाले आहेत.   
 5 ज्यांच्याकडे भरपूर होते ते आता अन्नासाठी मजुरी करीत आहेत,  
परंतु जे भुकेले होते ते आता भुकेले नाहीत.  
जी अपत्यहीन होती तिने सात लेकरांना जन्म दिला आहे,  
परंतु जिला अनेक मुले होती ती क्षीण झाली आहे.   
 6 “याहवेह मृत्यू आणतात आणि जिवंतही करतात;  
ते कबरेत घेऊन जातात आणि तिथून वरही काढतात.   
 7 गरिबी आणि संपत्ती याहवेह पाठवितात;  
ते नम्र करतात आणि उंचही तेच करतात.   
 8 ते दीनांस धुळीतून वर काढतात,  
आणि गरजवंतास राखेच्या ढिगार्यातून वर उचलून घेतात;  
ते त्यांना राजपुत्रांबरोबर बसवितात,  
आणि त्यांना वतन म्हणून सन्मानाचे आसन प्राप्त होते.  
“कारण पृथ्वीचा पाया याहवेहचा आहे;  
त्यावरच त्यांनी जग स्थापले आहे.   
 9 ते आपल्या प्रामाणिक सेवकांची पावले सांभाळतील,  
परंतु दुष्ट अंधकारमय ठिकाणी शांत केले जातील.  
“कोणीही बळाने विजय पावत नाही;   
 10 जे याहवेहचा विरोध करतात त्यांचा चुराडा होईल.  
सर्वश्रेष्ठ याहवेह स्वर्गातून गर्जना करतील;  
पृथ्वीच्या शेवटचा न्याय याहवेह करतील.  
“ते आपल्या राजाला सामर्थ्य देतील,  
आणि आपल्या अभिषिक्ताचे शिंग उंच करतील.”   
 11 नंतर एलकानाह रामाह येथे त्याच्या घरी गेला, परंतु तो मुलगा शमुवेल एली याजकाच्या हाताखाली याहवेहसमोर सेवा करू लागला.   
एलीचे दुष्ट पुत्र 
  12 एलीचे पुत्र अतिशय नीच होते; ते याहवेहचा आदर करीत नसत.   13 याजकांची अशी रीत होती की, ज्यावेळेस लोकांमधील कोणी यज्ञार्पण केले व जेव्हा ते मांस शिजविले जात असे, तेव्हा याजकांचा सेवक तीन टोके असलेला काटा घेऊन येत असे   14 आणि परातीत किंवा पातेल्यात किंवा कढईत किंवा गंगाळात तो काटा टाकून जितके मांस त्या काट्याने वरती येईल याजक ते आपल्या स्वतःसाठी घेत असे, शिलोह येथे आलेल्या सर्व इस्राएल लोकांशी ते असाच व्यवहार करीत असत.   15 परंतु चरबी जळण्याच्या आधी, याजकाचा सेवक येऊन यज्ञ करीत असलेल्या व्यक्तीला म्हणत असे, “भाजून घेण्यासाठी याजकाला थोडे मांस दे; तो तुझ्याकडून शिजविलेले मांस स्वीकारणार नाही, तर कच्चेच मांस घेईल.”   
 16 जर तो व्यक्ती त्याला म्हणाला, “प्रथम चरबी जळू दे, त्यानंतर तुला हवे ते तू घे,” तो सेवक उत्तर देत असे, “नाही, ते आताच दे; जर तू दिले नाही, तर मी ते सक्तीने घेईन.”   
 17 या तरुणांचे हे पाप याहवेहच्या दृष्टीने फार मोठे होते, कारण लोकांना याहवेहच्या अर्पणाचा तिरस्कार येऊ लागला होता.   
 18 परंतु शमुवेल बालक तागाचे एफोद घालून याहवेहसमोर सेवा करीत होता.   19 प्रत्येक वर्षी जेव्हा त्याची आई तिच्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करण्यासाठी जात, तेव्हा त्याच्यासाठी एक लहान झगा बनवून ती त्याला देत असे.   20 एलकानाह आणि त्याची पत्नी यांना एली आशीर्वाद देताना म्हणे, “या स्त्रीने ज्याच्यासाठी प्रार्थना केली आणि याहवेहला दिले त्याच्या बदल्यात या स्त्रीपासून याहवेह तुला लेकरे देवो.” त्यानंतर ते त्यांच्या घरी जात असत.   21 आणि हन्नाहवर याहवेहची कृपा होती†हन्नाहवर याहवेहची कृपा होती मूळ भाषेत परमेश्वराने हन्नाहला भेट दिली; तिने तीन मुलांना आणि दोन मुलींना जन्म दिला. याकाळात शमुवेल बाळ याहवेहच्या उपस्थितीत वाढत गेला.   
