17
यहूदीयाचा राजा यहोशाफाट 
  1 त्याच्यानंतर त्याचा पुत्र यहोशाफाट हा राजा झाला. त्याने इस्राएलविरुद्ध युद्ध करण्यासाठी स्वतःला सशक्त केले.   2 त्याने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये सैन्याचा तळ दिला आणि त्याचा पिता आसाने काबीज केलेल्या यहूदीया आणि एफ्राईमच्या नगरांमध्ये सैन्यांच्या छावण्या टाकल्या.   
 3 याहवेह यहोशाफाटबरोबर होते, कारण त्याने त्यांच्यासमोर त्याचा पिता दावीदाच्या मार्गाचे अनुसरण केले. त्याने बआल दैवतांचा सल्ला घेतला नाही.   4 परंतु इस्राएलच्या रीतिरिवाजा ऐवजी, त्याच्या पित्याच्या परमेश्वराचा सल्ला घेतला आणि त्यांच्या आज्ञांचे पालन केले.   5 याहवेहनी त्याचे राज्य त्याच्या नियंत्रणाखाली स्थापन केले; आणि यहूदीयाच्या सर्व लोकांनी यहोशाफाटकडे भेटवस्तू आणल्या, त्यामुळे त्याला मोठी संपत्ती आणि सन्मान मिळाला.   6 त्याचे अंतःकरण याहवेहच्या मार्गाकडे समर्पित होते; याशिवाय, त्याने यहूदीयामधून उच्च स्थाने आणि अशेरा खांब काढून टाकले.   
 7 त्याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी त्याने त्याचे अधिकारी बेन-हेल, ओबद्याह, जखर्याह, नथानेल आणि मिखायाह यांना यहूदीयाच्या गावांमध्ये शिकविण्यासाठी पाठवले.   8 त्यांच्याबरोबर काही विशिष्ट लेवी; शमायाह, नथन्याह, जबद्याह, असाहेल, शमिरामोथ, योनाथान, अदोनियाह, तोबीयाह आणि तोब-अदोनियाह आणि एलीशामा व यहोराम हे याजक होते.   9 त्यांनी त्यांच्याबरोबर याहवेहच्या नियमशास्त्राचे पुस्तक घेतले आणि संपूर्ण यहूदीयामध्ये शिकविले. त्यांनी यहूदीयाच्या सर्व शहरांत जाऊन लोकांना शिक्षण दिले.   
 10 यहूदीयाच्या आजूबाजूच्या प्रदेशांच्या सर्व राज्यांवर याहवेहचे भय आले, म्हणून ते यहोशाफाटविरुद्ध युद्ध करण्यासाठी गेले नाहीत.   11 काही पलिष्ट्यांनी यहोशाफाट याला भेटवस्तू आणि खंडणी म्हणून चांदी आणली आणि अरब लोकांनी त्याच्यासाठी कळप आणले: सात हजार सातशे मेंढ्या आणि सात हजार सातशे शेळ्या.   
 12 यहोशाफाट अधिकाधिक शक्तिशाली होत गेला; त्याने यहूदीयामध्ये किल्ले आणि भांडाराची शहरे बांधली   13 आणि यहूदीयाच्या नगरांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य साठविले. त्याने यरुशलेममध्ये अनुभवी योद्धेसुद्धा ठेवले.   14 कुटुंबाद्वारे त्यांची नावनोंदणी अशाप्रमाणे होती:  
यहूदीयाकडून, 1,000 पथकांचे सेनापती:  
अदनाह हा 3,00,000 लढवय्ये पुरुषांचा सेनापती;   
 15 त्यानंतर यहोहानान हा 2,80,000 सैनिकांवर सेनापती;   
 16 त्यानंतर, जिक्रीचा पुत्र अमस्याहने स्वतःला स्वेच्छेने याहवेहच्या सेवेसाठी अर्पण केले होते, त्याच्याबरोबर 2,00,000 लोक होते.   
 17 बिन्यामीनकडून:  
एलयादा, हा शूर सैनिक, त्याच्याबरोबर धनुष्यबाण आणि ढाल घेऊन सज्ज असलेले 2,00,000 पुरुष;   
 18 त्यानंतर यहोजाबाद, त्याच्याबरोबर युद्धासाठी सज्ज असलेले 1,80,000 पुरुष.   
 19 या पुरुषांनी राजाची सेवा केली, यांच्याशिवाय त्याने संपूर्ण यहूदीयामध्ये तटबंदी केलेल्या नगरांमधील छावण्यामध्ये सैनिक तैनात केले.