12
शमुवेलचे निरोपाचे भाषण
शमुवेल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “तुम्ही मला जे काही सांगितले ते ऐकून मी तुमच्यावर राजा नेमून दिला आहे. आता तुमचा पुढारी म्हणून तुमच्याकडे राजा आहे. मी तर उतार वयाचा होऊन माझे केस पांढरे झाले आहेत, आणि माझी मुले येथे तुमच्याबरोबर आहेत. माझ्या तरुणपणाच्या दिवसापासून आजपर्यंत मी तुमचा पुढारी आहे. मी येथे तुमच्यापुढे उभा आहे. याहवेहच्या आणि त्याच्या अभिषिक्ताच्या उपस्थितीत माझ्याविरुद्ध साक्ष द्या. मी कोणाचा बैल घेतला आहे? मी कोणाचा गाढव घेतला आहे? मी कोणाला फसविले आहे? मी कोणावर अत्याचार केला आहे? न्याय विपरीत करण्यासाठी मी कोणाच्या हातून लाच घेतली आहे? यापैकी कोणतीही गोष्ट जर मी केली असेल तर त्याची मी भरपाई करेन.”
त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही आम्हाला कधीही फसविले नाही किंवा आमच्यावर अत्याचार केला नाही, कोणाच्याही हातून तुम्ही काहीही घेतलेले नाही.”
शमुवेल त्यांना म्हणाला, “याहवेह तुमच्याविरुद्ध साक्षी आहेत आणि आज याहवेहचा अभिषिक्त सुद्धा साक्षी आहे की, माझ्यामध्ये तुम्हाला कोणताही दोष सापडला नाही.”
ते म्हणाले, “होय, याहवेह साक्षी आहेत.”
तेव्हा शमुवेल लोकांना म्हणाला, “ज्यांनी मोशे आणि अहरोन यांना नेमले, आणि तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर काढले ते याहवेहच होते. तर आता येथे उभे राहा, कारण याहवेहने तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्वजांसाठी केलेल्या सर्व नीतिमान कृत्यांविषयी मी तुम्हाला याहवेहसमोर बोध करतो.”
याकोबाने इजिप्तमध्ये प्रवेश केल्यानंतर साहाय्यासाठी ते याहवेहकडे रडले आणि याहवेहने मोशे आणि अहरोन यांना पाठविले, त्यांनी तुमच्या पूर्वजांना इजिप्तमधून बाहेर आणले आणि त्यांना या ठिकाणी वसविले.
“परंतु याहवेह त्यांच्या परमेश्वरांना ते विसरले; म्हणून याहवेहने त्यांना हासोरचा सेनापती सिसेराच्या हाती आणि पलिष्ट्यांच्या हाती आणि मोआबच्या राजाच्या हाती विकून टाकले आणि ते त्यांच्याशी लढले. 10 तेव्हा त्यांनी रडून याहवेहचा धावा करीत ते म्हणाले, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही याहवेहचा त्याग केला आहे आणि बआल व अष्टारोथ यांची सेवा केली आहे. परंतु आता आमच्या शत्रूंच्या हातातून आमची सुटका करा आणि आम्ही तुमची सेवा करू,’ 11 तेव्हा याहवेहनी यरूब्बआल*किंवा गिदोन, बाराककाही मूळ प्रतींमध्ये बेदान, इफ्ताह आणि शमुवेलकाही मूळ प्रतींमध्ये शमशोन यांना पाठविले आणि त्यांनी सभोवतालच्या तुमच्या शत्रूपासून तुमची सुटका केली, त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहिला.
12 “परंतु जेव्हा तुम्ही पाहिले की, अम्मोन्यांचा राजा नाहाश तुमच्यावर आक्रमण करत आहे, तेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुमचा राजा असतानाही, तुम्ही मला म्हणाला, ‘नाही, आमच्यावर राज्य करण्यासाठी आम्हाला राजा पाहिजे.’ 13 तर आता तुम्ही निवडून घेतलेला राजा येथे आहे, जो तुम्ही मागून घेतला आहे; पाहा, याहवेहने तुमच्यावर राजा नेमला आहे. 14 जर तुम्ही याहवेहचे भय धरून त्यांची सेवा कराल, त्यांचे आज्ञापालन कराल आणि त्यांच्या आदेशांविरुद्ध बंड करणार नाही आणि तुमच्यावर राज्य करतो तो तुमचा राजा व तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे अनुसरण कराल, तर बरे! 15 परंतु जर तुम्ही याहवेहचे ऐकणार नाही, आणि त्यांच्या आदेशांविरुद्ध बंड कराल, तर याहवेहचा हात जसा तुमच्या पूर्वजांच्या विरुद्ध होता, तसाच तुमच्याही विरोधात जाईल.
16 “तर आता, शांत उभे राहा आणि याहवेह तुमच्या नजरेसमोर जे महान कृत्य करणार आहेत ते पाहा! 17 हा गव्हाचा हंगाम नाही काय? मी आता याहवेहकडे मेघगर्जना आणि पाऊस पाठवावा म्हणून प्रार्थना करेन. आणि तुम्हाला समजून येईल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून याहवेहच्या दृष्टीने किती वाईट गोष्ट केली आहे.”
18 तेव्हा शमुवेलने याहवेहकडे प्रार्थना केली आणि त्याच दिवशी याहवेहने मेघगर्जना व पाऊस पाठवला. तेव्हा सर्व लोकांनी याहवेहचे आणि शमुवेलचे भय धरले.
19 सर्व लोक शमुवेलला म्हणाले, “याहवेह तुमचे परमेश्वर यांच्याकडे तुमच्या सेवकांसाठी प्रार्थना करा म्हणजे आम्ही मरणार नाही, कारण राजाची मागणी करून आम्ही आमच्या इतर सर्व पापांमध्ये भर घातली आहे.”
20 “भिऊ नका,” शमुवेलने उत्तर दिले. “तुम्ही हे सर्व वाईट केले आहे; तरी आता याहवेहपासून दूर वळू नका, परंतु तुमच्या सर्व हृदयाने याहवेहची सेवा करा. 21 निरुपयोगी मूर्तीच्या मागे लागू नका. ते तुमचे काहीही भले करू शकत नाहीत किंवा ते तुम्हाला वाचवूही शकत नाहीत, कारण त्या निरुपयोगी आहेत. 22 आपल्या महान नामाकरिता याहवेह आपल्या लोकांचा धिक्कार करणार नाहीत, कारण तुम्हाला स्वतःचे लोक बनविणे हे याहवेहला बरे वाटले. 23 माझ्याविषयी म्हणाल, तर मी तुम्हासाठी प्रार्थना करण्याचे सोडून देण्याने मी याहवेहविरुद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच असो. आणि मी तुम्हाला चांगला व खरा मार्ग शिकवेन. 24 परंतु याहवेहचे भय धरून प्रामाणिकपणे तुमच्या सर्व हृदयाने त्यांची सेवा करण्याविषयी खात्री बाळगा; त्यांनी तुम्हासाठी जी महान कृत्ये केली आहेत ती लक्षात ठेवा. 25 परंतु तुम्ही पाप करीत राहाल, तर तुम्ही आणि तुमचा राजा नाश पावाल.”

*12:11 किंवा गिदोन

12:11 काही मूळ प्रतींमध्ये बेदान

12:11 काही मूळ प्रतींमध्ये शमशोन