3
आम्ही पुन्हा स्वतःची प्रशंसा करण्यास प्रांरभ केला आहे काय? आणि इतर काही लोकांसारखे शिफारसपत्र तुम्हासाठी व तुम्हापासून घेण्याची गरज आहे का? आमच्या हृदयांवर लिहिलेले, सर्वांना माहीत असलेले व वाचले जाणारे असे तुम्ही स्वतः आमचे पत्र आहात. तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आमच्या सेवेचा परिणाम, जे शाईने लिहिलेले नाही परंतु जिवंत परमेश्वराच्या आत्म्याने, दगडी पाटीवर नसून, मानवी हृदयाच्या पाटीवर कोरलेले आहे हे दाखवा.
असा आमचा भरवसा ख्रिस्ताद्वारे परमेश्वरावर आहे. आम्ही आमच्यामध्ये कार्यक्षम आहोत असे नाही किंवा आम्ही काही दावा करू शकतो असे आम्हाला वाटत नाही; कारण आमची कार्यक्षमता परमेश्वरापासून आहे. नव्या कराराची सेवा करणारे म्हणून त्यांनी आम्हाला योग्य केले आहे. हा करार लेखी नव्हे तर आत्म्यापासून आहे; लेख मृत करतो, परंतु पवित्र आत्मा जीवन देतो.
नव्या कराराचे मोठे वैभव
आता जे अक्षर दगडावर कोरलेले असून ज्याचा परिणाम मरण होता, ती सेवा एवढी गौरवी होती, की जरी कमी होणार्‍या तेजामुळे इस्राएली लोकांना मोशेच्या चेहर्‍याकडे स्थिर पाहत राहणे अशक्य झाले होते, पण हळूहळू ते तेज कमी होत गेले. पवित्र आत्म्याची सेवा त्याहूनही खूपच अधिक वैभवशाली नव्हे काय? दंडाज्ञा करणारी सेवा जर एवढी तेजस्वी होती, तर नीतिमत्वाची सेवा त्याहून कितीतरी अधिक तेजस्वी असेल! 10 खरे म्हणजे जे तेजस्वी होते ते तेज नसून त्याची तुलना करता, पहिल्या तेजाचे मोल काहीच नाही. 11 आणि जर लोप पावत चाललेले तेजोमय होते, तर जे अनंतकालिक आहे त्याचे तेज निश्चितच अधिक आहे.
12 आम्हाला अशी आशा आहे म्हणून आम्हाला मोठे धैर्यही आहे. 13 आम्ही मोशेसारखे नाही, ज्याने लोप पावत चाललेले वैभव इस्राएली लोकांनी पाहू नये म्हणून आपल्या मुखावर आच्छादन घातले. 14 परंतु त्यांची मने आता मंद झाली व जुना करार वाचला जात असताना आजही तेच आच्छादन आहे. ते फक्त ख्रिस्तामध्येच दूर केले जाईल. 15 आज या दिवसापर्यंत जेव्हा मोशेचा ग्रंथ वाचला जातो, तेव्हा त्यांच्या हृदयावर आच्छादन राहते. 16 परंतु जेव्हा कोणी प्रभूकडे वळतो, त्यावेळी हे आच्छादन काढले जाते. 17 प्रभू आत्मा आहे आणि जिथे प्रभूचा आत्मा तिथे स्वातंत्र्य आहे. 18 आपण जे सर्व, मुखावर आच्छादन नसलेले; ते आपण प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करणारे आहोत. ते आपण वाढत जाणार्‍या तेजासह त्यांच्या प्रतिमेप्रमाणे बदलत जात आहोत. हे सर्व प्रभूपासून आहे जे आत्मा आहेत.