30
दावीद अमालेक्यांचा नाश करतो
तिसर्‍या दिवशी दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली. त्या दरम्यान अमालेक्यांनी नेगेव आणि सिकलाग या शहरांवर छापा टाकला होता. त्यांनी सिकलाग शहरावर हल्ला करून ते जाळून टाकले होते, आणि तेथील स्त्रिया व तिथे असलेल्या प्रत्येक तरुण आणि वृद्धाला त्यांनी कैद करून नेले होते. त्यांच्यातील कोणालाही त्यांनी मारून टाकले नाही, परंतु त्यांना आपल्याबरोबर नेले होते.
जेव्हा दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली तेव्हा त्यांना दिसून आले की, त्या शहराचा अग्नीने नाश झालेला आहे आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुले व मुली कैद करून नेलेली आहेत. तेव्हा दावीद आणि त्याची माणसे इतकी मोठ्याने रडली की, आणखी रडण्यास त्यांना शक्ती राहिली नाही. दावीदाच्या दोन्ही पत्नी, येज्रीली अहीनोअम आणि कर्मेल येथील नाबालाची विधवा अबीगईलला कैद करून नेले होते. दावीद फार संकटात पडला कारण त्याला धोंडमार करावी असे तेथील माणसे बोलत होती; आपआपली मुले व मुली यांच्यासाठी प्रत्येकजण आपल्या हृदयात अतिशय कटुत्वाने भरले होते, परंतु दावीदाला याहवेह त्याचा परमेश्वर यांच्यामध्ये शक्ती प्राप्त झाली.
तेव्हा दावीद अहीमेलेखचा पुत्र अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आणा.” तेव्हा अबीयाथारने ते त्याच्याकडे आणले, आणि दावीदाने याहवेहला विचारले, “छापा टाकलेल्या या लोकांचा मी पाठलाग करू काय? ते माझ्या हाती लागतील काय?”
याहवेहने उत्तर दिले, “त्यांचा पाठलाग कर, ते खात्रीने तुझ्या हाती लागतील आणि त्यांची सुटका करण्यात यश पावशील.”
तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे पुरुष बेसोर खोर्‍याकडे आले, व काहीजण तिथेच मागे राहिले. 10 त्यांच्यापैकी दोनशे माणसे खूप थकून गेली होती की, त्यांना ते बेसोर खोरे पार करता येईना, परंतु दावीद आणि इतर चारशे पुरुषांनी पाठलाग चालू ठेवला.
11 रस्त्याने जाता जाता, त्यांना एका शेतात इजिप्त देशाचा एक पुरुष भेटला. त्याला त्यांनी दावीदाकडे आणले. त्याला त्यांनी प्यायला पाणी व खायला भाकर दिली; 12 त्यांनी त्याला अंजिरांच्या ढेपेचा एक तुकडा व खिसमिसचे दोन घड दिले. ते खाऊन तो ताजातवाना झाला. कारण त्याने तीन दिवस व तीन रात्र काहीही खाल्ले नव्हते किंवा पाणी प्याले नव्हते.
13 दावीदाने त्याला विचारले, “तू कोणाचा आहेस? तू कुठून आलास?”
त्याने उत्तर दिले, “मी इजिप्त देशाचा असून अमालेक्यांचा गुलाम आहे. तीन दिवसांपासून मी आजारी असल्यामुळे माझ्या धन्याने मला सोडून दिले. 14 आम्ही नेगेवातील करेथी प्रांत, यहूदीयाचा काही प्रांत आणि कालेबाचा नेगेव यावर छापा टाकला आणि सिकलाग जाळून टाकले.”
15 दावीदाने विचारले, “छापा टाकलेल्या त्या टोळीकडे मला नेशील काय?”
तो म्हणाला, “तुम्ही मला मारून टाकणार नाही किंवा मला माझ्या धन्याच्या स्वाधीन करणार नाही, अशी परमेश्वरापुढे शपथ घ्या, मग मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईन.”
16 मग त्याने दावीदाला तिथे नेले, तेव्हा पाहा, ते त्या भागात सर्वत्र पसरले होते. खात, पीत व मौजमजा करीत होते, कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या व यहूदीयाच्या देशातून मोठी लूट आणली होती. 17 दावीद त्यांच्याशी त्या संध्याकाळपासून दुसर्‍या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत लढला आणि त्यांच्यातील जे चारशे तरुण पुरुष उंटांवर स्वार होऊन पळाले त्यांच्याशिवाय एकही सुटला नाही. 18 दावीदाने आपल्या दोन स्त्रिया व अमालेकी लोकांनी जे सर्व लुटून नेले होते ते परत मिळविले. 19 लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली, लूट किंवा जे काही त्यांनी नेले त्यातील काहीही गहाळ राहिले नाही. दावीदाने सर्वकाही परत आणले. 20 त्याने सर्व मेंढरे व गुरे घेतली, आणि त्याच्या माणसांनी ती इतर पशूंच्या पुढे हाकीत नेत म्हटले, “ही दावीदाची लूट आहे.”
21 नंतर जी दोनशे माणसे अतिशय थकल्यामुळे त्याच्याबरोबर जाऊ शकली नव्हती, आणि जे बेसोर खोर्‍याजवळ राहिले होते, त्यांच्याजळ दावीद आला. आणि ते दावीदाला व त्याच्याबरोबर असलेल्या माणसांना भेटायला बाहेर आले. दावीद व त्याची माणसे जवळ जाताच दावीदाने त्यांना अभिवादन केले. 22 परंतु दावीदाचे काही दुष्ट व त्रासदायक अनुयायी म्हणाले, “हे लोक आपल्याबरोबर आले नाही, म्हणून आपण सोडवून आणलेल्या लुटीतील वाटा त्यांना आम्ही देणार नाही. तथापि, त्यांनी त्यांच्या स्त्रिया व लेकरे घेऊन निघून जावे.”
23 तेव्हा दावीद म्हणाला, “नाही, माझ्या बंधूंनो! याहवेहने आपणास जे काही दिले आहे त्याचे आम्ही असे करू नये. याहवेहने आम्हाला सुरक्षित ठेवले आहे आणि छापा टाकलेली टोळी, आमचे शत्रू जे आमच्या विरोधात उठले त्यांना याहवेहने आमच्या हाती दिले. 24 याबाबत तुमचे कोण ऐकणार? जो मनुष्य सामानाजवळ राहतो त्याचा वाटा तेवढाच असणार जेवढा लढाईवर गेलेल्या व्यक्तीचा असणार. सर्वांना सारखाच वाटा मिळणार.” 25 तेव्हापासून आजपर्यंत दावीदाने हा नियम व विधी सर्व इस्राएली लोकांस लावून दिला.
26 दावीद जेव्हा सिकलाग येथे पोहोचला, तेव्हा त्याने लुटीतील काही भाग यहूदीयातील वडीलजनांस पाठवला आणि म्हटले, “याहवेहच्या शत्रूंच्या लुटीतून तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवित आहे.”
27 बेथेल, नेगेवमधील रामोथ व यत्तीर येथील लोकांना; 28 आणि अरोएर, सिपमोथ, एशतमोआ येथील लोकांना 29 व राकाल, यरहमेल व केनी नगरातील लोकांना; 30 होरमाह, बोर-आशान, अथाक येथील लोकांना 31 आणि हेब्रोन व इतर ठिकाणी जिथे तो व त्याची माणसे फिरत असे तेथील लोकांना दावीदाने त्या भेटी पाठविल्या.