 22 आता एली, जो फार वृद्ध झाला होता, त्याची मुले सर्व इस्राएली लोकांशी कसा व्यवहार करीत होते आणि ज्या स्त्रिया सभामंडपाच्या प्रवेशद्वारात सेवा करीत होत्या त्यांच्याबरोबर त्यांनी जे कुकर्म केले त्या सर्वांविषयी त्याने ऐकले.   23 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही अशी कर्मे का करता? तुमच्या दुष्ट कृत्यांबद्दल सर्व लोकांकडून मी ऐकत आहे.   24 नाही, माझ्या मुलांनो; याहवेहच्या लोकांमध्ये पसरत असलेला अहवाल जो मी ऐकत आहे तो चांगला नाही.   25 जर एक व्यक्ती दुसर्याविरुद्ध पाप करते, तर परमेश्वर‡किंवा न्यायाधीश त्या अपराध्यासाठी मध्यस्थी करतील; परंतु जर कोणी याहवेहविरुद्ध पाप केले तर त्यांच्यासाठी कोण मध्यस्थी करेल?” तरीही त्याच्या मुलांनी त्यांच्या वडिलांच्या निषेधाकडे लक्ष दिले नाही, कारण त्यांना जिवे मारावे अशी याहवेहची इच्छा होती.   
 26 आणि शमुवेल बाळ याहवेहच्या आणि लोकांच्या कृपेत वाढत गेला.   
एलीच्या घराण्याविरुद्ध भविष्य 
  27 परमेश्वराचा एक मनुष्य एलीकडे आला आणि त्याला म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘तुझे पूर्वज इजिप्तमध्ये फारोहच्या दास्यात असताना मी त्यांना स्पष्टपणे प्रगट झालो नाही काय?   28 माझे याजक व्हावे, धूप जाळावे, माझ्या वेदीकडे जावे व माझ्या समक्षतेत एफोद घालावा म्हणून इस्राएलच्या सर्व गोत्रांतून मी तुझ्या पूर्वजांना निवडले. त्याचप्रमाणे इस्राएली लोकांनी दिलेले सर्व अन्नार्पण मी तुझ्या पूर्वजांच्या कुटुंबांला दिले.   29 माझे जे यज्ञ व अर्पणे मी माझ्या मंदिरासाठी नेमून दिली आहेत त्याचा तुम्ही अवमान का करता? माझ्या इस्राएली लोकांनी केलेल्या अर्पणातून सर्वोत्तम भाग खाऊन तू स्वतःला पुष्ट करून माझ्यापेक्षा तुझ्या पुत्रांचा जास्त सन्मान का करतो?’   
 30 “म्हणून याहवेह इस्राएलचे परमेश्वर, असे जाहीर करतात: ‘मी वचन दिले होते की, तुझ्या कुटुंबातील सदस्य सर्वकाळ माझ्यासमोर सेवा करतील.’ परंतु आता याहवेह असे जाहीर करतात: ‘ते माझ्यापासून दूर असो! जे माझा सन्मान करतात त्यांचा मी सन्मान करेन, परंतु जे माझा अवमान करतात त्यांचा अवमान होईल.’   31 अशी वेळ येत आहे की, मी तुझी आणि तुझ्या याजकीय घराण्याची शक्ती कमी करेन, म्हणजे त्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाही,   32 आणि माझ्या वस्तीत तू मोठे दुःख पाहशील. जरी इस्राएली लोकांचे भले केले जाईल तरी तुझ्या घराण्यातील कोणीही वृद्धापकाळापर्यंत जगणार नाहीत.   33 तुमच्यापैकी ज्यांना मी माझ्या वेदीवरील सेवा करण्यापासून दूर करणार नाही, त्यांच्यापैकी तुझी मात्र नजर मी क्षीण करेन व तुझ्या शक्तीचा नाश करेन आणि तुझे सर्व वंशज भर तारुण्यात मरतील.   
 34 “ ‘आणि तुझे दोन पुत्र, होफनी आणि फिनहास यांच्यावर जे येईल, ते तुला एक चिन्ह असे असतील—ते दोघेही एकाच दिवशी मरण पावतील.   35 मी माझ्यासाठी एक विश्वासू याजक पुढे आणेन, जो माझ्या अंतःकरणात आणि माझ्या मनात जे आहे त्यानुसार करेल. मी त्याचे याजकीय घराणे स्थिर स्थापित करेन आणि ते निरंतर माझ्या अभिषिक्तासमोर सेवा करतील.   36 नंतर तुझ्या घराण्यातील राहिलेला प्रत्येकजण येईल आणि चांदीच्या तुकड्यासाठी आणि भाकरीच्या तुकड्यासाठी त्याच्यासमोर वाकतील आणि विनंती करतील, “मला खाण्यासाठी अन्न असावे म्हणून माझ्यासाठी काही याजकीय पद द्या.” ’ ”